विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोना विषाणूवर मात करण्याच्या लढ्यात पुण्यातून आणखी एक ज्येष्ठ उद्योगपती पुढे सरसावले आहेत. अभय फिरोदिया यांच्या फोर्स मोटर्सतर्फे कोरोना विरुद्धच्या लढ्यासाथी 25 कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे दिली जाणार आहेत.
कोरोनाच्या उद्रेकामुळे आणीबाणीचे संकट देशासमोर उभे ठाकले आहे. अशावेळी आपण समर्पित भावनेने त्याचा सामना केला पाहिजे. समाज आणि देशाप्रतीचे सेवा कर्तव्य बजावण्यासाठी पुढे आले पाहिजे, या शब्दात अभय फिरोदिया यांनी मनोगत व्यक्त केले. फोर्स मोटर्स आणि जय हिंद इंडस्ट्रीच्या वतीने आरोग्य सुविधांच्या उभारणीसाठी 25 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. जागतिक महामारी घोषित झालेल्या या साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 14 एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यास देशवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कारण बधितांची संख्या अचानक वाढल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी रुग्णालयांवर ताण येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांच्या आधुनिकीकरणावर भर देणार असल्याचे फिरोदीया यांनी म्हटले आहे. गेल्या सात दशकापासून ‘जयहिंद’ शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सामजिक उत्तरदायीत्वाच्या भावनेने काम करत आहे.
विविध रुग्णालये, समाजसेवी संस्था आणि मराठा चेंबर फाउंडेशनच्या सहकार्याने सामान्य नागरिकांसाठी आणि उद्योग संस्थांमध्ये वैद्यकीय सुविधा उभारण्यात येतील. आरोग्य सुविधांची उभारणी, रक्त संकलन क्षमतेत वाढ, मोबाईल क्लिनिक आणि कोरोना चाचणीच्या क्षमतेत वाढ करण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यातल्या ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी शंभर कोटींची देणगी जाहीर केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App