भारताच्या सीमेवरील चीनच्या कारवाया चिथावणीखोर


  • अमेरिकेने व्यक्त केली नापसंती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या सीमेवरील चीनचे वर्तन हे त्रासदायक आणि भारताला प्रक्षुब्ध करणारे असल्याची टीका अमेरिकेने केली आहे. केवळ भारताच्या सीमेवरच नव्हे तर दक्षिण चीनच्या समुद्रातही चीनकडून नेहमीच चिथावणीखोर आणि त्रासदायक वर्तन केले जाते, या शब्दात अमेरिकेने चीनवर ताशेरे ओढले आहेत.

लडाख आणि सिक्किममधील भारत आणि चीन यांच्या सीमेवरील वाढत्या ताणतणावाच्या परिस्थितीबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. लडाखमधील पांगोंग त्सो आणि गालवान व्हॅलीच्या आसपासच्या चिनी सैन्याने आक्रमक हालचाली सुरु केल्यानंतर अमेरिकेने चीनवर टीका केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील दक्षिण आणि मध्य आशिया विभागाच्या प्रमुख अँलिस वेल्स यांनी स्पष्टपणे चीनचे नाव घेत टीका केली आहे. चीनी विषाणूचा उद्रेक झाल्यापासून अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी शीतयुद्ध आणखी भडकले आहे. या पार्श्वभूमीवर चीनविरोधात भारताच्या बाजुने अमेरिकेने वक्तव्य करणे महत्वाचे मानले जात आहे.

मे महिन्याच्या सुरवातीला चीनने गलवान नदीजवळ तंबू ठोकल्याची बातमी आली. वेल्स यांनी म्हटले आहे की, आपल्या वाढत्या शक्तीचा वापर चीन ज्या पद्धतीने करु पाहते आहे ते प्रश्न निर्माण करणारे आहे. लडाखच्या सीमेवर चीनी सैन्य अकारण आक्रमक होत असल्याचा आरोप भारतीय सैन्याने मे महिन्याच्या सुरवातीला केला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंनी चकमक उडाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजुने ही चकमक घडली. लडाखमधील विवादास्पद अक्साई प्रदेशाला चीन स्वतःचा प्रदेश मानते. याच महिन्याच्या सुरवातीला सिक्कीममधील नथुला येथे भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले. या चकमकीत दोन्ही बाजुच्या सैनिकांना किरकोळ दुखापती झाल्या.

या प्रदेशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने सुरु आहे. तीन वर्षांपुर्वी चिनी सैन्याने सिक्कीम सीमेवरील डोकलाम येथे 74 दिवस तळ ठोकून बांधकामे करण्याचा प्रयत्न केला. सिक्किम सेक्टरमधील वादग्रस्त भाग हा चीनचा “सार्वभौम प्रदेश” असल्याचा दावा करत चीनने भारतीय सैन्यदलाचे रस्त्याचे बांधकाम अडवले होते. त्यानंतर चीनने भारतीयांसाठी पवित्र मानली जाणारी कैलास मानसरोवरची वार्षिक यात्रादेखील थांबविली.

भारताच्या सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या चीनने दक्षिण चीन समुद्रावरही सार्वभौमत्वाचा दावा केला आहे. त्यावर तैवान, फिलिपाईन्स, ब्रुनेई, मलेशिया आणि व्हिएतनाम या देशांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून त्यांनीही आंतरराष्ट्रीय समुदयाकडे चीनविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण चीन समुद्राच्या मुद्यावरुन अमेरिकेने चीनविरोधात सातत्याने भूमिका घेतली आहे. आता भारत-चीन सीमावादातही अमेरिका उघडपणे भारताच्या बाजूने बोलू लागल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण नव्या वळणावर येऊन पोहोचल्याची नांदी झाली आहे.

चिनी विषाणूच्या उद्रेकानंतर चीनमधील अनेक अमेरिकी-युरोपीय कंपन्यांनी चीनमधून काढता पाय घेण्याचे सुतोवाच केले आहे. उत्पादन प्रकल्पांसाठी पर्याय म्हणून या देशांमधल्या बड्या कंपन्यांनी भारताकडे पाहण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीन आधीच भारतावर खवळला आहे. उत्पादन प्रकल्पांसाठी भारत हा चीनला पर्याय ठरुच शकत नाही, अशी भूमिका चीनी माध्यमांमधून व्यक्त केली जात आहे. त्यातच सीमेवर तंटेबखेडे करुन भारताला त्रास देण्याचे धोरण चीनने आता अवलंबले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण