वारीची परंपरा खंडित होणार नाही, कोरोनाची काळजीही घेणार; फडणवीस- वारकरी चर्चा

विशेष प्रतिनिधी

नागपूर : असंख्य वर्षांची परंपरा असलेली पंढरीच्या वारीची परंपरा खंडित होणार नाही. पण, त्याचवेळी कोरोनाच्या संकटात आवश्यक असलेली सर्व ती खबरदारी घेण्यात येईल, असा सूर आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून निघाला.

वारकरी प्रतिनिधींशी झालेल्या या संवादात प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे अ‍ॅड. विकास ढगे पाटील, दिंडी संघटनेचे राणा महाराज वासकर, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संत सोपानकाका संस्थान, सासवडचे श्रीकांत गोसावी, संत एकनाथ महाराज पालखी सोहोळ्याचे रघुनाथबुवा पालखीवाले, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे संजय महाराज धोंडगे, संत आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे रवींद्र भैयासाहेब पाटील, संत नामदेव महाराज संस्थानचे बळीरामजी महाराज सोळंके, श्री विठ्ठल-रूख्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे गहिनीनाथ महाराज औसेकर, विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ, शिवाजी महाराज मोरे, आचार्य तुषार भोसले आणि फेसबुक दिंडीचे स्वप्नील मोरे इत्यादी सहभागी झाले होते.

आगामी वारीच्या नियोजन आणि वारकरी संप्रदायाच्या भावना यासंदर्भात ही चर्चा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने झाली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या असंख्य वर्षांची परंपरा खंडित न होऊ देता, पण, कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी घेत, वारकर्‍यांची काळजी घेत ही परंपरा पुढे नेण्याचा जो संकल्प आपण सर्वांनी केला आहे, तीच आम्हा सर्वांची सुद्धा भावना आहे. सरकारकडेही त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. या संकटकाळात समाजाला सोबत घेत, समाजाला जागे करण्याचे काम वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात करीत आहे. आपली वारकरी परंपरा किती मोठी आहे, याचेच प्रत्यंतर यातून येते. मला आनंद आहे की, कोरोनाचे संकट असले तरी वारीची परंपरा खंडित होणार नाही. वारकरी प्रतिनिधींनी तीन प्रस्ताव सरकारला दिले आहेत आणि या कठीण काळात सर्वांनी सहकार्य करण्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे.

नागपुरातील सेवाकार्यांना भेटी
देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात भारतीय जनता पार्टीतर्फे सुरू असलेल्या विविध सेवाकार्यांना भेटी दिल्या. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात सोमलवाडा, मनिषनगर, दक्षिण नागपूर मतदारसंघात सक्करदरा, उत्तर नागपूर मतदारसंघात प्रल्हाद लॉन टेकानाका येथे त्यांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि सेवाकार्याची माहिती जाणून घेतली. गेल्या महिन्याहून अधिक काळापासून कार्यकर्ते हे काम करीत असल्याबद्दल त्यांनी कौतूकही केले.

या दौर्‍यात आमदार प्रा. अनिल सोले, मिलिंद माने, आ. मोहन मते, रामदास आंबटकर, अविनाश ठाकरे, किशोर वानखेडे, विशाखा मोहोड, जयश्री वाडिभस्मे, मुन्ना यादव, वनिता दांडेकर, आशीष पाठक, बंडु राऊत, देवेंद्र दस्तुरे, विक्की कुकरेजा, प्रभाकरराव येवले, सुरेंद्र यादव त्यांच्यासोबत होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*