विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात दरवाढ होण्याऐवजी 7 ते 8 टक्क्याने वीजदर कमी केल्याचे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने जाहीर केल्याने वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून विजेच्या दर वाढीचा आलेख वाढत राहिल्याने राज्यात मोठे उद्योग येत नव्हते. दर परवडत नसल्याने राज्यातून उद्योगाचे पलायन जवळच्या राज्यात होत असल्याने राज्याचा विकास मंदावला. त्यामुळे वीजदर कमी करण्याचा प्रयत्न यावेळी ऊर्जा विभागाकडून करण्यात आला. यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर थेट 10 ते 12 टक्क्यांनी कमी होणार आहेत. घरगुती विजेकरताचे दर 5 ते 7 टक्क्यांनी कमी होणार आहेत. शेतीसाठीचे वीजदर 1टक्क्यांनी कमी होणार आहेत.
मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर 7 ते 8 टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीजदर 8 ते 9 टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर 1 ते 2 टक्क्यांनी कमी होतील. मुंबईत बऱ्याच मोठया भागात टाटा आणि अदानी या कंपन्या वीज वितरण करतात. त्यांच्यासाठीही आयोगाने वीज दर कपात सुचविली आहे. त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर 18 ते 20 टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर 19 ते 20 टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल 10 ते 11 टक्क्यांनी कमी होणार आहेत. विजेच्या वाढत्या दरामागे विजेची गळती कारणीभूत असल्याने गळती कमी करण्याच्या सूचना देत त्वरित गळती कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App