यशाला बाप अनेक, राष्ट्रवादीकडून ममता बॅनर्जींच्या विजयात शरद पवार यांचाही हात असल्याची बतावणी

यशाला बाप अनेक असतात. त्यामुळे यशाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येत असतात. राजकीय संधीसाधूपणासाठी प्रसिध्द असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या प्रचंड विजयात शरद पवार यांचाही हात असल्याची बतावणी करण्यास सुरूवात केली आहे.Many claim success, Sharad Pawar also claims to have a hand in Mamata Banerjee’s victory from NCP


विशेष प्रतिनिधी

मुंबई: यशाला बाप अनेक असतात. त्यामुळे यशाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येत असतात. राजकीय संधीसाधूपणासाठी प्रसिध्द असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या प्रचंड विजयात शरद पवार यांचाही हात असल्याची बतावणी करण्यास सुरूवात केली आहे.

ममता बॅनर्जी यांना निवडणुकीत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मदत केल्याची चर्चा राष्ट्रवादी कॉँग्रेसनने सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट केले आहे.पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसनंही पाठिंबा दर्शवला होता.तसेच ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी शरद पवार पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळं त्यांना दौरा रद्द करावा लागला होता. ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर शरद पवारांनी अभिनंदनही केलं होते.

पश्चिम बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी एक गौप्यस्फोट केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ‘शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्यानं मतविभागणी रोखली गेली.

त्याचा फटका भाजपला बसलाय, असे कैलास विजयवर्गी यांनी म्हटलं असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. विजयवर्गी यांनी केलेल्या विधानाचा अर्थ पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता,’ असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

वास्तविक शरद पवार पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी जाणार असे म्हटले होते. परंतु, त्यावर कॉँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला होता. त्यामुळे शरद पवार यांनी आपला हा निर्णय जवळपास रद्द केला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने हा प्रश्नच मिटला होता.

विशेष म्हणजे आजारी असल्याने महाराष्ट्रातील पंढरपूर मतदारसंघाच्या निवडणुकीतही शरद पवार यांनी लक्ष घातले नव्हते. मग पश्चिम बंगालमध्ये त्यांनी काय काम केले, असा सवालही केला जात आहे.

Many claim success, Sharad Pawar also claims to have a hand in Mamata Banerjee’s victory from NCP