विशेष प्रतिनिधि
मुंबई : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी अतिशय तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे कापूस, तूर, चणा खरेदीकेंद्र मोठ्या प्रमाणात सुरू करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
फडणवीस म्हणतात की, लॉकडाऊन हे कोरोनावर मात करण्याचे प्रभावी आणि एकमेव अस्त्र असले तरी हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणेही आवश्यक आहे. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकर्यांच्या समस्या त्वरेने सोडविल्यास याला फार मोठा हातभार लागेल. खरीप हंगाम आता तोंडावर येऊन ठेपला आहे. आता मशागतीच्या कामांना सुद्धा प्रारंभ होत आहे.
बी-बियाणे, खते इत्यादींसाठी शेतकर्यांच्या हाती पैसा असणे जरूरी आहे आणि पैसा यायचा असेल तर शेतमालाची खरेदी सुरू होणे आवश्यक आहे. कापूस, तूर, चणा इत्यादींची खरेदी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आली असल्याने शेतकर्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चण्याची खरेदी तर सुरूच झाली नसल्याने पूर्णपणे शेतकर्यांच्या घरात पडून आहे.
खरेदीची प्रक्रिया अशीच राहिल्यास शेतकर्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे लगेचच खरेदीची यंत्रणा सक्षम करून शेतकर्यांना दिलासा द्यावा. शेतमाल खरेदी झाला तरच त्यांच्या हाती पैसा येईल आणि त्यांना पुढच्या हंगामाच्या कामाला लागता येईल. त्यामुळे सर्वच ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावीत.
व्यापारी वर्गासोबत संवाद देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध व्यापारी संघटनांसोबत संवाद साधला. फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, बॉम्बे आयर्न मर्चंट असोसिएशन, मास्मा, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, सीड असोसिएशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया गोल्ड होलसेल मर्चंट, मुंबई ग्रेन डिलर्स, महाराष्ट्र मोटार पार्ट डिलर्स आदी संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी केंद्र सरकारने आता अनेक सवलती दिल्या आहेत. आरोग्याची काळजी घेत शक्य तितक्या सवलती दिल्या जात आहेत. असे असले तरी अतिशय विचित्र स्थितीला आपण सारेच सामोरे जात आहोत. येणार्या काळात या स्थितीसोबत जगणे आपल्याला शिकून घ्यावे लागेल.
मला आनंद आहे की, या सर्व व्यापारी संघटना केवळ आपल्या मागण्या ठेवत नाहीत, तर आपआपल्या परीने प्रत्येक गरजूला मदत देण्याचा सुद्धा प्रयत्न करीत आहेत. आपली जी काही क्षमता आहे, त्याचा पूर्ण वापर करून आपल्याला मदत करायची आहे.
व्यावसायिक विमा दाव्यांचा निपटारा, विविध सरकारांकडे असलेली देयकांचे पेमेंट, रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी होत असलेल्या घोषणांची बँकांकडून प्रभावी अंमलबजावणी,
असंघटित क्षेत्राच्या समस्या, रोजगार सुरक्षित राखून मनुष्यबळाचा सुयोग्य वापर अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. या चर्चेत राज पुरोहित, राम अवतार, प्रदीप पेज्वानी, राजीव सिंघल, विनेश मेहता, आशीष मेहता, राजेश शाह, कमल पोद्दार, जयकृष्ण पाठक, ललित बरोडिया, निमित शाह, रामनिक छेडा, समीर कनाकिया, शरद शाह, प्रमोद ठक्कर, अतुल धमेशा, पृथ्वीराज कोठारी, राजेंद्र बरवाडे, ग्यानचंद गोयल, पृथ्वी जैन, शंकर केजरीवाल, राजु राठी, जयेश ओस्वाल, सजराज पगारिया या चर्चेत सहभागी झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App