वृत्तसंस्था
नवी दिल्ली : श्री चित्र तिरुनल वैद्यकीय शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्था (एससीटीआयएमएसटी) या भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्थेने शास्त्रज्ञांनी कोविड – 19 चे संदिग्ध रुग्ण तपासण्यासाठी संसर्ग रोधक निर्जंतुक तपासणी कक्ष विकसित केला आहे.
रुग्ण तपासणीच्या वेळी रुग्णाच्या प्रत्यक्ष स्पर्शातून डॉक्टरांना होऊ शकणारा संसर्ग रोखण्यासाठी या नाविन्यपूर्ण तपासणी कक्षाचे स्वरूप टेलिफोन कक्षासारखे बंदिस्त ठेवण्यात आले आहे. तसेच त्यामध्ये साधा दिवा, टेबलावरचा पंखा, एक फडताळ आणि अतिनील किरणांचा दिवा बसविण्यात आला आहे. तपासणी पूर्ण झाल्यावर रुग्ण कक्षाबाहेर पडल्यानंतर कक्षातील अतिनील किरणांचा दिवा तीन मिनिटांच्या कालावधीसाठी चालू ठेवला जातो. या काळात कक्षातील विषाणूंचा परिणामकारकरीत्या, समूळ नायनाट होतो. त्यानंतर नव्या रुग्णाला कक्षात प्रवेश दिला जाऊ शकतो, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.
या तपासणी कक्षाला जोडलेल्या हातमोज्यांच्या जोडीत हात घालून डॉक्टर कक्षातील रुग्णाची शारीरिक तपासणी करू शकतील. तसेच कक्षाच्या बाजूच्या भिंतीत असलेल्या चौकटीतून स्टेथोस्कोप आत घालण्याची सुविधा दिली आहे, त्याचा उपयोग करून डॉक्टर रुग्णाच्या शरीरावर स्टेथोस्कोप ठेवून त्याच्या हृदयाचे ठोके तसेच श्वसनाचा आवाज यांचे परीक्षण करू शकतील.
“कोरोनाच्या अत्यंत मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य असलेल्या विषाणूच्या वाहक व्यक्तींशी संपर्कात येणाऱ्या डॉक्टर आणि पहिल्या फळीतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाची सुविधा पुरविण्याला सध्याच्या वैद्यकीय क्षेत्रात प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत विचारमंथनातून तयार झालेल्या आणि वैद्यकीय तपासणीची संपूर्ण सेवा देणाऱ्या या संरक्षक कक्षाची संरचना हे कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दिशेने टाकलेले उत्तम पाऊल आहे,” अशा शब्दात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी हा कक्ष विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App