विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : कोरोना पाठोपाठ सारी या रोगाने मराठवाडा आणि विदर्भात शिरकाव केला असून त्याला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या ‘सारी’ (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) आजार पूर्वीपासून आहे. कोरोनामुळे या आजाराबद्दल जागरूकता आली आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये यांना सारीच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमरावतीत सारीचे आतापर्यंत २२ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सारी व कोरोना रोगाची तपासणी व्हावी, यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी दिली, तर राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांनी बाह्यरुग्ण व आंतररुग्णांचे ‘सारी’ आजारासंदर्भात सर्वेक्षण करावे, असे निर्देश पुणे येथील राज्य आरोग्य सेवेच्या संचालक अर्चना पाटील यांनी यापूर्वीच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आदी या आजाराची लक्षणे आहेत. अशा रुग्णांना १०८ अॅम्ब्यूलन्समधून कोविड -१९ साठी निश्चित केलेल्या १०० व त्यापेक्षा जास्त बेड असलेल्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी संदर्भित करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. ‘सारी’च्या रुग्णांची नोंद नॉन कोविड सिग्नोमॅटिकमध्ये करण्यात आली आहे.
सारीबद्दल औरंगाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, ‘‘सारीग्रस्त व्यक्तीची श्वासोच्छश्वास घेण्याची गती अर्थात रेस्पारेशन रेट ४५ प्रती मिनिट असते. श्वास घेताना हा पेशंट धापा टाकतो. एखादा श्वान जीभ काढून जशा धापा टाकतो अगदी तशाच धापा हा रुग्ण श्वास घेताना टाकतो. या मुख्य लक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे असते. व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेकशन हे सारीचे मूळ आहे. हा आजाराची सुरवात होताना आपले शरीर आपणास जागे करते. त्यावेळी आपण अंगावर आजार काढला की हा त्रास सुरू होतो. थोडक्यात कोणतेही लक्षणे अंगावर काढू नये. दुखणे अंगावर काढणे, मनानेच उपचार घेणे कधी आयुर्वेदिक तर कधी होमिओपॅथी घेतली जातात तर कधी बऱ्याचदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलवरून औषधी घेतली जाते, ही पद्धती बदलण्याची गरज आहे.’’
सारीची लक्षणे
दोन्हींची लक्षणे सारखीच कोरोनाचा संशयित रुग्ण पुढच्या स्टेजमध्ये आला, की एकदम सुरवातीचे लक्षण जसे खोकला, ताप असते. त्यावेळी आपण अशा रुग्णाची कोरोना आहे की नाही टेस्ट करतो, स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत पाठवतो; पण काही रुग्ण ट्रेमण्डस स्टेजला आले तेव्हा ते रुग्ण व सारी रुग्ण सारखेच वाटतात.
आधीही सारी होताच सारीचे रुग्ण आतापासून नाहीत. डेंगी, स्वाइन फ्लूसारखाचे बऱ्याच वर्षांपासून सारीचे रुग्ण आहेत. स्वाइन फ्लू, डेंगी होता तेव्हाही सारी होता. सारीने दरवर्षी मृत्यू होतात; पण कोरोना व सारीची लक्षणे सारखीच असल्याने आता सारीकडे विशेषतः लक्ष देणे आवश्यक आहे. कारण कोणताही कोरोनाचा रुग्ण मिस व्हायला नको, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘कोरोनामुळे सारीकडे लोकांचे लक्ष गेले व सारीकडे लक्ष गेल्याने त्यातून होणाऱ्या मृत्यूकडे लोकांचे लक्ष गेले. त्यामुळे सारीबद्दल जागरूकता वाढली. जी आधी अनास्थाही होती; पण चुकून समजा सारीचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला तर मग मात्र त्या रुग्णाला कोरोना आहे असे स्पष्ट होते. मग त्या रुग्णाच्या आजूबाजूला चारही दिशेने तीन किलोमीटरपर्यंत घराची तपासणी करून कोरोनाची लागण झाली की नाही यासाठी सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. म्हणूनच आपल्याला सारीकडे लक्ष द्यावे लागेल.’’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App