गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, मी काँग्रेस परिवार एकत्र करण्यासाठी मूळ काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेस मध्ये सामील झालो आहे. ममता बॅनर्जी, शरद पवार, जगन मोहन रेड्डी यांच्याही काँग्रेसच आहेत. हा काँग्रेसचा परिवार आहे. हा एकत्र करण्याचा म्हणजे काँग्रेसची विचारसरणी मजबूत करण्याचा फालेरो यांचा मनसूबा आहे. गोव्यात ते तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व करणार आहेत.Congress and so called Congress family division will be dividends BJP
लुईजिनो फालेरो हे गोव्यातले जुनेजाणते नेते आहेत. ख्रिश्चन समाजाचे ते प्रतिनिधित्व करतात. आत्तापर्यंत काँग्रेसला ख्रिश्चन समाजाचा मोठा पाठिंबा मिळवून देण्यात त्यांचा आणि अन्य ख्रिश्चन नेत्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. या पाठिंब्यातूनच काँग्रेसने तेथे अनेक वर्ष राज्य केले. आता नव्या उमेदीने फालेरो हे तृणमूल काँग्रेस साठी ख्रिश्चन समाजाचा पाठिंबा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
पण फालेरो यांच्या या प्रयत्नांचा किंवा मनसुब्यांचा नेमका अर्थ काय…?? ते जेव्हा काँग्रेस परिवार एकत्र करण्यासाठी किंवा तृणमूल काँग्रेसला गोव्यात संघटनात्मक पातळीवर पायरोवा करून देण्यासाठी प्रयत्न करतील तेव्हा ते कोणाचा पाठिंबा कमी करून तो तृणमूळ कडे वळतील…?? थोडक्यात कोणाच्या मतांची टक्केवारी ते तृणमूळ काँग्रेसकडे वळवतील…??, असा प्रश्न तयार होतो आहे.
फालेरो यांचा प्रभाव असलेल्या ख्रिश्चन समाजाची मते जेव्हा मूळ काँग्रेस आणि फालेरो यांच्या दाव्यानुसार काँग्रेस परिवार यांच्यात विभाजित होतील तेव्हा कोणती काँग्रेस जिंकेल? की अन्य कोणीच म्हणजे भाजप त्याचा फायदा घेऊन पुढे निघून जाईल?,
याचा विचार लुईजिनो फालेरो यांनी केला आहे का? किंबहुना काँग्रेस परिवार एकत्र करताना मूळ काँग्रेसलाच पश्चिम बंगाल सारखे गोव्यातही नेस्तनाबूत करण्याचा त्यांचा खरा मनसुबा आहे का…?? हा कळीचा प्रश्न ठरतो आहे किंबहुना गोव्याच्या राजकारणाची इथेच खरी मेख आहे.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे काँग्रेस परिवार एकत्र करण्याची फालेरो यांची तोंडी भाषा असली तरी प्रत्यक्षात राजकीय व्यवहार मात्र उघडपणे काँग्रेसची मते फोडण्याचा आहे.
अर्थात फालेरो आणि अन्य १० नेते काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेस मध्ये गेले याचा अर्थ सगळी काँग्रेस संपली असा होत नाही. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते अधिक आक्रमक होऊन ते लुईजिनो फालेरो आणि अन्य दहा नेत्यांच्या विरोधात उतरतील. मूळ काँग्रेस आणि फालेरो यांचा काँग्रेस परिवार यांच्यात राजकीय संघर्ष होईल आणि यामध्ये काँग्रेसची ताकद मात्र दुभंगेल. या दुभंगलेल्या ताकदीतून ते भाजपचा मुकाबला कसे करणार…??, हा खरा प्रश्न आहे.
शिवाय येथे शिवसेना नावाच्या पक्षाचा छोटा राजकीय अँगलही येतो आहे. शिवसेनेने आत्तापर्यंत महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यांमध्ये निवडणूक लढवून बघितली आहे. बिहार मध्ये त्यांना NOTA पेक्षा कमी मते पडली आहेत.
तरीही उत्तर प्रदेश मध्ये 100 आणि गोव्यात 22 जागा लढविण्याचा त्यांचा इरादा आहे. उत्तर प्रदेशाचे सोडून द्या. पण गोव्यात थोडीफार का होईना पण शिवसेनेची संघटनात्मक ताकद आहे. तेथे शिवसेनेनी जोर लावला तर शिवसेना नेमकी कोणाची मते विभाजित करणार आहे??
… पराभव तर सगळ्यांना भाजपचा करायचा आहे, पण मतविभागणी ते भाजपची करणार आहेत की आपापसात करणार आहेत??, हा मुद्दा येथे महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या तरी भाजप विरोधातील सर्व पक्षांच्या राजकीय हालचाली एकमेकांची ताकद कमी करण्यासाठीच सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा राजकीय शत्रू एक आहे पण खुद्द विरोधकांचे सैन्यच विभागले गेले आहे. त्यामुळे त्यांचे भाजपवरचे वार तोकडे पडताना दिसत आहेत…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App