विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरीबांचे हाल कमी करण्याच्या हेतूने जाहीर केल्यानुसार पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून दीड कोटींहून अधिक सिलिंडर मोफत वाटण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली.
पेट्रोलियमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज विडिओ कॉन्फरन्सद्वारे सुमारे ८०० सिलिंडर डिलीव्हरी बॉइजशी संवाद साधला. आघाडीवर राहून कोरोनाशी दोन हात करणारे योद्धे अशा शब्दांत प्रधान यांनी त्यांचा गौरव केला. होम डिलीवरी करताना काय काळजी घेतली जाते, याची माहिती डिलीवरी बॉइजनी प्रधान यांना दिली.
तेल कंपन्यांनी डिलीवरी बॉइजना साबण, सँनिटायझर, मास्क, ग्लोव्ज पुरविले आहेत. प्रत्येक सिलिंडर डिलीवरीपूर्वी सँनिटाइज केला जातो, असेही यावेळी सांगण्यात आले.
कोरोना लॉकडाऊनमुळे गरीबांची आर्थिक स्थिती खालावते आहे. त्यांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून एप्रिल, मे, जून असे तीन महिने तीन सिलिंडर मोफत दिले जातील, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. सुमारे ८ कोटी गरीबांना याचा थेट लाभ होणार आहे. यापैकी दीड कोटी सिलिंडर मोफत वाटले गेले आहेत.
तेल कंपन्या दररोज ५० ते ६० लाख सिलिंडर भरून देतात. त्या पैकी १८ लाख सिलिंडर पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील मोफत योजनेत समाविष्ट करण्यात येतात, अशी माहिती प्रधान यांनी दिली. तसेच कंपन्या लाभार्थ्यांच्या खात्यात सिलिंडरच्या किमतीतील फरकाची रक्कमही जमा करीत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App