विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या 2022 च्या निवडणुकीत बलाढ्य भाजपशी टक्कर घेताना 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला दोन मोठ्या उणीवा भासत आहेत. Gujrat Elections : Congress facing big challenge, as they have lost stalwarts like Ahamad Patel and Rajiv Satav, and Hardik Patel is not with them
काँग्रेसकडे त्यांचे चाणक्य अहमद पटेल उरलेले नाहीत. इतकेच नाही, तर त्यावेळी त्यांच्या टीममध्ये समावेश असणारे खासदार राजीव सातव यांचेही कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांची उणीव मोठ्या प्रमाणावर पक्षाला भासते आहे. त्याचबरोबर त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले पटेल आंदोलनाचे मोठे नेते हार्दिक पटेल 2022 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आहेत.
अहमद पटेल, राजीव सातव आणि हार्दिक पटेल या त्रिकूटाने 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या नाकीनऊ आणले होते. गेल्या 20 वर्षांच्या गुजरात निवडणुकीच्या इतिहासात 2017 मध्ये पहिल्यांदाच भाजपची टॅली 100 च्या खाली घसरली होती. तिचे सगळे श्रेय या त्रिकुटाला होते. काँग्रेसने देखील 2017 च्या निवडणुकीत मोठी झेप घेत 77 आमदार निवडून आणले होते. काँग्रेस त्यावेळी भाजपच्या टकरीत तुल्यबळ पक्ष ठरला होता. आज या त्रिकुटापैकी दोन नेत्यांचे निधन झाल्याने काँग्रेसला निवडणूक रणनीतीच्या पातळीवर मोठे नुकसान झाले आहे, तर हार्दिक पटेल हे काँग्रेस मधून बाहेर पडल्यामुळे एक मोठा लढवय्या पक्षाने गमावला आहे.
Mission Gujrat 2022 : मोदी – भागवत आज एकाच दिवशी अहमदाबादेत; मोदींचा रोड शो आणि संघाची प्रतिनिधी सभा मात्र वेगवेगळ्या ठिकाणी…!!
– संघटनात्मक ताकद विभागली
या खेरीस दुसरी सगळ्यात मोठी उणीव काँग्रेसला भासते आहे, ती भारत जोडो यात्रेमुळे. या यात्रेमुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद, जी एरवी सर्वच्या सर्व गुजरात विधानसभा निवडणुकीत एकवटली असती ती विभागली गेली आहे.
मल्लिकार्जुन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसची युवा ब्रिगेड जरी गुजरातच्या प्रचारात हिरीरीने उतरले असले, तरी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी या गांधी परिवाराची उणीव भरून काढणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरले आहे. राहुल गांधींच्या दोनच प्रचाराच्या सभा गुजरात मध्ये नियोजित आहेत. यापैकी एक सभा आधीच झाली आहे. प्रियांका गांधी काही सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे. पण काँग्रेसची मूळातच संघटनात्मक ताकद भारत जोडो यात्रा आणि गुजरात निवडणूक अशी विभागली गेल्यामुळे बलाढ्य भाजपशी टक्कर घेताना पक्षाला संघटनात्मक पातळीवर अवघड जात आहे.
– तुलनेने गुजरातेत संघटन मजबूत, पण…
गेल्या 20 वर्षांच्या निवडणुकांमध्ये भाजप सातत्याने निवडणुका जिंकत असला तरी काँग्रेसचे संघटन गुजरात मध्ये निश्चित मजबूत आहे. याची प्रचिती प्रत्येक निवडणुकीमध्ये येतही आहे, पण त्यांना पुरेसे यश मात्र मिळत नाही. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, तेलंगण, आंध्र, तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये काँग्रेस जेवढी कमकुवत बनत गेली आहे, तेवढी गुजरातमध्ये भाजपच्या 20 वर्षांच्या राजवटीत देखील बनलेली नाही किंबहुना संघटनात्मक दृष्ट्या काँग्रेसला कमकुवत करणे भाजपला तितकेसे जमलेले नाही.
पण 2022 च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला निवडणूक रणनीतीच्या पातळीवर अहमद पटेल, राजीव सातव आणि हार्दिक पटेल या त्रिकुटाचे नसणे आणि भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद विभागली जाणे या आव्हानाचा सामना करताना जड जात आहे आणि त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालांवर दिसण्याबरोबरच काँग्रेसच्या संघटनात्मक ताकद घसरण्याकडे होईल की काय? याची शंका व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App