विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कालपर्यंत किंबहुना आज सकाळी अकरा वाजेपर्यंत राणा भीमदेवी थाटात राज्यपालांशी पंगा घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने अखेर राज्यपालांच्या लिफाफ्यातील पत्रासमोर नांगी टाकली…!! यावर प्रसार माध्यमांमध्ये दिवसभर बरेच चर्वितचर्वण झाले. मराठी माध्यमांनी महाविकास आघाडी सरकारची पडलेली बाजू सावरून धरण्यासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बातम्या कमीत कमी दिल्या. Assembly Speaker Election
माध्यमांनी नंतरच्या विधानसभेच्या कामकाजावर जोर लावून धरला. पण महाविकास आघाडी सरकार राज्यपालांच्या पत्रानंतर तोंडघशी पडले हे लपून राहिले नाही. उलट शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारला आणखी तोंडघशी पाडण्यापासून वाचविले.
या सगळ्या राजकीय मशक्कतीत महाविकास आघाडी सरकारची बहुमताची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली, ही राजकीय वस्तुस्थिती समोर आली आहे…!!
आत्तापर्यंत भाजपने जेव्हा-जेव्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने या अशी मागणी केली त्यावेळी महाविकास आघाडीने भाजपला दमदाटी करत मग तुम्हीच अविश्वास ठराव आणून दाखवा, असे प्रतिआव्हान दिले होते. त्यातून आपल्या बहुमताचा खुंटा हलवून बळकट करण्याचा महाविकास आघाडीचा मनसूबा होता. पण आता जेव्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने रेटून नेण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न राज्यपालांनी घटनात्मक शस्त्र वापरून हाणून पाडला तेव्हा महाविकास आघाडी जरी तोंडघशी पडली असली तरी महाविकास आघाडीच्या बहुमताची सव्वालाखाची मूठही झाकलेली राहिली आहे. एरवी जर गुप्त मतदान झाले असते तर विकास आघाडीची ५० मते फुटली असती हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही किंबहुना आमदारांवरील “विश्वासाच्या डेफीसीटवर”, तर हे सरकार “तरले” आहे…!!
भाजपच्या नेत्यांनी वारंवार महाविकास आघाडीतली ही विसंगती समोर आणायचा प्रयत्न केला आहे. परंतु राष्ट्रपती राजवट लावण्याचे इशारे देत त्यांचे बाण फुकट गेले आहेत.
जर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक राज्यपालांना वळसा घालून किंवा प्रतिआव्हान देऊन घेता आली असती तर महाविकास आघाडीच्या आव्हानात जबरदस्त दम आहे असे मानता आले असते. पण जे सरकार स्वतःच्याच आमदारांच्या अविश्वासाच्या पायावर उभे आहे त्याची विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेण्याची हिंमत तरी कशी होणार??, त्यामुळे आता राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक अडवली, असे चित्र निर्माण करण्यात महाविकास आघाडीचे नेते मग्न आहेत. आत्तापर्यंत महाविकास आघाडीचे नेते “आलं अंगावर, ढकललं केंद्रावर” या मनोवृत्तीने वागत होते. आता त्यात “आलं अंगावर, ढकललं राज्यपालांवर” याची भर पडली आहे. पण यातून राज्यपालांना समोर टाकलेली नांगी झाकली जात नाही…!! की महाविकास आघाडीचा मुखभंग लपत नाही. फक्त महाविकास आघाडीच्या तथाकथित बहुमताची “सव्वा लाखाची” मूठ मात्र तूर्त झाकलेली राहिली आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App