विशेष प्रतिनिधी
नाशिक : शहरात लॉकडाऊन सुरू असतानाच लोकांनी बाजारपेठा परस्पर उघडल्याने तुडुंब गर्दी होत आहे. सोशल डिस्टंसिंगचा पूर्ण फज्जा उडाला आहे. एवढेच नाही तर तोंडाला मास्क लावून फिरण्याची काळजी देखील कोणी घेताना दिसत नाही. या सर्व प्रकाराकडे प्रशासन आणि पोलिस हतबल होऊन पाहात आहेत.
मेन रोड, दहीपूल, कानडे मारुती लेन, भद्रकाली, फळ बाजार, चौक मंडई, फुले मंडई, सराफ बाजार, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, निमाणी, मार्केट यार्ड, पेठ फाटा, मखमलाबाद, अशोक स्तंभ, एमजी रोड, मेहेर, सीबीएस, सारडा सर्कल, जुने नाशिक, द्वारका, सिंहस्थ नगर, उपनगर, बिटको, नासिक रोड, लॅम रोड, देवळाली, विहितगाव, मुंबई नाका, इंदिरानगर, संपूर्ण सिडको, पाथर्डी फाटा, सातपूर, अंबड इत्यादी भागांमधील गर्दी अगदी पूर्वीप्रमाणेच सुरू आहे कोणाला कशाचीही भीती वाटत नाही !
दुकानदार आणि ग्राहक तोंडाला मास्क न लावता बिनधास्त वावरत आहेत सोशल डिस्टन्सींग वगैरे “अंधश्रद्धा” पार पुसून टाकल्या गेल्या आहेत! सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत काही सवलती आहेत. पण याच वेळेत प्रचंड गर्दी होते आहे.
मालेगाव, औरंगाबाद, अमळनेर, मुंबई, पुणे यांचा कोरोना फैलावाचा स्पीड बघता नाशिक संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात क्रमांक एक वर येण्याची परिपूर्ण आणि भक्कम तयारी नाशिककर करत आहेत. गेले तीन दिवस दुपारी तळपत्या उन्हात दहीपुल मेन रोड आणि इतर मध्यवर्ती मार्केटमध्ये उसळलेली गर्दी बघता नाशिककरांना क्रमांक एक वर जाण्याची किती घाई झाली आहे हे दिसून येते! संपूर्ण मध्यवर्ती मार्केटमध्ये किमान तीन लाख लोक वावरले असा प्राथमिक अंदाज आहे!
पोलीस व प्रशासन हाताश होऊन जे चालले आहे ते बघण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत कारण त्यांनाही त्यांचा जीव आणि कुटुंब आहे.
Array