माध्यमांवर संक्रांत; मंत्री आव्हाडप्रकरणी मेघा प्रसाद व ‘टाइम्स नाऊ’वर कारवाईचा गृहमंत्र्यांचा पोलिसांना आदेश

वांद्रे गर्दीप्रकरणी राहुल कुलकर्णी या एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पत्रकारास अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारने आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कथित कोरोनाबाधाची लपविल्याबद्दलची बातमी दिल्याप्रकरणी ‘टाइम्स नाऊ’विरोधात कारवाई अस्त्र उगारले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई  :  चीनी व्हायरसची पहिली चाचणी पाॅझिटिव्ह आली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक लपविली आणि त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या १६ जणांना बाधा झाली, अशा आशयाचे वृत्त देणारया ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीवर आणि मेघा प्रसाद या ‘टाइम्स नाऊ’च्या वरिष्ठ संपादकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

वांद्रे गर्दीप्रकरणी राहुल कुलकर्णी या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या पत्रकारास अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता आव्हाडप्रकरणी ‘टाइम्स नाऊ’ला लक्ष्य केले आहे. “टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने श्री जितेंद्र आव्हाड यांची मुलगी स्पेनमधून आली तेव्हा कोरोना पाॅझिटिव्ह होती, अशा स्वरूपाची खोटी बातमी दिवसभर प्रसारित केली. वास्तविकता, कोरोना बाधितांची नावे कोठेही प्रसिद्ध करू नयेत, अशी आचारसंहिता असताना तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये मुलींची नावे प्रसारित करू नये, असे नियम असतानाही टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने आव्हाड यांची मुलगी कोरोना बाधित नसतानाही बेछूटपणे त्यांच्या मुलीबाबत खोटी बातमी प्रसारित केली असून ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे वार्ताहर मेघा प्रसाद, अँकर आणि टाइम्स नाऊवर कठोर कारवाई करण्यात यावी,” असे अनिल देशमुख यांनी पोलिस महासंचालकांना आदेश दिले आहेत. याशिवाय या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावा, पोलिस उपायुक्त दीपक देवराज व सहायक पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यामार्फत चौकशी करण्याचेही आदेश देशमुख यांनी दिले आहेत.

मंत्री आव्हाड यांना चीनी व्हायरसची बाधा झाल्याच्या कथित वृत्तावरून गेले काही दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विशेषतः स्वतः आव्हाड यांनी आपण होम क्वारंनटाइनमध्ये जात असल्याची माहिती १२ एप्रिलरोजी दिल्यानंतर.  ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी, आव्हाड यांची पहिली चाचणी पाॅझिटिव्ह आली होती, मात्र दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याचे स्वतःहून जाहीरपणे सांगितले होते! त्याचवेळी आव्हाड यांच्या संपर्कातील (विशेषत, त्यांचे पाच अंगरक्षक, चालक हे सुद्धा) १६ जणांच्या चाचण्या पाॅझिटिव्ह आल्याचे सांगितले जात होते. मिलिंद पाटील यांच्या टिप्पणीच्या आधारावर ‘टाइम्स नाऊ’ने बातमी दिली होती. शिवाय त्यामध्ये आव्हाड यांची मुलगी १८ मार्चरोजी स्पेनमधून परतल्याचे आणि तरीही आव्हाड यांनी १८ मार्चपासून ‘होम क्वारंनटाइन’ न केल्याचा दावा ‘टाइम्स नाऊ’ने केला होता. एक मंत्री म्हणून आव्हाड यांची वागणे बेजबाबदारपणाचे असल्याची टिप्पणीही वृत्तवाहिनीने केली होती. याचा आव्हाड यांनी स्पष्ट इन्कार केला होता आणि स्वतःच्या चाचणीचा अहवालही ट्विटरवर प्रसिद्ध केला होता. “मी ८० हजार लोकांसाठी धडपडलो…पण माझ्याबद्दल असे खोटे पसरविले जात आहे. मला माफ करा, मी हारलो…”, अशी प्रतिक्रियाही आव्हाड यांनी दिली होती. मुख्यमंत्री उदधव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री जयंत पाटील, मंत्री व मुख्यमंत्री पुत्र आदित्य ठाकरे यांनी दूरध्वनीवरून काळजी व्यक्त केल्याचीही माहितीही आव्हाड यांनी दिली आहे. शिवाय, अनिल देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याच आधारावर देशमुख यांनी मेघा प्रसाद व टाइम्स नाऊवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात