मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची खूपच चिंता खुद्द ते सोडून इतर सर्व पक्ष मधल्या नेत्यांना लागली आहे. यानिमित्ताने अनेक नेते त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या कार्यभाराबाबत त्यांनी न मागितलेले सल्ले देत आहेत.CM Uddhav Thackeray’s illness and Simhasan marathi movie
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना न मागताच सल्ले दिले आहेत. त्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या कार्यभार यासाठी पुढे आणली आहेत आज त्यामध्ये अब्दुल सत्तार या शिवसेनेच्या मंत्र्यांची भर पडली आहे त्यांनी रश्मी वहिनींचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले आहे. यापैकी एकही सल्ला अजून तरी मुख्यमंत्र्यांनी मानण्याची बातमी नाही किंबहुना असे न मागता मिळालेले सल्ले मानण्याची महाराष्ट्राच्या कोणत्याच मुख्यमंत्र्यांची परंपरा नाही. अगदी सिनेमातल्या सुद्धा नाही… जरा जब्बार पटेलांचा “सिंहासन” सिनेमा आठवून पहा…!!
“सिंहासन” सिनेमा मुख्यमंत्री वसंतराव नाईकांवर बेतला आहे, असे सांगितले जाते. तो सिनेमा असला तरी महाराष्ट्राचे राजकारण “असेच” चालते “असा” धडा त्यातून आपल्याला शिकता येतो.
त्यामध्ये मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे (अरुण सरनाईक) हे आजारी पडतात. त्यासाठी त्यांच्या विरोधातल्या “बंडाचा मुहूर्त” ते अचूक साधतात. त्यावेळी त्यांचे विरोधक मुख्य बंडखोर अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे देखील मुख्यमंत्री खरंच आजारी आहेत की “राजकीय आजारी” आहेत?, असे थेट त्यावेळच्या त्यांच्या डॉक्टरांना विचारतात.
एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांचे प्रत्यक्ष समर्थक आणि अप्रत्यक्ष विरोधक असे प्रत्येक मंत्री आडून – आडून पक्षश्रेष्ठींपुढे आपल्यालाच मुख्यमंत्री करण्यासाठी आपले घोडे पुढे दामटताना त्यात दिसतात. शेवटी मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात आणि राजकीय चलाखीने आपल्या विरोधातील बंडखोरांचा पाडाव करून मंत्रिमंडळात आपल्याला हवे तसे फेरबदल करून घेतात, असे त्या सिनेमात दाखवले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या आजारी आहेत. ते मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार घरातून सांभाळत आहेत. जसे सिंहासन सिनेमामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांचेच मंत्री आडून – आडून वेगवेगळे सल्ले देऊन आपला कार्यभार कमी करण्याचा करण्याचे सूचवत असतात तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडताना दिसत आहे.
“कार्यभारी” मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे आत्ताच चर्चेत आहेत. त्यात रोज एका नावाची तरी भर पडते आहे. आजच चंद्रकांत दादा पाटलांनी ठाकरे सरकारच्या हातालाच नव्हे, तर डोक्यालाही लकवा मारला आहे, असे टोचून घेतले आहे. अशा स्थितीत एकापाठोपाठ एक सूचनावजा हल्ले किंवा हल्लेवजा सूचना होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंहासन मधल्या मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे यांच्यासारखे न वागले म्हणजे मिळवले…!!
मुख्यमंत्रिपदाच्या कार्यभार यासाठी नेमका कोण सूचना करतो?, कोणती सूचना करतो? त्यामागे त्याचा हेतू काय?, हे न समजण्याइतपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत. मुख्यमंत्री हे पदच असे आहे की ज्याचा कार्यभार इतरांकडे गेला की मूळ पदावरचा माणूस बुद्धिबळातील प्याद्याच्या दर्जाचाही शिल्लक राहत नाही…!! हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्के माहिती आहे.
म्हणूनच सिंहासनमध्ये मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे यांनी “जे” केले “तेच” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील करण्याची शक्यता आहे… पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विरोधक “बंडखोर” अर्थमंत्री “विश्वासराव दाभाडे” हे सिल्वर ओकच्या आसपास आहेत काय…??… तपासावे लागेल…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App