कार्यकर्ता हेच माझे राजकीय वारस; गडकरींना वाटतो राजकीय घराणेशाहीचा तिटकारा!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “मी आज राजकारणात आहे. पण माझ्या बायको-मुलांनी कधीही मी राजकारणात आहे, म्हणून माझ्या नावाचा उपयोग केला नाही. आई-वडिल राजकारणात असेल की, ते मुलांसाठी तिकिट मागतात. पण मला त्या प्रकाराचा तिटकारा आहे,” अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  राजकारणातल्या घराणेशाहीवर मत व्यक्त केले.

“राजकारण सोडून माझ्या सर्व गोष्टींवर तुमचा अधिकार आहे, हे मी माझ्या कुटुंबीयांना सांगितले आहे. माझा राजकीय वारस हा माझा कार्यकर्ता आहे. कारण त्यांच्यामुळे आज मी मोठा झालो,” असेही गडकरी म्हणाले. निवडणुकीच्या काळात कुटुंबीय प्रचारासाठी जातात. तेवढाच त्यांचा राजकारणाशी संबंध आहे, असे ते म्हणाले.

मोदींचे भरभरून कौतुक…

गडकरी हे दैनिक ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता, बोलता’ या वेब संवादामध्ये  बोलत होते. संपादक गिरीश कुबेर आणि सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही त्यांनी भरभरून कौतुक केले. ते म्हणाले,”नरेंद्र मोदींनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाकरता दिले आहे. प्रत्येक मिनिटाला देशासाठी आपण काय चांगलं करु शकतो, हा विचार ते करत असतात. देशाच्या भविष्याबद्दल मोदींकडे व्हिजन आहे, चांगल्या कल्पना आहेत. महत्वाचे म्हणजे जिद्दीने काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. देशाला पुढे नेण्याचं कॅलिबर त्यांच्यामध्ये आहे.”

“चायनीज व्हायरसमुळे सध्या निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे एक परीक्षा आहे. हे सगळं सोप नाहीय. मोदींनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. बोलायला सोपं आहे, पण करायला कठीण असल्याची जाणीव आम्हाला आहे. पण सर्वांच्या आशीर्वादाने पुढे जाऊ आणि गाडीला धक्का मारुन मारून बाहेर काढू” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*