शरद पवार ‘नॉट आऊट 53’; नवव्यांदा झाले खासदार -सर्वाधिक संसदीय कारकिर्द असणारे मराठी नेते


विशेष प्रतिनिधी

पुणे : सलग दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून जात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नव्या विक्रमाकडे पाऊल टाकले आहे. लोकसभेत सातवेळा आणि राज्यसभेत दुसऱ्यांदा असे नवव्यांदा खासदार होण्याचा मान ऐंशी वर्षांच्या पवारांनी मिळवला; शिवाय सर्वाधिक काळाची संसदीय कारकिर्द असणारे मराठी नेते असाही विक्रम पवारांच्या नावे नोंदला गेला आहे.

22 फेब्रुवारी 2017 मध्ये पवारांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली होती. मराठी नेत्यांमध्ये पवारांच्या पाठोपाठ शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख आहेत. सध्या 93 वर्षांचे असणाऱ्या देशमुख यांनी तब्बल 12 वेळा  महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यांची संसदीय कारकिर्द तब्बल 47 वर्षांची आहे. पवारांनी राज्यसभेची पहिली टर्म पूर्ण करुन गणपतराव देशमुख यांना थेट सहा वर्षांनी मागे टाकले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा लोकशाहीतल्या चारही सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याची दुर्मिळ संधी पवारांना लाभली आहे.

सन 1967 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून पवार आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 72, 78 मध्येही त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. सन 1984 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 1991, 1996, 1998, 1999, 2004 आणि 2009 अशा लोकसभेच्या एकूण सात निवडणुका त्यांनी जिंकल्या. एप्रिल 2014 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर आता मार्च 2020 मध्ये त्यांची राज्यसभेतील दुसरी टर्म सुरु होत आहे.

दीर्घ संसदीय  कारकिर्दीच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानी असणारे पवार राष्ट्रीय पातळीवर मात्र मागे आहेत. मणीपुरचे रिशींग किशींग, तामिळनाडूचे एम. करुणानिधी आणि पंजाबचे प्रकाशसिंग बादल हे ज्येष्ठ नेते या बाबतीत पवारांच्या पुढे आहेत. वयाच्या 97 व्या वर्षी निधन पावलेले किशींग यांची संसदीय कारकिर्द देशात सर्वात प्रदीर्घ आहे. किशींग हे 1952 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते. वयाच्या 94 व्या वर्षी सन 2014 मध्ये ते स्वेच्छेने राज्यसभेतून निवृत्त झाले. तोपर्यंतची त्यांची संसदीय कारकिर्द सलग 62 वर्षांची आहे.

तामिळनाडूतील द्रमुक नेते एम. करुणानिधी  1957 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. एकूण 13 वेळा ते आमदार झाले. करुणानिधी यांची संसदीय कारकिर्द 59 वर्षांची आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल 1957 मध्ये पहिल्यांदा पंजाब विधानसभेत निवडून गेले. बादल यांच्या संसदीय कारकिर्दीनेही पन्नाशी ओलांडली आहे.

याशिवाय, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते ज्योती बसू यांची संसदीय कारकिर्द देखील 48 वर्षे इतकी प्रदीर्घ आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेत 1952 मध्ये पहिल्यांदा निवडून गेलेल्या बसू यांनी आयुष्यात 11 निवडणुका जिंकल्या. 21 जून 1977 ते 6 नोव्हेंबर 2000 अशी सलग 23 वर्षांपेक्षा जास्त काळ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी बसू होते. तरुण गोगोई सहावेळा लोकसभेत निवडून गेले आणि 2001 ते 2016 दरम्यान सलग तीनदा त्यांनी आसामचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांची संसदीय कारकिर्दही चाळीस वर्षांपेक्षा मोठी आहे.

फादर ऑफ द हाऊस

लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून जाण्याचा विक्रम कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या इंद्रजित गुप्त यांच्या नावावर जमा आहे. 1960 च्या पोटनिवडणूकीत कोलकात्यातून पहिल्यांदा विजयी झालेले गुप्त तब्बल अकरावेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. या विक्रमामुळे गुप्त यांचा उल्लेख ‘फादर ऑफ द हाऊस’ असा केला जात असला तरी त्यांची संसदीय कारकिर्द तुलनेने कमी म्हणजे  37 वर्षांची आहे.

अटलबिहारी वाजपेयी (उत्तर प्रदेश), सोमनाथ चॅटर्जी (पश्चिम बंगाल) आणि पी. एम. सईद (लक्षद्वीप)  या तिघांच्या नावावरही लोकसभेत दहावेळा निवडून जाण्याचा विक्रम जमा आहे. सक्रीय राजकारणातून 2009 मधून निवृत्त झालेल्या वाजपेयींची संसदीय कारकिर्द पन्नास वर्षांची आहे. सोमनाथ चॅटर्जी यांनी पस्तीस वर्षे संसदेत होते. पी. एम. सईद 1967 ते 2004 या काळात सलग दहादा लोकसभेत तर त्यानंतर राज्यसभेत निवडून गेले. त्यांची संसदीय कारकिर्द 38 वर्षांची ठरली. जॉर्ज फर्नांडिस, माधवराव शिंदे (मध्य प्रदेश) आणि गिरीधर गमांग व खगपती प्रधानी (ओरिसा) या नेत्यांनीही तब्बल नऊवेळा लोकसभेत निवडून जाण्याचा पराक्रम केला आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात