वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना परीक्षेतील ताण व्यवस्थापनाचे धडे दिले. हा कार्यक्रम यंदा प्रथमच करोनामुळे व्हर्च्युअल पद्धतीने झाला. Tips for students given by Prime Minister Modi in ‘Pariksha Pe Charcha’ program
परीक्षा अचानक येत नाही आणि जे अचानक येत नाही त्याची भीती कशाला बाळगायची? आणि भीती तुम्हाला परीक्षेची नसतेच, भीती असते ती या भावनेची की परीक्षाच सर्व काही आहे आणि याला कारणीभूत आपल्या आजूबाजूची मंडळी असतात. म्हणूनच पालकांनी हे ध्यानात घ्या की परीक्षा हेच आयुष्य नव्हे, तो आयुष्यातला एक लहान टप्पा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण देऊ नका, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची सुरुवात करत विद्यार्थ्यांना धीर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘पूर्वी पालक विद्यार्थ्यांसोबत सहज संवाद साधायचे, दैनंदिन विविध विषयांवर संवाद साधायचे. आता पालकांना मुलांची प्रगती पाहण्यासाठी त्याची गुणपत्रिका हवी असते.’
परीक्षा ही जीवन घडवण्याची एक संधी
परीक्षा म्हणजे आयुष्याचा अंत नव्हे, ती आयुष्य घडवण्याची एक संधी असते. तिला एक कसोटी म्हणू पाहायला हवे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.
Join Pariksha Pe Charcha!#PPC21 https://t.co/jTSe218osq — Narendra Modi (@narendramodi) April 7, 2021
Join Pariksha Pe Charcha!#PPC21 https://t.co/jTSe218osq
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2021
ऊर्जेचे प्रत्येक विषयासाठी समसमान वाटप करा
जे आवडते ते आपण आधी करतो, विद्यार्थी सहज, सोप्या आणि त्यांना आवडणाऱ्या विषयाचा जास्त अभ्यास करतात आणि कठिण विषयाला घाबरतात. उलट कठीण असतं त्याला आधी सामोरे जा. परीक्षेत असं म्हटलं जातं की सोपं आधी सोडवा, पण मी तर म्हणेन जे कठीण आहे त्याचा निपटारा सर्वात आधी करायला हवा.
रिकामा वेळ हवाच
एका विद्यार्थ्याने पंतप्रधानांना रिकाम्या वेळी काय करायचं असा प्रश्न विचारला. मोदी म्हणाले, ‘रिकामा वेळ मिळणं ही पर्वणीच. रिकाम्या वेळेचा तुम्ही कसा सदुपयोग करता हे महत्त्वाचं. अभ्यास करून कंटाळा आला की थोडा विरंगुळा हवाच. पण असं व्हायला नको की रिकाम्या वेळी तुम्ही असा काही वेळकाढूपणा कराल की सगळा वेळ कसा गेला हे कळणारच नाही. रिकाम्या वेळी तुमच्या आवडीचं काम करा. असं काहीतरी करा ज्यातून तुम्हाला ऊर्जा मिळेल. क्रिएटिव्हिटीद्वारे तुम्ही स्वत:ला व्यक्त होण्याची संधी द्या.’
मूल्ये मुलांवर थोपवू नका, ती जगायला शिकवा
मुलांमध्ये मूल्यं कशी रुजवायची, अशा प्रश्न एका पालकाने विचारला. त्यावर पंतप्रधान म्हणाले, ‘मूल्ये ही मुलांवर थोपवण्याची गोष्ट नाही. हे करा, ते करा असं सांगून मुलं ऐकणार नाहीत. तुम्ही कसं वागता त्याचं ती बारीक निरीक्षण करत असतात. म्हणून तुम्ही मूल्ये जगायला शिका तर मुलंही ते शिकतील.’
मुले स्वयंप्रकाशित व्हायला हवी
पालकांच्या सातत्यपूर्ण जागरुक प्रयत्नांद्वारे मुलांना प्रोत्साहित करायला हवे. त्यासाठी त्यांच्याशी कोणत्याही चांगल्या पुस्तकावर, सिनेमावर, गोष्टीवर, गाण्यावर, चित्रावर चर्चा करायला हवी. मुले स्वयंप्रकाशित व्हायला हवीत, परप्रकाशित नव्हे, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
जंक फूडकडून हेल्दी फूडकडे
मुलांना जंक फूडकडून हेल्दी फूडकडे आणण्यासाठी पालकांना मेहनत करायला हवी. त्यांना आवडेल, रुचेल अशा प्रकारचं आरोग्यदायी अन्न देण्याकडे तर आपला कल असावाच, पण ते अन्न शिजवण्यामागे किती मेहनत असते हेही मुलांना कळायला हवे. त्यांना आवडेल असा अन्नपदार्थांशी संबंधित एखादा गेम आठवड्यातून एकदा खेळा. काहीतरी नवे प्रयोग करत राहायला हवे. अनेक कुटुंबं मी अशी पाहिलीत जिथे पारंपरिक पदार्थांनाच मॉर्डर्न टच देऊन मुलांना खाऊ घातले जातात, असं मोदी म्हणाले.
स्मरणशक्तीसाठी टिप्स…
मोदी म्हणाले, ‘विस्मरण हा शब्दच डिक्शनरीतून काढून टाका. तुम्ही आयुष्यातील अनेक प्रसंग आठवून पाहा, तुम्हाला सहज आठवतात. कोणाचीही स्मरणशक्ती कमी जास्त नसते. गोष्टी सहजतेने लक्षात ठेवायला शिकता आले पाहिजे. तुम्ही ज्या क्षणात जगत आहात, त्याच क्षणात तुम्हाला जगता आले पाहिजे. तेथे एकाग्रतेने, मन एकवटून अभ्यास केला तर तो आठवण्यासाठी परिश्रम करावे लागत नाहीत.’
परीक्षा हॉलमध्ये जाताना…
परीक्षेला जाताना सर्व टेन्शन बाहेर सोडून जायला हवे. जितका अभ्यास करायचा होता, तेवढा आपण केला अशा सकारात्मक विचार करून परीक्षेला सामोरे जायला हवे. जितका कमी ताण तुम्ही घ्याल, तितके अधिक आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाल, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. त्यासाठी ‘एक्झाम वॉरियर’ या पुस्तकातून टिप्स घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App