मा. उद्धव ठाकरे….सप्रेम नमस्कार, विनंती विशेष
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून काही विनंत्या केल्या आहेत. “कोरोनाशी लढताना आपण घेत असलेल्या सर्व निर्णयांना भाजपा म्हणून आमचा पाठिंबा आणि सहकार्य आहेच. मात्र काही महत्वाच्या बाबतीत हस्तक्षेप करून जनहिताच्या दृष्टीने आपण त्वरेने निर्णय घ्यावे,” अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काही मुद्यांवर फडणवीस यांनी ठाकरे यांच्याशी दूरध्वनीद्वारेही चर्चा केली आहे.
ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात की, संपूर्ण देशात तसेच राज्यात आपण सारे कोरोनाविरोधातील लढा लढतोय. हा लढा येणाऱ्या काळात अधिकाधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे अधिक नियोजनातून आपल्याला मार्गक्रमण करावे लागणार आहे. राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. दररोज मी राज्यातील विविध घटकांशी संवाद साधत असून, त्यातून प्रामुख्याने तक्रारी रेशन धान्यासंदर्भात आहेत. वस्तुतः केंद्र सरकारने ३ महिन्यांचे धान्य रेशनमार्फत मोफत देण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना आणि त्यापैकी ९० टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला असताना सुद्धा त्याच्या वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे. त्यामुळे यात आपण स्वतः लक्ष घालावे.
“सुमारे १६ राज्यांनी रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनासुद्धा धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात सुद्धा असा निर्णय घेणे सहज शक्य आहे,” असे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात आणून दिले आहे. अतिरिक्त लागणारे धान्य केंद्र सरकार अत्यल्प दरात उपलब्ध करून देत असले तरी वाटपातील साठा शिल्लक राहत असल्याने त्याची गरज पडणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोटा उपलब्ध दिल्याप्रमाणे प्रत्येकाला ३ महिन्यांचे धान्य त्वरित उपलब्ध करून द्यावे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, त्याचे आधारकार्ड प्रमाण मानून त्यांना धान्य उपलब्ध करून द्यावे तसेच ज्यांच्याकडे दोन्ही नाही अशांची यादी तयार करून ती यादी प्रमाणित करून त्यांनाही धान्य सहज उपलब्ध करून देता येईल, असे फडणवीस यांनी सुचवले आहे.
मुंबईतील आरोग्य व्यवस्था आणि एकूणच लॉकडाऊनच्या काळातील परिस्थिती याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. रुग्णालयातील स्थिती आणि प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि अन्य आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसंदर्भात सुरक्षा उपाययोजनांची कमतरता मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. या बाबतही त्वरित उपाय योजना करण्याची नितांत गरज आहे. मात्र अद्यापही याबाबतचे उचित प्रोटोकॉल्स कार्यान्वित न झाल्याने अग्रीम पंक्तीतील आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स देखील रोगाने ग्रसित होतांना दिसत आहेत. यावर अत्यंत त्वरित निर्णय घ्यावे, असे फडणवीस यांनी सुचवले आहे.
तबलीगकडे पाहताना धार्मिक अभिनिवेश नको
‘तबलीग’मधून आलेले अनेक लोक महाराष्ट्रात तसेच इतर राज्यातही गेले आहेत. दिल्लीतील कार्यक्रमातील उपस्थित असलेले नागरिक तसेच त्यांच्या संपर्कांत आलेले अन्य संशयित यांच्या संदर्भातही कठोर पावले उचलण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारचा धार्मिक अभिनिवेश न बाळगता कठोर कारवाई करावी, अशीही विनंती फडणवीस यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आज भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या यादीत ही संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच अत्यंत कडक कारवाई या संदर्भात अपेक्षित आहे. महाराष्ट्र व मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App