प्रतिनिधी
मुंबई : भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधींनी पुन्हा एकदा सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर शरसंधान साधले आहे. कॉंग्रेसने देशाला स्वतंत्र केले, संघाने ब्रिटिशांना मदत केली, तर सावरकरांना ब्रिटिशांचा स्टायपेंड मिळाला, असे आरोप राहुल गांधी यांनी पुन्हा केले. Rahul Gandhi’s Savarkar, again on Sangh; Thackeray will protest
सवंग प्रसिद्धीसाठी राहुल गांधी हे कायम स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करत असतात. भारत जोडो यात्रेतही त्यांनी भारतीय संस्कृती, हिंदू देवता यांचा आधीच अवमान केला असतांना त्यांनी आता वीर सावरकरांचाही अवमान केला आहे. राहुल यांची यात्रा कर्नाटकात पोहोचली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ‘संघ आणि सावकरकरांनी इंग्रजांना मदतच केली. वीर सावरकरांना तर इंग्रजांकडून पैसे मिळत होते’, असे संतापजनक वक्तव्य केले आहे.
या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला, त्याचबरोबर अडीच वर्षांपूर्वी सत्तेसाठी हिंदुत्व खुंटीला टांगून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही, ‘राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे निषेध करणार का’, अशा शब्दांत आव्हान दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
हजारो क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल गांधी यांनी अवमान केला, त्यामुळे आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो. काँग्रेसने वारंवार वीर सावरकर यांना अपमानित केले, कारण वीर सावरकरांच्या पाठीशी भारतीय जनता मोठ्या प्रमाणात होती. स्वातंत्र्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली, त्यात वीर सावरकरांना जाणीवपूर्वक अपमानित करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. ११ वर्षे वीर सावरकरांनी अंदमानच्या काळकोठडीत काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. इतकी मोठी शिक्षा भोगणारे फार थोडे स्वातंत्र्यसैनिक होते. आमच्यासाठी सगळेच स्वातंत्र्यसैनिक महान आहेत. यामध्ये वीर सावरकरांचे वेगळेपण हे आहे की, त्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली, क्रांतीची चळवळ त्यांनी उभी केली.
आणि अनन्वित अत्याचार सहन करूनही त्याठिकाणी अंदमानच्या काळकोठडीतही ते सातत्याने भारतीय स्वातंत्र्याचाच विचार करत होते. त्याचीच काव्ये लिहीत होते. तिथल्या क्रांतीकारकांना धीर देत होते. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात, कारण राहुल गांधींना स्वातंत्र्याचा इतिहास माहिती नाही. त्यांना ना क्रांतिकारकांची माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो. उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करणार आहे का? राहुल गांधी यांनी जी भारत जोडो की तोडो यात्रा सुरु केली आहे या यात्रेच्या स्वागतासाठी ते शिवसेनेचे नेते पाठवणार आहेत का आणि त्याठिकाणी राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले त्याचे ते समर्थन करणार आहेत का? याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले पाहिजे. आम्ही राहुल गांधी यांच्या अशा वक्तव्याचा सतत निषेध करू. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी भारतीयांच्या मनामध्ये वीर सावरकरांची जी प्रतिमा आहे ती कधीही ते पुसू शकणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App