विनय झोडगे
देवेंद्र फडणवीसांनी बऱ्याच दिवसांनी अचूक निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या पक्षाचे समर्थक विविध सोशल मीडिया कंपूतून गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात धन्यता मानत असताना फडणवीसांनी मात्र उद्धव ठाकरे यांचे सध्याचे बोलवते धनी शरद पवार यांच्या पत्रापत्रीच्या राजकारणावर अचूक बोट ठेवत नेमकी कोठे मेख मारली पाहिजे, हे समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
शरद पवारांनी सतत पंतप्रधानांना पत्रे लिहिण्यापेक्षा एखादे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहावे, असे फडणवीसांनी सूचविले आहे. वास्तविक पाहता नुसते हे सूचविण्यापेक्षा फडणवीसांनी आणि त्यांच्या पक्षाने ठणकावून सांगितले पाहिजे आणि पवारांच्या तथाकथित अभ्यासू पत्रांना out box दाखविला पाहिजे. पण फडणवीसांचे बॉस हे करत नाहीत, म्हणून पवारांचे फावते. आणि पश्चिम महाराष्ट्रापुरत्या ५ खासदारांच्या या नेत्याला आपण फार मोठे राष्ट्रीय नेते आहोत, असे सतत भासवत राहण्याची संधी मिळते. फडणवीस हे सगळे दिल्लीतल्या आपल्याच बॉसला सांगू शकतील काय?
महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर बरोबरच आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने राज्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्याकडून काही plus – minus झाल्यास ते टीकेचे धनी होणार हे उघड आहे.
पण राज्याच्या प्रशासनावर पवार पकड ठेवणार. गृह, अर्थ खाती आपल्या ताब्यात ठेवणार. प्रशासनातील power leavers वर दबाव ठेवणार आणि जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर ढकलणार हा पवारांचा जुना खाक्या आहे. फडणवीसांना पहिल्या कारकीर्दीत पहिले वर्षभर तरी याचा अनुभव आला आहे. म्हणूनच त्यांनी त्यावेळी प्रशासकीय अधिकारी एेकत नसल्याचा तक्रारी केल्या होत्या. जो अनुभव फडणवीसांना त्यावेळी आला होता, तो आता उद्धव ठाकरे यांना येत असणार. पण बोलायची सोय नाही…!! ते टीकेचे धनी होत आहेत. पण या सर्व प्रकारात त्यांचे बोलवते धनी शरद पवार हे निसटून जाताहेत हे उद्धव यांच्या टीकाकारांच्या लक्षात येत नाही. उलट पवार समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेचा पवारांच्या प्रतिमामंडणासाठी म्हणजे पवारांंचे राजकीय घोडे पुढे दामटण्यासाठी मतलबी उपयोग करून घेतल्याचे भाजपच्या आंधळ्या समर्थकांना दिसत नाहीये.
फडणवीसांनी या आंधळ्या समर्थकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे. एवढे करूनही ते एेकतील का? या विषयी शंकाच वाटते. उलट भाजप समर्थक आणि शिवसेना समर्थक या दोन हिंदुत्ववादी गटांमध्ये सुरू असलेल्या या सोशल धुमश्चक्रीचा काँग्रेस गटवाले आणि राष्ट्रवादी गटवाले आनंद लुटताहेत. दोन हिंदुत्ववादी पक्षांना बऱ्याच वर्षांनंतर जनतेने मोठा कौल दिलाय. पण या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वत:चे अहंकार कुरवाळत “नजीबी प्रवृत्तीच्या” पवारांना मोकळे रान महाराष्ट्रात मिळवून दिलेय. हे या नेत्यांच्या लक्षात येईल, तेव्हा खरयं…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App