समुद्रात अडकलेल्या नाविकांना अमित शहांचा दिलासा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : चिनी विषाणूमुळे समुद्रात अडकून पडलेल्या नाविकांना आणि अन्य कर्मचार्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठा दिलासा दिला आहे. या मंडळींना आता योग्य ती वैद्यकीय काळजी घेऊन घरी परतण्याची मुभा देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा या संदर्भातील ‘स्टँटर्ड ऑपरेशन प्रोसिजर’ (एसओपी) मध्ये बदल केले. त्यामुळे भर समुद्रात, बंदराजवळ अडकलेल्या विविध जहाजांवरील कर्मचार्यांना बंदरावर उतरण्यास असणारा प्रतिबंध दूर झाला आहे.

मुंबई जवळच्या समुद्रात असलेल्या ‘मॅरेला डिस्कव्हरी’ जहाजावरील नाविकांना व इतर जहाजांवरील नाविकांना कामावरुन घरी परतणे, या निर्णयामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या जहाजावरील नाविकांनी पंतप्रधानांकडे सुटकेची मागणी केली होती. बुधवारी हे जहाज युरोपला रवाना होणार होते. तत्पूर्वी केंद्राने नियम शिथिल केल्याने आता या नाविकांना स्वगृही परतता येणार आहे. यामुळे आनंदीत झालेल्या या नाविकांनी आणि त्यांच्या कुटूंबियांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयाचा लाभ देशातील सर्व बंदरांमधील प्रवासी जहाजे व व्यापारी जहाजांवर कार्यरत असलेल्या नाविकांना होणार आहे. देशातील बंदरातून कामावर जाणे व भारतीय बंदरात उतरुन साईन ऑफ होणे यामुळे शक्य होणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काही नियमांचे पालन करण्याची अट ठेवली आहे. नाविकांना त्यांच्या गेल्या २८ दिवसांतील प्रवासाची माहिती कंपनीला  द्यावी लागेल. डीजी शिपिंगने प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे संबंधित नाविकाची वैद्यकीय तपासणी केली जाईल.

यात चिनी विषाणूची कोणतीही लक्षणे दिसून न आल्यास त्याला कामावर ठेवले जाईल. नाविकाचे निवासस्थान असलेल्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली जाईल आणि त्यांना स्थानिक प्रवासासाठी पास उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात येईल. ज्या बंदरात जहाजामध्ये प्रवास सुरु करायचा असेल त्या ठिकाणी नाविकाची कचिनी विषाणूची तपासणी केली जाईल. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तरच त्याला प्रवासाला परवानगी देण्यात येईल.

विदेशी बंदरातून भारतीय बंदराजवळ, समुद्रात असलेल्या जहाजांमधील नाविकांना कामावरुन घरी परतण्यासाठी (सी ऑफ) करण्यासाठी देखील निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय हद्दीत, बंदरात जहाजाला थांबा देण्यापूर्वी जहाजाच्या कप्तानाला जहाजातील सर्व नाविकांच्या वैद्यकीय अहवालाची माहिती द्यावी लागेल. स्थानिक बंदर प्रशासनाला कप्तानाने त्याच्या जहाजातील सर्वांच्या गेल्या २८ दिवसांतील प्रवासाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जहाजाला बंदरात बर्थिंग देण्यापूर्वी स्थानिक बंदर प्रशासन त्यातील नाविकांबाबत वैद्यकीय माहिती घेतील. जहाजातील नाविकांची बंदर प्रशासनाच्या अखत्यारीत कोविड १९ ची तपासणी केली जाईल व ती टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. जर तपासणी पॉझिटिव्ह आली तर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जातील. तपासणीचा अहवाल येईपर्यंत नाविकांना स्थानिक प्रशासनाने नेमून दिलेल्या ठिकाणी कॉरन्टाईन व्हावे लागेल. अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना घरी जाण्यासाठी पास उपलब्ध करुन देण्यात येईल व नेमून दिलेल्या मार्गाने त्यांना घरी परतता येईल.

घरी जाताना देखील त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे कठोरपणे पालन करावे लागेल. डीजी शिपिंग याबाबत अधिक सखोलपणे निर्देश देतील व त्याप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय नौकावहन मंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार व्यक्त केले असून नाविकांना कामावरुन घरी परतणे आता शक्य होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. बंदरांमध्ये जहाजांमधील क्रू बदल करण्यामधील अडचणी दूर होतील व या एसओपी च्या माध्यमातून हे काम सुलभरित्या होईल, असे ते म्हणाले. सध्या नाविकांना भेडसावणाऱ्या समस्या याद्वारे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात