
विनायक ढेरे
संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर किंबहुना देशाच्या राजकारणावर आपली अमीट छाप निर्माण करून गेलेल्या कै. गोपीनाथ मुंडे यांच्या दोन कन्या पंकजा मुंडे – पालवे आणि डॉ. प्रीतम मुंडे – खाडे…!! डॉ. प्रीतम या डर्मिटोलॉजिस्ट आहेत. एमडी या पदवीने विभूषित आहेत. Dr. Pritam Munde: Politics – while inheriting a strong legacy of socialism !!
पंकजा या राज्याच्या राजकारणात आपले भविष्य घडवत आहेत, तर डॉ. प्रीतम या केंद्रीय राजकारणामध्ये आपले भविष्य पाहत आहेत. दोन्ही भगिनींकडे आपले पिताजी गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजन यांचा बलदंड राजकीय वारसा चालून आला आहे. मोदी – शहांचा भाजप अशी आज देशातली ओळख आहे. त्याआधी अटल – अडवाणी यांचा भाजप अशी ओळख होती, पण महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपला ओळखले गेले ते मुंडे-महाजन यांचा भाजप या नावाने!! हा दुहेरी राजकीय वारसा पंकजा आणि डॉ. प्रीतम यांना लाभला आहे.
कै. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय आणि सामाजिक वारसाच्या सावलीत या दोन्ही नेत्यांची आणि राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू आहे. गोपीनाथ मुंडे यांचे एका शब्दात वर्णन करायचे झाले, तर “संघर्ष” हा शब्द त्यांच्यासाठी अतिशय चपखल बसतो. हा संघर्षाचा राजकीय वारसा देखील डॉ. प्रीतम यांच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे राजकारणात चढ उतार तर येतच असतात.
आपण ध्येयावर लक्ष ठेवून पुढे जात राहिले हे त्यांना नक्की समजते. 2014 पासून त्या भाजपच्या बीडच्या खासदार आहेत. बीड मतदारसंघात केंद्रीय योजनांच्या माध्यमातून त्यांनी विकासाची मजबूत साखळी तयार केली आहे. यापुढे देखील विकासाचा हा वारसा पुढे नेण्याची त्यांची तयारी आहे.
त्यांचे राजकारण “माध्यम केंद्रीत” राहिल्याचे सुरुवातीला वाटले. किंबहुना 2021 च्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम यांना स्थान मिळेल अशी अटकळ अन्य कोणी राजकीय नेत्याने नव्हे, तर मिडियाने बांधली होती. त्यामुळे त्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खूप झाली. परंतु डॉ. प्रीतम यांच्याकडे चालत आलेल्या राजकीय वारशाच्या आधारे त्यांची नक्कीच ही धारणा नव्हती, की भाजप सारख्या राजकीय पक्षात केवळ “माध्यम केंद्रीत” राहून निर्णय घेतले जातात!!
त्यामुळे त्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय दृष्ट्या विचलित झाल्याच्या बातम्या आल्या असल्या तरी त्यामध्ये फारसे तथ्य नव्हते. डॉ. प्रीतम यांच्या नंतरच्या राजकीय वर्तणुकीवरून देखील हे स्पष्ट होते. भाजपच्या राजकीय संस्कृतीशी त्यांची नाळ पक्की जोडली गेली आहे. त्यामुळेच राजकीय परिपक्वतेच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू असल्याचे दिसते. त्या सध्या फक्त 38 वर्षांच्या आहेत. राजकारणाचा मोठा पट आणि कारकीर्द त्यांच्यासमोर उभी आहे. अशा स्थितीत राजकीय पावले दमदार पण जपून कशी टाकायची याचा वारसा देखील त्यांना आपल्या पिताश्रींनी कडून मिळालेला आहे. या वारशालाच जागूनच त्या आपली वाटचाल पुढे सुरु ठेवताना दिसत आहेत.