महाराष्ट्राने भाजपला १०५ आमदार दिले आहेत. ५० – ५० आमदारांच्या आसपास खेळणारे दोन पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला “खेळवत” आहेत आणि १०५ आमदारांचा पक्ष काय करतो आहे…?? त्यांचे नेते कोणत्या प्रकारची वक्तव्ये आणि राजकीय कृती करत आहेत…??, हे नीट लक्षात घेतले तर या महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना मागच्या दाराने सत्तेवर आलेल्या निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांना पक्की टक्कर देता येत नाही, हेच सिद्ध होते…!!
नारायण राणे यांना केंद्रात मंत्री बनवून भाजपने महाराष्ट्रातला एक आक्रमक मोहरा समोर आणला खरा, पण महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने निदान पहिल्या फेरीत तरी त्याला “गारद” केला, असे कालच्या आणि आजच्या दोन दिवसांतल्या घटनाक्रमावरून म्हणावे लागेल. BJP leaders not taking on Shiv Sena With appropriate aggressive means in Maharashtra
ठाकरे – पवार सरकार हे भाजपच्या शत्रूस्थानी आहे. ते तसे करणारच. पण भाजपचा नेत्यांचा नारायण राणे यांच्या अटक प्रकरणावरचा एकूण प्रतिसाद पाहिला की वरचे विधान सत्य असल्याचे पटल्याशिवाय राहत नाही. नारायण राणे यांच्या अटकेतून शिवसेनेला एका दिवसात संघटना म्हणून संजीवनी मिळाली. आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना यातून काय मिळाले…?? नेत्यांची अवसानघातकी वक्तव्ये आणि वांझोटे उपदेश. नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या दुसर्या दिवशीही आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली होती. त्यांनी शिवसेनेकडून आपल्यावर होणारा वार व्यवस्थित deflect केला होता. मी प्रॅक्टिकल वकील आहे. मी गुन्हा काय केला आहे?, ते सांगा अशा स्वरुपाचे वक्तव्य त्यांनी पत्रकार परिषदेत केले होते.
परंतु विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोणती वक्तव्ये केली? कोणती ट्विट केलीत?, ते पाहिले तर हे दोन्ही नेते हे दोन्ही नेते अनावश्यक बचावात्मक पवित्र्यात गेल्याचे दिसले. नेताच जिथे बचावात्मक पवित्र्यात असेल, तिथे कार्यकर्त्यांना बळ मिळणार कुठून? आमचा DNA विरोधी पक्षाचा आहे आम्ही संघर्ष करू, असे विधान पूर्वी चंद्रकांतदादा पाटील करायचे. काल ते देवेंद्र फडणवीस यांनीही करून घेतले. पण नुसत्या विधानातून संघर्ष करता येतो का…?? आणि यातून कार्यकर्त्यांना बळ मिळते का…??३ आणि कसला विरोधी पक्षांचा DNA…??
ज्या पक्षाचे मुख्य नेते आज पंतप्रधान पदावर आहेत, त्यांनी आपल्या राजकीय संसदीय कारकिर्दीत कधीही विरोधी बाकाचे तोंड पाहिले नाही, विरोधी बाकांवर बसले नाहीत त्या नेत्यांच्या पक्षाचा DNA विरोधी पक्षांचा…?? काही समजते का या भाजप नेत्यांना आपण काय बोलतोय ते…?? निदान २५ वर्षे फक्त सत्ताधारी बाकांवर बसलेल्या आपल्या सर्वोच्च नेत्याकडून काहीतरी शिकायचे…!! पण नाही, महाराष्ट्रातल्या या भाजप नेत्यांचा DNA विरोधी पक्षांचा नाही “डोके” विरोधी पक्षांचे आहे…!!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी “शांत” राहून नारायण राणेंवर कारवाई करून घेतली. याला गावठी भाषेत “सुमडीत कोंबडी कापणे”, असे म्हणतात. राजकारणाची पोकळ चर्चा करणाऱ्या पांढरपेशा धुवट समाजाला कदाचित ही भाषा आवडणार नाही. पण महाराष्ट्राचे राजकारण हा आता रोकडा व्यवहार झाला आहे. इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासारख्या निर्ढावलेल्या पक्षांना हीच भाषा समजते. ती भाषा उच्चारण्याची हिंमत ना फडणवीस यांनी दाखविली, ना चंद्रकांतदादा पाटील यांनी दाखविली…!!
… आणि आज तर त्याच्यावर सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांनी वरकडी केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी नारायण राणे प्रकरण घडल्यानंतर जवळजवळ २४ तासांनी खडबडून जागे झाल्यासारखे एक ट्विट केले आहे. “राजकारणात मनभेद नकोत, मतभेद पाहिजेत. राजकारण्यांनी संयमी भाषा वापरली पाहिजे,” असे त्यांनी ट्विट केले आहे.
एकतर सुधीर मुनगंटीवार यांचे वय नारायण राणे यांच्यापेक्षा जास्त नाही किंवा राजकारणात उपदेश करण्याइतपत ते ज्येष्ठ नेतेही झालेले नाहीत. ८० वर्षांचे शरद पवार अश्लील हातवारे करून देवेंद्र फडणवीस यांना हिणवू शकतात आणि साठीच्या आसपास असलेले सुधीर मुनगंटीवार संयमी राहण्याचे उपदेश करतात… या उपदेशाचा प्रत्यक्ष राजकारणात काही फायदा तर होत नाहीच, परंतु आपल्यापेक्षा छोट्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा अवसानघात मात्र होत राहतो. ज्या भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची चिडून आणि संतापून शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध लढण्याची तयारी आहे त्या कार्यकर्त्यांचा हे नेते अवसानघात करत असतात, हे त्यांना समजत नाही का…??
सुधीर मुनगंटीवार यांचे “तसे”, तर आशिष शेलार यांचे वेगळेच. अशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत आपल्या सगळ्या तोफा अनिल परबांवर झाडून घेतल्या. जणूकाही अनिल परब यांनी स्वतःहूनच इतरांचा कोणाचाही सल्ला न घेता नारायण राणे यांच्या अटकेची कारवाई केली आहे. ही कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आग्रही धोरणाशिवाय झालीच नाहीये. शिवाय त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे. अशावेळी अशिष शेलार यांनी मुख्य तोफा झाडून घेतल्या त्या अनिल परबांवर..!! आणि मग सांगितले की 75000 पत्रांच्या गोळ्या सुटणार आहेत, मुख्यमंत्र्यांवर…!! आणि शेवटी मखलाशी काय केली तर म्हणे शरद पवार यांच्यासारख्या संयमी राजकीय नेत्या बरोबर राहूनही शिवसेना सूडाचे राजकारण करते आहे.
शिवसेना आज जरी शरद पवारांच्या बरोबर गेली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या पावणेदोन वर्षात आपण पवारांच्या ओंजळीने पाणी पितो, असे अजिबात दाखवून दिलेले नाही किंबहुना मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी एकदाही ‘सिल्वर ओक’वर हजेरी लावलेली नाही. ते त्यांचे दूत संजय राऊत यांना तिकडे पाठवत असतील; पण ते स्वतः ‘सिल्वर ओक’च्या पायऱ्या चढलेले नाहीत आणि इकडे आशिष शेलार यांचे मुख्य नेते पवारांना तास – तास भर चर्चेसाठी वेळ देत आहेत…!!
या असल्या वक्तव्यांतून आणि राजकीय कृतीतून आशिष शेलार आणि त्यांचे मुख्य नेते भाजपच्या कार्यकर्त्यांना काय संदेश देतात..?? हा या दोन्ही नेत्यांकडून कार्यकर्त्यांचा अवसानघात नाही का…?? असे अवसानघात झालेले कार्यकर्ते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निर्ढावलेल्या कार्यकर्त्यांसमोर कोणत्या तोंडाने आणि कोणती शस्त्रे घेऊन उभे राहणार…??
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App