विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसचं प्रवक्तेपद दहा वर्षांहून अधिक काळ सांभाळणाऱ्या सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत असलेल्या नाराजीतून हा राजीनामा सचिन सावंत यांनी दिला आहे अशीही चर्चा रंगली आहे. Maharashtra Congress spokesperson Sachin Sawant resigns from his post
सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मधल्या काळात त्यांना विधानपरिषदेवरही पाठवणार असल्याची चर्चा होती. सावंत यांनी सातत्याने भाजपला अंगावर घेतले होते. काँग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि भाजपला सडेतोड उत्तर देण्याचं कामही ते करत होते. शिवाय पक्ष चर्चेत ठेवण्याचंही काम त्यांनी केलं होतं. मात्र, आज झालेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांना डावलून अतूल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आलं. त्यामुळे सावंत नाराज झाले असून या नाराजीतूनच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. सावंत यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडला पाठवल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आज जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये नाना पटोले यांच्या समर्थकांचीच सर्वाधिक वर्णी लागली आहे. अतुल लोंढे हे पटोले समर्थक असल्यानेच त्यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याचं सांगण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App