मनातले विष अन् घसरलेल्या जिभा; या तर घराणेशाही संपण्याच्या कळा!!

विशेष प्रतिनिधी

“विषारी साप” काय, “जोडे पुसणारे राज्यकर्ते” काय हे सगळे मनातले विष आणि घसरलेल्या जिभा या तर खऱ्या घराणेशाही संपण्याच्या कळा!! हेच कर्नाटक, महाराष्ट्र आणि देशातल्या राजकारणाने दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे “विषारी साप” म्हणाले आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना “जोडे पुसायची लायकी नसणारे राज्यकर्ते”, म्हणाले. या दोन्ही नेत्यांची वक्तव्ये अनुक्रमे कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आली आहेत. ती वेगवेगळ्या वेळी आली असली तरी त्या वक्तव्यांमध्ये विलक्षण साम्य आहे आणि ती घराणेशाहीच्या उतरत्या कळा लागल्याचे दाखवत आहेत!! Mallikarjun khadge and Uddhav Thackeray targets Narendra modi and eknath shinde, it shows decline of Dynasty politics

केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवरची मांड घट्ट रोवून बसले आहेत आणि महाराष्ट्रात हळूहळू एकनाथ शिंदे यांची मांड घट्ट होत चालली आहे. त्यातून घराणेशाही पक्ष चालवणारी काँग्रेस आणि ठाकरे यांचे घराणे चालवणारी शिवसेना यांची खरी घालमेल वाढली आहे. आपण सत्तेकरताच जन्माला आलो आहोत आणि सत्ताकारण करण्यातच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे, असे मानणारी ही घराणी आहेत. त्यामुळे जनतेच्या कौलामुळे गेलेली सत्ता, पुन्हा जनतेच्या कौलातूनच मिळवावी लागते, हे काही त्यांना मनापासून मान्य नाही. पण जनतेचा कौल मिळवणे अपरिहार्यच आहे ना, मग तो मिळविण्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची आणि त्यानुसार बोलण्याची त्यांची तयारी असते, हेच मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांनी दाखवून दिले आहे.

खर्गेंच्या परिपक्वतेला काय झाले?

वास्तविक मल्लिकार्जुन खर्गे आता वयाच्या 80 च्या दशकात आहेत. सोनिया गांधींच्या राजकीय आशीर्वादाने त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष पद मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे वैयक्तिक उत्तम संबंध आहेत. तरी देखील आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस मोदींना “विषारी साप” म्हणून शिवीगाळ करून खरंच खरे यांनी नेमके काय मिळवले?? हा प्रश्न पडतो आहे.

राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला. त्याविरुद्ध महाराष्ट्रासह देशात गदारोळ उठला. याची राजकीय किंमत काँग्रेसला चुकवावी लागेल, याची जाणीव काँग्रेसमध्ये पहिल्यांदा खर्गेंना झाली आणि त्यामुळे त्यांच्याच घरी झालेल्या बैठकीत शरद पवारांनी जेव्हा राहुल गांधींना सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलले, त्यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवारांच्या वक्तव्याला होकार भरला होता. ही “पॉलिटिकल मॅच्युरिटी” अर्थात राजकीय प्रगल्भता मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या घरी दाखवली होती, मग ही प्रगल्भता कर्नाटक मधल्या काँग्रेसच्या प्रचार सभेत कुठे निघून गेली??, की त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांना थेट नरेंद्र मोदींना उद्देशून “विषारी साप” म्हणावेसे वाटले!!

“मौत के सौदागर” मुळे नुकसान

मल्लिकार्जुन खर्गे यांना 2007 मधला गुजरातचा पराभव आठवत नव्हता का?? त्याच निवडणुकीत सोनिया गांधींनी मोदींना “मौत के सौदागर” म्हणून संबोधले होते. त्याची राजकीय किंमत काँग्रेसला कायमची चुकवावी लागली. गुजरात मधून काँग्रेस हद्दपार झाली. मग मल्लिकार्जुन खर्गेना आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरीस कर्नाटक मधून अशीच काँग्रेस कायमची हद्दपार करायची आहे का?? त्यांना कोणी ही “राजकीय असाइनमेंट” दिली आहे का??, हा प्रश्न पडण्या इतपत मल्लिकार्जुन खर्गेंचे “विषारी साप” हे वक्तव्य राजकीय गंभीर आहे!!

