विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : फेक सोशल मीडिया हँडलद्वारे अरब देशांमध्ये भारताविषयी विषारी वातावरण तयार करण्याच्या पाकिस्तानी म्होरक्यांना आज कुवेतनेही सणसणीत चपराक दिली. कोविड १९ च्या लढाईत कुवेत भारताबरोबर असल्याची ग्वाही कुवेतच्या राजघराण्याच्या प्रतिनिधींनी दिली.
ओमानच्या राजघराण्यातील राजकन्या मोना बिन फहाद यांच्या नावाने चालविल्या गेलेल्या ट्विटर हँडलवरून भारतद्वेष पसरविण्यात आला होता. भारतातील मुस्लिमांचा छळ थांबला नाही तर ओमानमधील सर्व भारतीयांना हाकलून देण्यात येईल, असे मोना बिन फहाद यांच्या कथित ट्विटर हँडलवर लिहिण्यात आले होते.
प्रथम या ट्विटमुळे अरब जगतात आणि भारतात खळबळ माजली पण या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर संबंधित ट्विटर अकाउंट फेक असल्याचे आणि ते पाकिस्तानातून चालविले गेल्याचे स्पष्ट झाले.
मोना बिन फहाद या ओमानचे उपपंतप्रधान सैय्यद फहाद यांच्या कन्या तसेच सुलतान काबूस विद्यापीठाच्या सहायक कुलगुरू आहेत. त्यांच्या फेक ट्विटर हँडलवरून हा प्रकार झाल्याने भारत ओमान संबंधांवर परिणाम होऊ शकला असता. त्याचे पडसाद अरब जगतामध्ये आणि अन्य मुस्लिम देशांमध्ये देखील उमटले असते. पण वेळीच खुलासा झाल्याने तो टळला.
दरम्यान, कुवेतमधील फेक सोशल मीडिया हँडलवरूनही असाच खोडसाळ प्रकार केल्याचे आढळून आले मात्र कुवेती सरकारने ताबडतोब खुलासा करून कुवेत भारतासमवेत असल्याचे स्पष्ट केले. भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.
या पार्श्वभूमीवर ओमानसह सौदी अरेबिया, कतार आणि कुवेत या देशांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. भारत हा बहुसांस्कृतिक आणि सहिष्णू देश आहे. त्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये अन्य कोणत्याही देशाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
कोविड १९ च्या प्रादूर्भावाविरोधात भारत जागतिक पातळीवर प्रभावी भूमिका बजावत आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे, अशी ग्वाही देखील अरब जगतातील देशांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App