पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तगडे आव्हान देण्याची भाषा सर्व विरोधी पक्ष प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर करत आहेत. यासाठी बडे – बडे प्रादेशिक नेते एकमेकांना भेटत देखील आहेत. एक तगडी आघाडी उभी करण्याचा मानस या सर्व प्रादेशिक नेत्यांचा आहे. यामध्ये अर्थातच नितीश कुमार यांच्या रूपाने नवी भर पडली आहे. पण ही प्रक्रिया 2019 पासूनच खऱ्या अर्थाने सुरू झाल्याचे दिसले आहे.All opposition parties are uniting against Modi, but hunting each other’s political space
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कायम पंतप्रधानपदाच्या रेस मध्ये असलेले शरद पवार या नेत्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन एक तगडी आघाडी उभे करण्याचा मनसूबा एकमेकांपाशी व्यक्त केला आहे. पण हा मनसूबा व्यक्त करतानाच प्रत्येकाची सुप्त महत्त्वाकांक्षा स्वतःचा प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पातळीवर नेण्याची देखील राहिली आहे.
ममतांची उफाळलेली महत्त्वाकांक्षा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका जिंकल्या बरोबर ममता बॅनर्जींची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा उफाळली होती. त्यांनी भाजपवर तोंडी तोफा डागत प्रत्यक्षात काँग्रेस फोडून पूर्वोत्तर राज्ये, महाराष्ट्र, गोवा आणि अगदी हरियाणा पर्यंत तृणमूळ काँग्रेसची राजकीय मुहूर्तमेढ रोवली होती. काँग्रेस मधले काही “दुर्लक्षित” नेते तृणमूल काँग्रेसला येऊन मिळाले होते. पण सध्या पश्चिम बंगाल सोडून अन्य राज्यांमधील तृणामूळ काँग्रेस नेमकी कोणत्या राजकीय अवस्थेत आहे हे विचारण्याची गरज नाही!!
केसीआर “राष्ट्रीय” होणार
जे ममता बॅनर्जींचे तेच के. चंद्रशेखर राव यांचे. तेलंगणातून त्यांची तेलंगणा राष्ट्र समिती झेप घेऊन “राष्ट्रीय” पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांनी तशी घोषणा देखील केली आहे. दिल्लीत भव्य कार्यालय उभारले आहे. आता फक्त पक्ष “राष्ट्रीय” करण्याचा मुद्दा तेवढा उरला आहे!! एकदा तो पक्ष “राष्ट्रीय” झाला की मग पंतप्रधान मोदी यांच्यासमोर “वन टू वन फाईट” घ्यायला चंद्रशेखर राव “मोकळे” होणार आहेत!!
पवार कायम रेस मध्ये
बिहार मधून नितीश कुमार यांचाही आवाज पुन्हा एकदा “राष्ट्रीय” होण्याच्या बेतात आहे. पण नितीश कुमार आणि शरद पवार या दोघांचे वैशिष्ट्य साम्य असे की ते फार पूर्वीपासूनच पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये आहेत. त्यांच्या पक्षाचे किती खासदार निवडून येतात हा भाग अलहिदा… पण त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व विशिष्ट माध्यमांमधून आधीच “राष्ट्रीय” पातळीवरचे करून ठेवले आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपला सोडून तेजस्वी यादव बरोबर आघाडी करून स्वतःचे सरकार पाडून नवे सरकार आणले. पण नंतर मणिपूर मध्ये त्याचे वेगळे पडसाद उमटून त्यांच्या संयुक्त जनता दलाचे सगळे आमदार फुटून भाजपमध्ये गेले. संयुक्त दल जनता पक्षाचे वैशिष्ट्य असे की तो आधी एक खरंच राष्ट्रीय पक्ष होता. उत्तर प्रदेशापासून बिहारपर्यंत त्याचे राजकीय अस्तित्व होते. बिहार मधला सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष ते आता आमदार संख्येत बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष अशी नितीश कुमार यांच्या राजकीय कर्तृत्वाची वाटचाल राहिली आहे. पण त्यांना सतत मिळत असलेली मुख्यमंत्री पदे या राजकीय कर्तृत्वाच्या पलिकडची आहेत. ती पवारांसारख्या जुगाडू राजकारणात दडली आहेत. इतरांनी आपला तख्तापलट करण्याआधीच आपणच दुसरीकडे उडी मारून तख्तापलट घडवून परत तख्त बळकवायचे हे ते जुगाडू राजकारण आहे.
नितीश कुमार यांचे चहापान
पण इतके होऊ नये नितीश कुमार यांची “राष्ट्रीय” महत्त्वाकांक्षा शमलेली नाही. उलट ती वाढल्याचेच दिसत आहे. म्हणूनच त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. नितीश कुमार यांच्या या भेटीगाठींवर त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी खोचक टिपण्णी केली आहे. चार नेते एकमेकांशी बोलले आणि त्यांनी एकत्र येऊन चहा प्यायला म्हणजे विरोधकांची मजबूत आघाडी तयार होत नाही. त्यासाठी विश्वासार्ह आणि लोकांना मान्य होईल असा नेता लागतो, असा टोला प्रशांत किशोर यांनी लगावला आहे. याचा अर्थ विरोधकांकडे मोदींना पर्याय ठरेल असा एकही विश्वासार्ह मजबूत चेहरा नाही, असेच प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे.
राष्ट्रवादीचा “राष्ट्रीय” इरादा
नितीश कुमार यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा अशीच फुलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन राजधानी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियम मध्ये होत आहे. शरद पवारांची राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदी सहाव्यांदा निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली “राष्ट्रीय” पातळीवर झेप घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा इरादा आहे.
काँग्रेसचे भारत जोडो की विरोधक तोडो??
ममता बॅनर्जी यांच्यापासून नितीश कुमार यांच्यापर्यंत सर्व प्रादेशिक नेत्यांच्या अशा “राष्ट्रीय” हालचाली सुरू असताना खरा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबरोबर दक्षिणेतून उत्तर दिग्विजयाकडे निघाला आहे. त्यांची भारत जोडो यात्रा प्रामुख्याने अल्पसंख्यांक मते पुन्हा काँग्रेसकडे खेचण्याचा आणि वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांचे प्रादेशिक पक्ष ज्या राज्यांमध्ये बळकट आहेत, त्या राज्यांमध्ये आपली पॉलिटिकल स्पेस वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे मानण्यात येत आहे. राहुल गांधी हे दक्षिणेकडची राज्ये पिंजून काढत आहेत. या राज्यांमध्ये कम्युनिस्ट आणि अन्य प्रादेशिक पक्ष सत्तेवर आहेत. सध्या द्रमूक सोडला तर बाकीच्या प्रादेशिक पक्षांची काँग्रेसचा राजकीय पंगा आहे. तिथे राहुल गांधी काँग्रेस बळकट करणार म्हणजे धक्का कोणाला मारणार??
एकजुटी नव्हे, काटाकाटी
याचा खरा अर्थ असा की काँग्रेस प्रादेशिक पातळीवर जाऊन प्रादेशिक पक्षांची पॉलिटिकल स्पेस खाणार आणि त्याच वेळी सगळे प्रादेशिक पक्ष आपापली पॉलिटिकल स्पेस “राष्ट्रीय” पातळीवर वाढवायचा प्रयत्न करणार… हा राजकीय विरोधाभास यातून तयार होत आहे. सर्व मोदी विरोधकांच्या तोंडी एकजुटीची भाषा जरूर आहे, पण प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात मात्र ते एकजुटी ऐवजी एकमेकांचीच काटाकाटी करत असल्याचे सिद्ध होत आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App