पडद्या आडचा कोरोना लढवय्या ‘स्वास्थ’ वर्धन; पोलिओ निमूर्लनाच्या शिलेदाराची लागणार आता कसोटी!

तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्यांना  ‘स्वास्थ वर्धन’ असे म्हणायचे, तर माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या मते ते ‘सर्वोत्कृष्ठ आरोग्य मंत्री’ होते! तंबाकू सेवनाविरूद्ध देशातील पहिला कायदा ही डाॅ. हर्ष वर्धन यांचीच देणगी. स्वच्छ प्रतिमा, उत्तम चारित्र्य, बडेजाव न मिरवण्याचा स्वभाव, वाखाणले गेलेले प्रशासकीय कौशल्य आणि पोलिओ निर्मूलनातील लढवय्या अशी ओळख असलेल्या डाॅ. हर्ष वर्धन यांच्यावर आता कोरोनाच्या जागतिक संकटापासून भारताला सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली  :  फार कमी जणांना माहित असेल की पोलिओचा नायनाट करण्यामधील लढाईचा पहिला शिलेदार कोण होता? त्याचे नाव डाॅ. हर्ष वर्धन! दिल्लीचे आरोग्य मंत्री असताना 1995 ते 1998 च्या दरम्यान त्यांनी दहा लाख बालकांचे लसीकरण करून पोलिओविरूद्ध रणशिंग फुंकले होते. जागतिक आरोग्य संघटनेने त्यांना ‘पोलिओ निर्मूलन चॅम्पियन’ असा पुरस्कार देऊन सन्मान केला, तर पुढे संपूर्ण देशामध्ये ही मोहीम राबविली गेली. बघता बघता संपूर्ण भारत आता पोलिओमुक्त झाला…

म्हणून तर तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्यांना  ‘स्वास्थ वर्धन’ असे म्हणायचे, तर माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या मते ते ‘सर्वोत्कृष्ठ आरोग्य मंत्री’ होते! तंबाकूसेवनाविरूद्ध देशातील पहिला कायदा ही त्यांचीच देणगी. स्वतः डाॅक्टर, स्वच्छ प्रतिमा, उत्तम चारित्र्य, प्रामाणिकपणाची छबी, पदाचा बडेजाव न मिरवण्याचा स्वभाव, वाखाणले गेलेले प्रशासकीय कौशल्य आणि पोलिओ निर्मूलनातील लढवय्या अशी ओळख असलेल्या डाॅ. हर्ष वर्धन ( गोयल हे त्यांचे आडनाव आहे; पण ते वापरत नाहीत!) यांच्यावर आता कोरोनाच्या जागतिक संकटापासून भारताला सुरक्षित ठेवण्याचे आव्हान येऊन पडले आहे. चीनमधून उगम झालेला हा विषाणू हर्ष वर्धन यांच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठे आव्हान असेल, यात काही शंकाच नाही.

‘टीम’मध्ये महाराष्ट्राचे डाॅ. साळुंखे

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये ते आरोग्य मंत्री होते. पण केवळ पाच महिन्यांत त्यांना बदलून तिथे जे.पी. नड्डा यांना आरोग्य मंत्री केले गेले. त्याची कारणे अद्याप गुलदस्त्यात आहेत; पण तंबाकू लाॅबी त्यामागे असल्याचे चर्चिले गेले. पण दुसरया टर्ममध्ये त्यांना पुन्हा आरोग्यमंत्री करून मोदींना सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गरीबांना पाच लाखांचा आरोग्य विमा देणारी ‘आयुष्मान भारत’ची अंमलबजावणी, प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे मिशन, ‘एम्स’ या सर्वोच्च वैद्यकीय संस्थेच्या प्रमुख राज्यांमध्ये शाखा सुरू करणे आदींवर त्यांचे काम सुरू असतानाच कोरोनाचे संकट देशावर घोंघावले आहे. मग त्यांनी लगेचच आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम स्थापन केली. त्यात देशाचे आरोग्य महासंचालक ख्यातनाम डाॅक्टर राजीव गर्ग, भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे महासंचालक डाॅ. बलराम भार्गव आदी वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी आरोग्य संचालक डाॅ. सुभाष साळुंखे यांनाही डाॅ. हर्षवर्धन यांनी या टीममध्ये घेतले. राज्यांशी समन्वय साधण्याचे अवघड, महत्वाचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे.

चेहरा बनण्याचे टाळताना…

डाॅ. हर्ष वर्धन हे तसे मीडियापासून लांब राहणारे मंत्री म्हणून ओळखले जातात. चमकोगिरीचा प्रादूर्भाव त्यांना अद्याप झालेला नाही. म्हणून तर कोरोनाबाबत दररोज मीडियाला ते नव्हे, तर लव आगरवाल, भार्गव, गर्ग आदींची टीम माहिती देत असते. कोरोनाविरूद्ध एका अर्थाने हे युद्धच सुरू आहे. त्यामुळे युद्धाचा तपशील देण्यासाठी राजकीय नेता नव्हे, तर प्रोफेशनल्सची आवश्यकता असते, हे ओळखून ते स्वतः माध्यमांपासून दूर राहतात. याउलट महाराष्ट्रात आरोग्य मंत्री राजेश टोपे या लढ्याचा चेहरा झालेले आहेत. कदाचित मोदींचा चेहरा असताना स्वतःचा चेहरा तयार करणे, डाॅ. हर्ष वर्धन यांनी टाळले असावे. मात्र, पडद्याआड ते प्रचंड सक्रिय आहेत. रूग्णांची संख्या वाढणार हे गृहित धरून चाचण्यांची संख्या वाढविणे, त्यासाठी खासगी क्षेत्रांची मदत घेणे, विविध संशोधन संस्थांमध्ये समन्वय साधून राज्यांना मार्गदर्शन करणे, फक्त कोरोनाच्या उपचारांसाठी खास हाॅस्पिटल्सची संख्या वाढविणे, व्हेटिंलेटर्स- टेस्ट किट्स- विलगीकरण वार्डसच आदींची पुरेशी व्यवस्था करणे आदी आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. मोदींनी जनतेचे मानसिक स्वास्थ बळकट ठेवणे आणि डाॅ. हर्ष वर्धन यांनी जनतेचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुरेशी आरोग्य यंत्रणा उभी करणे, असे या कामाचे वाटप आहे.

दिल्ली विमानतळावर रात्रदिवस काम करणारया डाॅक्टरांचे मनोबल वाढविताना व तयारीचा आढावा घेताना डाॅ. हर्ष वर्धन

पुढील पंधरा दिवस अतिशय महत्वाचे असतील. भारत हा अमेरिकेच्या (संसर्गाच्या) आठ दिवस, तर इटलीच्या मागे पंधरा दिवस असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील पंधरा दिवसांमध्ये रूग्णांची संख्या नाट्यमयरीत्या वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. दुर्दैवाने तशी आरोग्य आणीबाणी उदभवलीच तर मग डाॅ. हर्ष वर्धन यांच्या नेतृत्वाची कसोटी लागेल. पोलिओ निमूर्लनाचा हा लढवय्या शिलेदार कोरोनाविरुद्धच्या लढाईचा शिलेदार होईल का, हे काही काळातच स्पष्ट होईल.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub