मोलकरणीचे मोल : घरगुती धुण्याभांडयांचे काम ते विधानसभेची रणधुमाळी… बंगालच्या भाजप उमेदवार कलिता मांझींनी घेतलंय लक्ष वेधून


विशेष प्रतिनिधी

आऊसग्राम (पश्चिम बंगाल) : आपल्याकडील मराठवाड्याच्या कोपरयातील एका खेडेगावाप्रमाणेच हे गाव. धुळीने माखलेले, तुटके फुटके रस्ते, सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य. अशाच एका बोळकांडात असलेल्या छोट्या हाॅलजवळ गोंगाट सुरू होता. गजबज होती. तिथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर येणार होत्या. २२ तारखेला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी. Poor maid to vidhansabha candidate..surprising story BJPs Ausgram candidate Kalita Manjhi

भारत माता की जय, जय श्रीराम, वंदे मातरम अशा घोषणा बंगाली लहेज्यात दिल्या जात होत्या. व्यासपीठावर गच्च गर्दी होती. कार्यक्रम सुरू झाला आणि काही वेळातच एक छोटीशी चाळवाचाळव सुरू झाली. काही क्षणातच एक अतिशय सामान्य वाटणारी बाई थेट व्यासपीठावर आली आणि थेट विजया रहाटकर यांच्या शेजारी येऊन बसली. वाटले की भाषण ऐकायला आलेल्या कार्यकर्त्यांपैकी ती एक असावी. पण एकदम व्यासपीठावर आणि ती ही भाजपच्या राष्ट्रीय सचिवांच्या शेजारी.

हो.. ती कार्यकर्ताच होती! साधी सामान्य नव्हे; तर अतिसामान्य! घरगुती धुणी भांडी करणारी. दरमहा हजार-बाराशे रूपये कमवून आपल्या मोडक्यातोडक्या संसाराला हातभार लावणारी. तिचे नाव कलिता मांझी. बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यातील आऊसग्राममधील ही मोलकरीण महिला मात्र सध्या बंगालमधील बहुतेक सर्व वर्तमानपत्रांच्या पहिला पानांवर झळकतेय. अगदी गल्लीतील स्थानिक माध्यमांपासून ते दिल्लीपर्यंतच्या भारदस्त नॅशनल मीडीयामध्ये ती आहे. तिच्याबद्दल एक जबरदस्त कुतुहल निर्माण झाले आहे…

त्याचे कारणही तसेच आहे. निवडणूक लढवायची म्हटले की पैसा, सत्ता, मनगटशाही लागतेच. करोडोंचे आकडे आपण ऐकतो. पण कलिता मांझी त्यास पूर्ण अपवाद ठराव्यात. कारण भाजपने कलिता यांना चक्क आऊसग्राम विधानसभेची उमेदवारी दिलीय. त्यांनी मागणी केलेली नसताना, अपेक्षा नसताना… हो, कलिता या पक्षाच्या अतिशय चांगल्या, निष्ठावान कार्यकर्त्या. गरीबीचे आव्हान सांभाळून भाजपच्या एका मंडळाच्या सचिव म्हणून काम करतात.

पण आपल्याला पक्ष थेट विधानसभेचे तिकीट देईल, असे त्यांना स्वप्नातदेखील आले नसेल. कारण घरची स्थितीच अशी की स्वप्न बघणेदेखील अवघडच. नवरा प्लबंरचे काम करतो. घर म्हणजे झोपडीच. घरी म्हातारे सासू सासरे, दीर-भावजय, दोन मुले असा कुटुंबकबिला. दोन वेळचे पोट भरण्यासाठी कलिता या धुणी भांडीचे काम करतात. हजार-बाराशे रूपये कमावतात. अशा “अपात्र व्यक्ती”ला थेट विधानसभेचे तिकीट… पण भाजपने सर्वांना तोंडात बोटे घालायला लावणारा हा चमत्कार केला. विजया रहाटकरांचा आपल्या झोपडीत स्वागत करताना सुरुवातीला बावरलेल्या कलिता यांना काय करू आणि काय नको, असे झाले होते. भाषेचा अडसर होता; पण त्यामुळे भावनांचे प्रकटीकरण थोडेच थांबणार?

सुरूवातीचा धक्का पोहोचवून त्या चांगल्याच प्रचाराला लागल्यात. भाजपने त्यांच्याकडे खास लक्ष दिलंय. दिमतीला चांगली माणसे दिलीत. विजया रहाटकरांसारखे पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले नेते तिच्या निवडणूक तयारीवर जातीने देखरेख ठेऊन आहेत. कदाचित गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हे तिच्यासाठी सभा किंवा रोड शो करणार आहेत.

आपल्या मोडक्यातोडक्या हिंदीत ती भाजपबद्दल भरभरून बोलते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानते. फक्त भाजपमध्येच असे घडू शकते, असे ती डोळ्यात पाणी आणून सुचविते आणि हो जिंकणारच, असे आत्मविश्वासाने बोलून दाखविते.

सामान्यातील अतिसामान्य, अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या महिलेला थेट विधानसभेचे तिकीट देऊन भाजपने सर्वांनाच धक्का दिलाय. आता जनतेचा कौल काय असेल, हे २ मे रोजीच समजेल. आऊसग्राम येथे २२ एप्रिलरोजी सहाव्या टप्प्यात मतदान आहे.

Poor Maid To Vidhansabha Candidate..Surprising Story BJPs Ausgram Candidate Kalita Manjhi

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात