विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने वाराणसीला जाऊन काशी विश्ननाथाचं दर्शन घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. सारा तिची आई अमृता सिंगसोबत वाराणसीला गंगा आरतीसाठी गेली होती. दुसऱ्यांदा तिने दशाश्वमेध घाटावर संध्याकाळच्या गंगा आरतीला हजेरी लावली. साराने आईसोबत पारंपरिक पद्धतीने गंगा आरती करून पूजा केली. या निमित्ताने तेथील पुजारी आणि सोशल मीडियातील काही लोक आमने सामने आले आहेत.
गंगा आरती केल्यानंतर आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर साराने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र साराच्या दर्शनाला काशी समितीचे महासचिव चंद्रशेखर कपूर यांनी आक्षेप घेतला आहे. साराने काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेणं हे परंपरेच्या आणि आणि नियमांच्या विरोधात आहे. हिंदू नसलेल्या लोकांच्या प्रवेशावर मंदिरामध्ये बंदी असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. तरी देखील सारानं मंदिरात प्रवेश करणे हे मंदिराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लावण्यासारखे आहे, अशी टीका कपूर यांनी केली आहे. यावर योग्य कारवाई करून पाऊले उचलावीत अशी विनंती काशी विकास समितीने केली आहे. काशी विश्वनाथाचे दर्शन कोणी घ्यायचे आणि कोणी नाही, असे सांगणारे हे कोण? असा सवाल सोशल मीडियात उपस्थित करण्यात आला आहे. साराची हिंदू धर्मातील रुची पाहून तिचा आदर करतो. पण ती हिंदू नाही. तिने धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये. तिच्यासाठी हे सर्व मजेशीर आणि छान वाटत असले तरी आमच्यासाठी तो धर्मिक श्रद्धेचा भाग आहे’ असे पुजारी राकेश मिश्रा यांचे म्हणणे आहे. मात्र, पुजाऱ्यांच्या या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप नोंदविला आहे. अशा लोकांनीच हा हिंदू-मुसलमान करून वाट लावली. सारा श्रद्धेने आरती आणि पूजा करते आहे तर तिला करू दे, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. तिची आई अमृतासिंग ही हिंदू असणे पुरेसे नाही का असा सवालही काहींनी केला आहे.
गंगा आरतीच्या वेळी सारा भक्तीमय झालेली दिसली. मंत्रोच्चार सुरू असताना भक्तीभावाने ती सर्व ऐकताना दिसली. आरतीच्या वेळी इतर भाविकांच्यामध्ये बसली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App