आतापर्यंत पुण्यातून 80 हजार मजूर त्यांच्या मूळ राज्यात रवाना


विशेष प्रतिनिधी

पुणे : लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश, बिहार तसेच इतर राज्यातील 80 हजार मजुरांना घेऊन 30 विशेष रेल्वे व दोन हजार बसगाडया देशातील विविध राज्यांकडे रवाना झाल्या आहेत. मोदी सरकारच्या प्रयत्नामुळे गावी जायला मिळत असल्याने मजुरांनी आभार मानले.

पुणे जिल्ह्यातून 80 हजार मजूर त्यांच्या मूळ राज्यात परत पाठविण्यात आले असून पुढील दोन दिवसात आणखी 18 रेल्वेगाडयांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्हाधिकारी राम म्हणाले की, पुणे जिल्हयात मोठया प्रमाणात मजुरांची संख्या आहे. मजुरांच्या सोईसुविधेसाठी जिल्हा प्रशासनाने विश्रांतीगृह व निवारागृहे उभारली आहेत. त्यातून मजुरांना सर्वोतोपरी मदतकार्य सुरू आहे. आजपर्यंत पुणे जिल्हयातून 30 श्रमिक रेल्वेने 35 हजार मजूर आपल्या मूळ राज्यात रवाना झाले आहेत. पुढील दोन दिवसात आणखी 18 रेल्वेचे नियोजन करण्यात आले आहे, या शिवाय पुढील काही दिवसात आणखी 65 रेल्वेगाडयांचे नियोजन प्रस्तावित आहे.

दोन हजार बस गाड्यांमार्फत 45 हजार मजूर, गरजू नागरीक आपल्या गावी रवाना झाले आहेत. 18 मे पर्यंत एकूण 80 हजार मजूर, नागरिकांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती देतानाच पुणे जिल्हयात उद्योग मोठया प्रमाणात सुरू करण्यात आले आहेत, त्यामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे, तसेच प्रशासनाकडून मजूरांची राहण्याची व भोजनाचीही व्यवस्था निवारागृहात करण्यात आली आहे, त्यामुळे मजुरांनी आपल्या गावी जाण्याऐवजी याठिकाणीच थांबण्याबाबत सकारात्मक विचार करावा, प्रशासन मजुरांच्या बाबतीत कोणत्याही सोईसुविधा कमी पडू देणार नसल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी स्प्ष्ट केले.

पुणे जिल्ह्याच्या विविध भागात काम करणारे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान तसेच इतर राज्यातील हे मजूर आहेत. मजुरांची नोंद करून त्यांच्या रेल्वे प्रवासाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.

केंद्राने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील तालुकास्तरीय महसूल यंत्रणांना परराज्यातील मजुरांची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर, रेल्वे आणि विशेष बसने त्यांना त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण