विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाविरोधातील आपल्या सामूहिक लढ्यात ‘एक राष्ट्र’ हीच भावना आपल्याला मोठे यश मिळवून देईल, असे विचार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
हिंदू इकॉनॉमिक फोरम, मुंबईच्या वतीने ‘कोविडपश्चात काळात भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आज आयोजित करण्यात आले होते, त्यात ते बोलत होते. भारताकडे सक्षम अशी रिझर्व्ह बँकेसारखी शीर्षस्थ संस्था, बाजारात मागणी निर्माण करण्याची गरज, व्यावसायिकांना लागणारे भांडवल अशा अनेक विषयावर त्यांनी मत व्यक्त केले आणि कार्यक्रमात डिजिटल माध्यमातून उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे सुद्धा दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोविडमुळे सर्वाधिक फटका अमूक एखाद्या क्षेत्राला बसेल, असे समजण्याचे काहीच कारण नाही. सर्वच क्षेत्रं यामुळे प्रभावित होणार आहेत. पण, त्याचवेळी अशी संकटं अनेक नवीन संधी सुद्धा निर्माण करीत असतात. त्याकडे आपल्याला लक्ष केंद्रीत करावे लागेल. एक राष्ट्र म्हणून भावना ठेवत या समस्येवर आपण निश्चितपणे मात करू शकू.
या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग हे एकमेव शस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहे. हे ओळखून आपल्याला या परिस्थितीत जगण्याची सवय आता करून घ्यावी लागेल. गरज ही शोधाची जननी असते. त्यामुळे या परिस्थितीची सवय करीत आर्थिक गतिविधी पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण पर्यायांचा शोध प्रत्येकाला घ्यावा लागणार आहे. यातून अर्थव्यवस्था सुरळीत करण्यात प्रत्येकाला योगदान देण्याची संधी आहे.
संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रात रोजगार सुरक्षित राहतील, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. गुंतवणूकदार येतात, तेव्हा ते देशाची, राज्याची आर्थिक स्थिती ही ज्या काही मापदंडांच्या आधारावर तपासत असतात, ते राखण्याचेही आव्हान आपल्यापुढे असेल, असे फडणवीस म्हणाले.
भाजपा अल्पसंख्यक आघाडीशी संवाद भाजपा अल्पसंख्यक आघाडीच्या पदाधिकार्यांशी फडणवीस यांनी संवाद साधला आणि सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. अल्पसंख्यक मोर्चाचे कार्यकर्ते सुद्धा कोरोनाच्या काळात सर्वांना मदतीसाठी तत्पर असल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. अल्पसंख्यक समुदायाला रेशनचे धान्य न मिळणे,
घरकाम करणार्या घरेलू कामगारांच्या समस्या, डायलिसीस आणि केमोथेरपी यासारख्या उपचारांकडे सुद्धा प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असे अनेक मुद्दे यावेळी उपस्थितांनी मांडले. रमजानच्या महिन्यात कोणताही गरजू मदतीविना वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन फडणवीस यांनी शेवटी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App