प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिल्यानंतर त्या संभाव्य बंदी विरोधात देशभरात प्रचंड संताप उसळला असून विश्व हिंदू परिषदेने बजरंग दलावरील बंदी विरोधात 9 मे रोजी राष्ट्रव्यापी हनुमंत शक्ती जागरण मोहीम आयोजित केले आहे. त्यादिवशी देशभरात प्रत्येक शहर – गावांमध्ये हनुमान मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे येथे हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्राचे वाचन आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
बजरंग बलीच्या भक्तांच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी ९ मे रोजी होणाऱ्या राष्ट्रव्यापी हनुमंत शक्ती जागरणमध्ये संपूर्ण हिंदू समाजाने सर्व शक्तीनिशी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.
बजरंग दलाने ‘कुमती निवार सुमती के संगी’ ग्रुपच्या माध्यमातून देशभरात हनुमंत शक्तीबद्दल जागृती करण्याचे आवाहन केले. दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि इतर संघटना तसेच हिंदुविरोधी देशद्रोही मानसिकतेविरोधात व्यापक जनजागृती केली जाईल, अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी केली.
राष्ट्रव्यापी हनुमंत शक्ती जागरणमध्ये संपूर्ण हिंदू समाजाने सहभागी व्हावे. आपल्या कुटुंबातील सदस्य, शेजारी आणि मित्रांसह देशभरात लाखो ठिकाणी आयोजित या हनुमान चालीसा कार्यक्रमांपैकी अनेक कार्यक्रमांध्ये सहभागी होऊन धर्मविरोधी शक्तींना पराभूत करण्यात आपला सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन मिलिंद परांडे यांनी केले आहे.
बजरंग दल देशभरात गोरक्षण, कन्या संरक्षण, रक्तदान, मठ मंदिर आणि धर्माचे रक्षण तसेच धर्मांतर थांबवणे, अशा अनेक प्रकारच्या सेवा कार्यात गुंतलेला आहे, हे या सर्व नेत्यांना दिसत नाही का??, असा सवालही त्यांनी केला.
कर्नाटक काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात बजरंगरावरील बंदीचे आश्वासन तर दिलेच, पण त्यानंतर राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेससह इतर हिंदुद्वेषी नेत्यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्याचा सर्वत्र निषेध होत आहे. बजरंग दलावर बंदी घालणे आणि या देशभक्त संघटनेची पीएफआयसारख्या देशद्रोही, दहशतवादी, हिंसक संघटनेशी तुलना करणे अत्यंत अपमानास्पद आहे. हा अपमान करणाऱ्या पक्ष आणि संघटनांना संपूर्ण हिंदू समाज नक्कीच लोकशाहीचा धडा शिकवेल, असा इशारा मिलिंद परांडे यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App