वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चिनी कर्ज ॲपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बंगळुरूत पेटीएम, रेझरपे आणि कॅशफ्री या ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या कार्यालयांवर छापे टाकले. चिनी व्यक्तींद्वारे नियंत्रित स्मार्टफोनवर अवैध कर्ज देण्याच्या प्रकरणात ईडी तपास करत आहे. या छाप्यांत मर्चंट आयडी आणि चिनी व्यक्तींद्वारे नियंत्रित संस्थांच्या बॅँक खात्यांतून आणि मर्चंट आयडीतून १७ कोटी रुपये जप्त करण्यात आले.ED’s noose on Chinese loan apps Paytm, Razerpay, Cashfree raids, 17 crore seized
बंगळुरूत सायबर गुन्हे पोलिस ठाण्याने नोंद केलेल्या १८ एफआयआरवर ईडीने शुक्रवारी कारवाई केली. या संस्था आणि व्यक्तींवर असा आरोप आहे की, मोबाइल ॲपच्या माध्यमातून छोट्या रकमेचे कर्ज घेणाऱ्या लोकांकडून त्या जबरदस्ती वसुली करतात आणि त्यांना त्रास देतात. या छळामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केली. या संस्था चीनमधील व्यक्तींद्वारे नियंत्रित किंवा संचालित केल्या जातात.
२०० पेक्षा जास्त चिनी नागरिक सामील
गुप्तचर संस्थांना मिळालेल्या इनपुटनुसार या संपूर्ण खेळात २०० पेक्षा जास्त चिनी नागरिक सामील असल्याचा संशय आहे. त्यापैकी काहींनी भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे बनवली आहेत तसेच स्थानिक भाषाही ते शिकले आहेत. चिंतेची बाब म्हणजे व्हिसाचा कालावधी संपल्यानंतरही देशात थांबलेल्या चिनी नागरिकांव्यतिरिक्त घुसखोरी करून आलेले लोकही आहेत. त्यांची नावे, पत्ते तसेच ते कोणत्या शहरांत राहत आहेत हेही माहीत नाही.
लोन ॲपचे सर्व्हर भारताऐवजी सिंगापूरमध्ये
लोन अॅप प्रकरणात ईडीव्यतिरिक्त सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ), आयबी, रॉ आणि रिझर्व्ह बँकही तपासात सहभागी आहेत. रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांनुसार देशात एखादी गैर-बँकिंग आर्थिक कंपनी मोबाइल अॅपद्वारे कर्ज देण्याचा व्यवसाय करत असेल तर त्याचे सर्व्हर भारतात असणे आवश्यक आहे, पण चीनने सर्व्हर सिंगापूरमध्ये ठेवले. सर्व्हर देशात नसल्याने तपास संस्थांना डेटा दिसत नाही.
लोन अॅपद्वारे फसवण्यासाठी चीनने तयार केला व्हर्च्युअल चक्रव्यूह
लोन ॲपद्वारे जमा केलेल्या रकमेचा क्रिप्टोकरन्सीद्वारे मनी लाँडरिंगचा चक्रव्यूह चीनने तयार केला आहे. केंद्रीय तपास संस्थांचा तपास क्रिप्टो एक्स्चेंजच्या पुढे सरकलेला नाही. ईडीने देशात एक्स्चेंज चालवणाऱ्या १० पेक्षा जास्त कंपन्यांची भूमिका संशयित असल्याचे मानले आहे. आतापर्यंत वजीरएक्स, व्होल्ट आणि कॉइनस्विच कुबेरवर छापे टाकले आहेत.
त्यापैकी कोणीही डेटाबेसचा रिमोट ॲक्सेस ईडीला दिलेला नाही. त्यांचा क्रिप्टो अॅसेट किती आहे आणि त्यातून किती मनी लाँडरिंग चीनला झाले याचा पत्ता लागलेला नाही. तथापि, कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या केलेल्या चौकशीतून आणि त्यांच्याकडून जप्त केलेल्या कागदपत्रांद्वारे विदेशी चलन कायद्याच्या (फेमा) उल्लंघनाची माहिती मिळाली आहे. त्यांनी मनी लाँडरिंगच्या हेतूने फ्लिपव्होल्टसारख्या वॉलेटचा वापर केला. फ्लिपव्होल्ट क्रिप्टोकरन्सीचे एक वॉलेट आहे, त्याद्वारे केवायसी न करता देवाणघेवाण केली जाते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App