विशेष प्रतिनिधी
मुंबई : “७० हिंदी, ४० मराठी आणि १० ओटीटी अशा ११० मालिकांची चित्रीकरणे कोरोनामुळे थांबली आहेत. ३ लाख कामगार व तंत्रज्ञ यांच्या रोजीरोटीवर यामुळे परिणाम झाला आहे. संगितले. ३० हजार एपिसोड दर वर्षी तयार होतात. ५ हजार कोटींची गुंतवणूक हिंदी मालिकांची तर २५० कोटींची गुंतवणूक यात आहे,” अशी गंभीर समस्या ज्येष्ठ निर्माते नितीन वैद्य यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
चित्रीकरणास परवानगी देण्याची मागणी कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आराखडा द्या, विचार करु, असे उत्तर देत त्यांची बोळवण केली.
“शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार यांच्याशी ते आज संवाद साधत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीचे सूत्रसंचालन सुबोध भावे, आदेश बांदेकर यांनी केले. खासदार डॉ अमोल कोल्हे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रसाद कांबळी, निखिल साने, नितीन वैद्य, सुनील फडतरे, केदार शिंदे अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे, विद्याधर पाठारे, आदींनी सूचना केल्या.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, लॉकडाऊनबाबत काही जण माझ्यावर टीका करीत आहेत. पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीकेचा धनी होईन. लॉकडाऊन करणे म्हणजे सर्व थांबविणे असे मी म्हणत नाही. योग्य ती काळजी घेऊन आपण उद्योग-व्यवसाय- दुकाने आपण सुरु केले आहेत. कंटेनमेंट झोन वगळून काही प्रमाणात व्यवहार सुरु झालेच आहेत. पण अद्याप संकट घोंघावते आहे.
माझ्यावरील टीकेला लगेच उत्तर देणार नाही, असे सांगून ठाकरे म्हणाले, “आता मला माझी जबाबदारी पार पाडणे महत्वाचे वाटते आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सर्वांची काळजी मी घेणारच.”
यावेळी कला क्षेत्राकडून अन्य मागण्याही झाल्या. निर्मात्यांना विना तारण कर्ज तसेच कमी व्याजाचे कर्ज, एक पडदा चित्रपटगृहाना वाचविणे, गरीब संगीतकारांना मदत, मराठी चित्रपटाना अनुदान रक्कम देणे, चित्रपट निर्मिती जीएसटी माफ करणे, सांगली-कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी देणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. येणाऱ्या गणपती व पुढील हंगामासाठी शारीरिक अंतर, मास्क घालणे आदि नियम पाळून विविध शो आणि कार्यक्रमाना परवानगी मिळावी त्यमुळे नुकसान काही प्रमाणात भरून निघेल असेही काही जणांनी सांगितले. मात्र यावरही ठाकरे यांनी ठोस उत्तर दिले नाही.
“महाराष्ट्रातले करमणूक आणि मनोरंजन क्षेत्र मोठे आहे. यावर रोजीरोटी कमावणारे लहान मोठे कलाकार तर आहेतच शिवाय तंत्रज्ञ, बॅक स्टेज कलाकार, कामगार हा वर्गही मोठा आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,” असे ठाकरे म्हणाले.
यावेळी अनेक निर्मात्यांनी चित्रीकरण व पोस्ट प्रॉडक्शन सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत सूचना केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व नियम पाळून मर्यादित स्वरूपात का होईना चित्रीकरण सुरु करण्याचा विचार करता येईल. “नाट्य आणि चित्रपटगृहे ही सार्वजनिकरीत्या एकत्र येण्याची ठिकाणे असल्याने तिथे लगेच काही परवानगी देता येईल असे वाटत नाही,” असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App