वृत्तपत्रे वितरणाला मनाई करणार्‍या उद्धव ठाकरे सरकारला नोटीस ; २३ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचा आदेश

विशेष प्रतिनिधी

नागपूर : चिनी विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे कारण देत थेट वृत्तपत्रांचे वितरण बंद करण्याचा निर्णय घेणार्या उद्धव ठाकरे सरकारला नागपूर उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले आहे. वृत्तपत्रांची छपाई करा ,पण वितरण करु नका, असा अनाकलनीय आदेश ठाकरे सरकारने काढला आहे.

या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी वृत्तपत्रे वितरण बंदीविरुद्धच्या प्रकरणामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार व नागपूर महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून २३ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले. पुढच्या तारखेला सरकारचे उत्तर आल्यानंतर ही बंदी उठविण्याच्या विनंतीवर निर्णय दिला जाणार आहे.
महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांनी राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्देशाविरुद्ध रिट याचिका दाखल केली आहे.

त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्य सरकारने १८ एप्रिल रोजी बंदीचा आदेश जारी केला. याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी याला जोरदार विरोध केला. वृत्तपत्रे वितरणावरील बंदी अवैध, अतार्किक व राज्यघटनाविरोधी आहे. या बंदीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली आहे. तसेच, ही बंदी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांची पायमल्ली करणारी आहे असा दावा त्यांनी केला.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या दिशानिर्देशांमध्ये सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना प्रसार माध्यमांची सेवा अखंडित सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात वृत्तपत्रे वितरणाचा समावेश आहे. वृत्तपत्रे सुरुवातीपासूनच अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ आहेत. असे असताना राज्य सरकारने वृत्तपत्रे घरोघरी वितरणावर बंदी आणली आहे. या बंदीला कोणताही ठोस आधार नाही. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये काही बंधने लावण्याला व स्वच्छतेसंदर्भात प्रभावी मार्गदर्शकसूचना देण्याला काहीच हरकत नाही. परंतु, प्रसारमाध्यमांचा आवाज दाबणे मान्य केले जाऊ शकत नाही असे अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले.

“ई-कॉमर्सच्या माध्यमातून घरोघरी किराणा, भाजीपाला, खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू पोहचविण्याला आणि प्लंबर, मेकॅनिक आदींनी घरोघरी जाऊन सेवा देण्याची परवानगी दिल्यास मानसांचा एकमेकांसोबत संपर्क येतो. परंतु, वृत्तपत्रे वितरणामध्ये वाचक व हॉकर्सचा एकमेकांशी संबंध येत नाही. त्यामुळे सरकारची बंदी अतार्किक आहे,” याकडेही अ‍ॅड. चव्हाण यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच, त्यांनी ई-पेपर उपलब्ध आहे म्हणून, वृत्तपत्रे वितरणावर बंदी आणण्याच्या तर्काचादेखील विरोध केला.

सरकारी वकील अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करून याचिका खारीज करण्याची विनंती केली. कोरोनाचा फैलाव वाढत असल्यामुळे वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण बंद करण्यात आले आहे. वाचकांना ई-पेपर मिळत आहे. ई-पेपरवर बंदी नाही अशी बाजू त्यांनी मांडली. केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले. अ‍ॅड. चव्हाण यांना अ‍ॅड. निखिल किर्तने यांनी सहकार्य केले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात