संकटकालीन स्थितीत सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सुरु केलेल्या मदतीचा गैरफायदा घेत टवाळकी करणार्या युवकाला चांगलीच अद्दल घडविण्यात आली आहे. या महाशयांनी कोरोना संबंधित हेल्पलाईनवर ‘गरम सामोसे पाठवा’ अशी ऑर्डर दिली होती.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : कोरोना व्हायरसच्या माहितीसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर टवाळकी करत गरम सामोसे पाठवा म्हणणार्या युवकाला प्रशासनाने चांगलाच धडा शिकविला आहे. या युवकाला पकडून त्याला गटार साफ करण्याची शिक्षा देण्यात आली. यातून टवाळखोरांनी धडा घ्यावा यासाठी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील युवकाचा गटार साफ करतानाचा फोटो रामपूरच्या जिल्हाधिकार्यांनी ट्विट केला आहे.
संपूर्ण देश कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये आहे. प्रशासनाकडून यावर लढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनांकडून हेळ्पलाईन तयार करण्यात आल्या आहेत. गरजूंना यावर माहिती देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काही टवाळखोर या हेल्पलाईनवर गंमत करत आहेत.
रामपूरच्या एका युवकाने फोन करून ‘गरमागरम समोसे भिजवा दो’ असे सांगितले. कंट्रोलरूमचे गांभीर्य न ठेवता त्या तरुणाने विनाकारण फोन करत समोसा मला खाण्यासाठी पाठवा असे सतत फोन केले. वैतागलेल्या कर्मचार्यांनी हा प्रकार जिल्हाधिकारी यांच्या कानावर घातला. पोलीसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. त्याला शहरातील गटारे साफ करण्याची शिक्षा देण्यात आली.
खोडसाळपणे कोणी कर्मचार्यांना त्रास दिला तर सहन केला जाणार नाही. त्यामुळे युवकांकडून साफसफाई करून घेत असल्याचे रामपूरच्या जिल्हाधिकार्यांनी ट्विटरवर फोटो प्रसिध्द करत सांगितले. हेल्पलाईनवर फोन करून काही जण गप्पा मारतात, पिझ्झा मागतात, कोणी औषधांच्या गोळ्यांची मागणी करतात. यामुळे हेल्पलाईनवर गांभिर्याने काम होत नाही. त्यामुळे हा धडा शिकविण्यात आला.
जिल्हाधिकार्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, ही गंमत करण्याची वेळ नाही. संकटाच्या प्रसंगी सर्वांनी शांतपणे घरात राहायला हवे. कंट्रोल रुमची हेल्पलाईन अकारण व्यस्त ठेवणे योग्य नाही. यामुळे खरोखरच गरजू असणार्या व्यक्तीला फटका बसू शकतो. नागरिकांनी समाजिक भान ठेवत तारतम्याने वागले पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App