वयाच्या 80 व्या वर्षी मल्लिकार्जुन खर्गे हे नक्कीच राहुल गांधींसारखे राजकीय अपरिपक्व नाहीत. तरीदेखील ते मोदींना “विषारी साप” म्हणत असतील तर त्या मागचे नेमके राजकीय काय इंगित आहे??, यातले “बिटवीन द लाईन्स” वाचण्याची गरज आहे!!

उद्धव ठाकरे अपरिपक्व आहेत?

जे मल्लिकार्जुन खर्गे यांचे, तेच उद्धव ठाकरे यांचे. वास्तविक एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे हे चिडणे स्वाभाविक आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड करणेही स्वाभाविक आहे. पण म्हणून “जोडे पुसण्याची लायकी नसणारे राज्यकर्ते” हे काय वक्तव्य झाले?? एवढी खाली उतरण्याची खरंच उद्धव ठाकरेंना गरज होती की उद्धव ठाकरे हे देखील आदित्य ठाकरे यांच्यासारखे राजकीय दृष्ट्या अपरिपक्व आहेत?? त्यांच्या राजकीय इतिहास तसे सांगत नाही. उलट ते न बोलता सर्वसामान्य भाषेत सुमडीत कोंबडी कापणारे नेते वाटतात. मग त्यांना एवढे खालच्या स्तरावर येऊन बोलावेसे का वाटले?? त्याची काय गरज होती??

एवढी कसली उबळ आली?

वास्तविक महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांमध्ये त्यांचे नेतृत्व अधोरेखित होत चालले आहे. वज्रमूठ ढिल्ली पडली तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला त्यातून डग लागत नाही. त्यांच्या गटाच्या शिवसेनेच्या सभाही मोठ्या होत आहेत. उद्धव ठाकरे यांना पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्रात सहानुभूती मिळाल्याचा शोध मराठी माध्यमांनी लावला आहे. एवढी मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना उद्देशून “जोडे पुसायची लायकी नसणारे राज्यकर्ते” म्हणायची काय गरज होती?? त्यांचा एवढा कोणता संताप असा उफाळून आला की त्यामुळे स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या पक्षाचा घात करण्याची उद्धव ठाकरे यांना उबळ आली??, हे कळायला मार्ग नाही!!

जसे मल्लिकार्जुन खर्गे हे “राहुल गांधी” नाहीत, तसेच उद्धव ठाकरे हे “राहुल गांधी” किंवा “आदित्य ठाकरे”ही नाहीत, मग तरी देखील खर्गे किंवा उद्धव यांच्यासारखे परिपक्व नेते जर स्वतःची पातळी सोडून बोलत असतील, तर त्यांना स्वतःच्या पक्षाचे नुकसान समजत नाही का?? की कोणी हे सांगायला त्यांना सल्लागार हवे आहेत??

घराणेशाही संपण्याच्या कळा

आक्रमक भाषा समजू शकते. राजकीय भाषणांमध्ये टोकाची टीकाही समजू शकते. बाळासाहेब ठाकरे अनेकदा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून टीका करायचे पण म्हणून स्वतःच्याच पक्षाच्या पायावर कुऱ्हाड मारून पाडून घेणारे वक्तव्य करणे याची मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे यांना काय गरज होती?? इतके ते राजकीय दृष्ट्या आंधळे झाले आहेत का?? की घसरलेल्या जिभांद्वारे मनातले विष बाहेर काढून स्व पक्षाचाच घात करायला ते पुढे सरसावले आहे!!… खरं म्हणजे त्यांच्या मनातले विष आणि घसरलेल्या जिभा या काँग्रेस आणि ठाकरे घराणेशाही संपण्याच्या कळाच दाखवत आहेत!!… हे सगळ्यांना दिसतेय. फक्त ते गांधी आणि ठाकरेंना दिसत नाही… एवढेच!!

Mallikarjun khadge and Uddhav Thackeray targets Narendra modi and eknath shinde, it shows decline of Dynasty politics

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात