विशेष प्रतिनिधी
चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी, 22 मार्चला जनता संचारबंदी (कर्फ्यु) पाळण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी येत्या रविवारी त्यांच्या राज्यातील सर्व सरकारी वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घोषित केला आहे. रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत तामिळनाडूतील बससेवा, मेट्रोसेवा बंद राहणार असल्याचे मुख्यमंत्री इडापडी के. पलानीस्वामी यांनी स्पष्ट केले.
कोरोना विषाणूच्या उद्रेकाविरोधातला लढा म्हणून मोदींनी देशात एक दिवसाची संचारबंदी नागरिकांनी स्वतःहून पाळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणी होऊ शकणारा कोरोना विषाणूचा (कोवीड-19) संसर्ग रोखण्याचा उद्देश यामागे आहे.
शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्यानंतर पलानीस्वामी यांनी प्रसिद्ध पत्रक काढून आपल्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, खासगी वाहतूक व्यावसायिकांनीही सरकारला या निर्णयात पूर्ण सहकार्य करावे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे कोरोना विषाणू विरोधात निस्वार्थीपणे सेवा बजावत असलेल्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रतीदेखील जनतेने कृतज्ञता व्यक्त करावी, असेही आवाहन पलानीस्वामी यांनी केले. कोरोनाविरोधातील केंद्र सरकारच्या लढ्यात तामिळनाडू सरकार पूर्ण सहभागी असेल, असे स्पष्ट करतानाच त्यांनी सांगितले की, तामिळनाडूतील सरकारी आणि खासगी ग्रंथालये येत्या 31 मार्चपर्यंत बंद असतील.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आदी सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेली व्हिडीओ कॉन्फरन्स दोन तासांहून अधिक काळ चालली. यावेळी मोदींनी सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळण्याचे महत्त्व सांगितले. साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी घराबाहेर न पडण्याची गरज व्यक्त करुन त्यांनी एक दिवस उत्स्फूर्त संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले. कोरोना विषाणू उद्रेकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे जगातील काही देशांमध्ये बळींची आणि बाधितांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे भारतासारख्या घनदाट लोकवस्तीच्या देशात सोशल डिस्टन्सिंग किती गरजेचे आहे, हे मोदींनी सांगितले. त्याला सर्वच मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
पलानीस्वामी म्हणाले, की पंतप्रधानांच्या आवाहनानुसार येत्या रविवारी अगदीच निकड असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावे. अन्यथा शंभर टक्के संचारबंदी स्वतःहून पाळावी. तसेच या संकटाच्या काळातसुद्धा लोकांच्या आरोग्यरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील सर्व मंडळींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासही लोकांनी विसरु नये. त्यासाठी सायंकाळी पाच वाजता आपापल्या घरातूनच लोकांनी घंटानाद, थाळीनाद करावा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more