पेट्रोल-डिझेल-गॅसची चिंता सोडा; लॉकडाऊनचा कालावधी वाढला तरी मुबलक इंधन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : डिझेल, पेट्रोल आणि एलपीजी गॅसचा पुरेसा साठा देशात असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात पुकारलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे. नागरिकांनी इंधनाची चिंता करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारत हा पेट्रोलियमयुक्त इंधनाचा जगातला तिसरा सर्वात मोठा ग्राहक देश आहे.

एनपीएने सांगितले की, पेट्रोलियम पदार्थांच्या उपलब्धतेची चिंता करण्याची परिस्थिती देशात नाही. अत्यावश्यक सेवांना इंधनाचा पुरवठा करण्याच्या सूचना पेट्रोल-डिझेल वितरकांना देण्यात आल्या आहेत. शेती आणि शेतीपुरक उद्योग, मळणी, काढणी, शेत मशागतीची वाहने यांनाही इंधन पुरवठा करण्याचे आदेश आहेत. घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी पीटीआयला सांगितले, की संपूर्ण एप्रिल महिना आणि त्यानंतरही देशाला लागणाऱ्या संभाव्य इंधन गरजेचा अंदाज आम्ही घेतलेला आहे. ही गरज सहज पूर्ण करता येईल, या दिशेने देशातल्या रिफायनरी काम करत आहेत. इंधन शुद्धीकरण, निर्मिती, वितरण या क्षेत्रातील देशातल्या सर्व प्रकल्पांचे काम योग्य पद्धतीने चालू आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा भासण्याची कोणतीही शक्यता नाही.

देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. हा कालावधी आणखी वाढवला तरीदेखील इंधनाची टंचाई निर्माण होणार नाही, एवढा साठा देशात आहे. त्यामुळे अकारण नागरिकांनी इंधन खरेदीसाठी गर्दी करु नये. कोरोनोचा संसर्ग पसरू नये, याची पुरेशी दक्षता घेत पेट्रोल-डिझेल-गॅस आदी इंधनाचे वितरण करण्याचे आदेश वितरकांना दिले आहेत. लोकांनी संयम बाळगावा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम तोडू नयेत, असे आवाहन एनपीने केले आहे. इंधन तुटवड्याच्या शक्यतेने देशात लोक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र गेल्या चार दिवसात पाहायला मिळाले. गॅसचे आगाऊ बुकींग होत आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रव्यापी लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा, विमानसेवा पूर्ण बंद आहेत. खासगी आणि सरकारी वाहतूक, मालवाहतूक ठप्प आहे. त्यामुळे इंधनाची मागणी कधी नव्हे इतकी घसरली आहे. केवळ इंधन टंचाईच्या अनाठायी भीतीमुळे काही ठिकाणी लोक खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*