आज 9 ऑगस्ट 2022. 1942 च्या चलेजाव आंदोलनाचा स्मृतिदिन. म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन. याच दिवशी अखंड हिंदुस्थान भर ब्रिटिशांविरुद्धच्या चलेजाव आंदोलनाची क्रांतीज्वाला उफाळली होती. अवघ्या 2 दिवसांमध्ये 25000 भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटिशांनी बंदीवासात टाकले होते. महात्मा गांधी यांच्यापासून ते राष्ट्रसभेचे म्हणजेच काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना आझाद यांच्यापर्यंत सर्व राष्ट्रीय नेत्यांना तुरुंगवासात डांबले होते. त्यामुळे त्या वेळेच्या अतिशय तरुण अशा अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, जयप्रकाश नारायण आदी नेत्यांनी भूमिगत राहून आंदोलन चालविले होते. या आंदोलनामुळे समस्त भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड जनजागृती झाली होती. या विषयी कोणालाही शंका नाही. किंबहुना त्यामुळेच 9 ऑगस्ट या दिवसाला समस्त भारतीय क्रांती दिन म्हणून पाळतात.
तीन राजकीय विचारप्रणाली
पण आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्या आंदोलनाचा तीन राजकीय विचार प्रणालींच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला असता, एक वेगळे तथ्य समोर येताना दिसते ते म्हणजे गांधीवादी, कम्युनिस्ट आणि हिंदुत्ववादी या तीनही विचार प्रणालींच्या नेत्यांच्या दृष्टीने 1942 चे आंदोलन राजकीय परिणाम म्हणून अयशस्वी ठरले होते!!
महात्मा गांधींचे ऐतिहासिक भाषण
मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत महात्मा गांधींचे 8 ऑगस्टच्या रात्रीचे भाषण प्रचंड गाजले होते. त्याची व्हिडिओ क्लिप youtube वर उपलब्ध आहे. त्यांनी त्याच भाषणात ब्रिटिशांना “चले जाव”चे आदेश दिले होते. अंतरात्म्याचा आवाज ऐकून अंतःप्रेरणेने आत्मोद्धार करायला समस्त भारतीय समर्थ आहेत. भारतीयांचे भवितव्य सगळे भारतीय एकत्र येऊन ठरवतील. ब्रिटिशांनी भारतीयांच्या जीवनात लुडबुड करू नये, असा खणखणणीत इशारा त्यांनी दिला होता.
ब्रिटिशांशी तडजोडीचीही तयारी
पण त्याचवेळी ते ब्रिटिशांची तडजोडच करायला अजिबात तयार नव्हती, ही वस्तुस्थिती मात्र नाही. उलट ब्रिटिशांची तडजोड करून कोणत्याही संघर्षाविना भारताला स्वातंत्र्य मिळाले तर ते त्यांना हवेच होते. याची ग्वाही महात्मा गांधींचे गांधीवादी चरित्रकार आचार्य शं. द. जावडेकर यांनी लिहिलेल्या “जीवन रहस्य” या महात्मा गांधींच्या विस्तृत चरित्रात दिली आहे. हा स्वातंत्र्याचा अखेरचा संग्राम आहे. आज पासून आपण सर्व स्वतंत्र आहो असे समजून तुम्ही चालू लागा. तथापि मी व्हॉइसरायची गाठ घेऊन अद्याप समेट होतो की काय आणि लढ्यावाचून स्वातंत्र्य मिळू शकते की नाही ते पाहणार आहे. तोपर्यंत केवळ विधायक कार्य करीत राहा. कोणत्याही तऱ्हेचा कायदेभंग करू नका, असे त्यांनी म्हटले असल्याचे जावडेकरांनी “जीवन रहस्य” यामध्ये नमूद केले आहे.
काँग्रेस समितीचा ठराव
त्याचबरोबर जर महात्मा गांधी आणि इतर पुढार्यांना सरकारने बंदी टाकले तर किंवा त्यांचे आदेश लोकांना मिळू नयेत अशी परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रातील प्रत्येक स्वातंत्र्येच्छु व्यक्तीने आपल्या अंगचे सर्व बल आणि सर्वस्व आपले सर्वस्व लढ्यात खर्ची घालावे. केवळ अहिंसेचे बंधन घालून प्रत्येकाने विवेक बुद्धीप्रमाणे सत्याग्रहाचे अनुसरण करावे. अशा परिस्थितीत प्रत्येक मनुष्याचा अंतरात्मा हाच त्याचा मार्गदर्शक नेता होऊ शकतो अशा तऱ्हेच्या या लढ्याचा भाग काँग्रेस समितीच्या ठरावातील अखेरच्या भागात होता होता. सुरुवातीच्या भागात ब्रिटिशांनी भारतातून निघून जावे यावरच भर होता.
सर्वपक्षीय सरकारवर भर
गांधीजी समन्वयवादी नेते होते. ब्रिटिश भारतातून राजसत्ता सोडून निघून गेल्यानंतर भारतात एक सर्वपक्षीय हंगामी सरकार स्थापन होईल आणि ते दोस्त राष्ट्रांशी सहकार्याचा तह करून स्वतःच्या राष्ट्राचे आणि दोस्त राष्ट्रांचे संरक्षण करतील या कामी ते शस्त्रबल आणि आत्मबल या दोघांचाही उपयोग करतील, असे म्हटले होते. त्याचवेळी राष्ट्र सभेला अर्थात काँग्रेसला भारताची सत्ता ताब्यात घेण्यात अजिबात रस नाही. उलट इथली सत्ता ही सर्वपक्षीय असावी आणि स्वयंनिर्णयाच्या आणि स्वेच्छच्या आधारावर निर्माण झालेले संयुक्त राज्य स्थापन व्हावे, अशीच इच्छा महात्मा गांधी यांनी त्यावेळी काँग्रेसच्या व्यासपीठावरून व्यक्त केल्याची ग्वाही जावडेकर यांनी दिली आहे.
लढा पूर्णपणे यशस्वी नाही
मात्र, त्याच वेळी 1942 चा लढा पूर्णपणे यशस्वी झाला नाही. (या लढ्यातून निर्माण झालेली राजकीय परिस्थिती) त्यामुळे सर्व आपत्ती भोगणे राष्ट्राला पुढे अपरिहार्य झाले, असे परखड निरीक्षण देखील जावडेकरांनी नोंदविले आहे. राष्ट्रसभेच्या अर्थात काँग्रेसच्या नेत्यांनी फाळणीला निरुपाय म्हणून मान्यता दिली. गांधींना अखेरपर्यंत ही मान्यता देणे पटले नाही. परंतु, राष्ट्रसभेच्या अर्थात काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या योजनेला मान्यता दिलेली आहे ती योजना फेटाळून लावून ताबडतोब क्रांतीचा दुसरा प्रयत्न करण्याची ताकद आपल्या अंगी आणि राष्ट्राच्या अंगी दिसत नाही म्हणून राष्ट्रसभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या नेत्यांच्या या निर्णयाविरुद्ध बंड करू नये, असा सल्ला महात्मा गांधी यांनी 1947 च्या जूनमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीस दिला होता. याची नोंद जावडेकरांनी “जीवन रहस्य” मध्ये केलेली दिसते!!
कम्युनिस्टांची टीका
त्या वेळच्या कम्युनिस्ट नेत्यांच्या आणि हिंदुत्ववादी नेत्यांच्या मते देखील 1942 चे आंदोलन राजकीय दृष्ट्या फसलेच होते. पण या दोन्ही विचार प्रणालींच्या नेत्यांमध्ये त्याबाबत मूलभूत भिन्नता होती. ती म्हणजे 42 चे आंदोलन हे मूळात क्रांती आंदोलन नव्हते. कारण त्यात कामगार क्रांती नव्हती की त्यामध्ये शेतकरी आणि कामगार यांची मुक्तीही नव्हती, असे मत त्या वेळचे कम्युनिस्टांचे सर्वोच्च नेते बी. टी रणदिवे यांनी नमूद केले होते. कम्युनिस्टनच्या मते काँग्रेसची चळवळ ही प्रस्थापितांचीच चळवळ होती. तीमध्ये कामगारांना वावच नव्हता. त्यामुळे 42 च्या आंदोलनाला कम्युनिस्टांचा थेटच विरोध होता.
सावरकरांचा फाळणीचा इशारा
हिंदुत्ववादी नेत्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1942 च्या आंदोलनाला विरोध केला होता. पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्यावर केलेल्या भाषणात त्यांनी “भारत छोडोचे भारत तोडो”च्या घोषणेत रूपांतर होईल, अशी साधार भीती व्यक्त केली होती. त्यामुळे जनतेने अजिबात त्या आंदोलनाला पाठिंबा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले होते. यामध्ये राष्ट्रीय चेतना मारण्याचा सावरकरांचा अजिबात प्रयत्न नव्हता, तर राष्ट्र मसभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या मागणी पुढे अजिबात झुकता कामा नये. पाकिस्तान निर्मितीची मुस्लिम लीगची मागणी पूर्णपणे उधळून लावली पाहिजे, ही अत्यंत आग्रही भूमिका सावरकरांनी मांडली होती. ती 1942 नंतर 1947 पर्यंत किंबहुना 47 नंतरही कायम होती. सावरकरांनी त्यावेळी जो फाळणीचा इशारा दिला होता तो अक्षरशः तंतोतंत प्रत्यक्षात उतरल्याचे इतिहासाची साक्ष आहे.
काँग्रेसची निरुपायाने फाळणीला मान्यता
पण फाळणीचा इशारा हा फक्त सावरकरांनीच दिला होता हे ऐतिहासिक सत्य नाही. हे जावडेकरांच्या “जीवन रहस्य” या गांधी चरित्रातूनही स्पष्ट होते. कारण त्यांनी उघडपणे राष्ट्रसभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या नेत्यांनी फाळणीला निरुपाय म्हणून मान्यता दिली, असे नमूद केले आहे. यातला “निरुपाय” हा शब्द सावरकरांच्या विश्लेषणाशी अत्यंत जुळणारा आहे. हा “निरुपाय” शब्दच काँग्रेस नेत्यांचा दुबळेपणा आहे,हे सावरकरांनी वारंवार स्पष्ट केले होते. काँग्रेस नेत्यांनी मुस्लिम लीगच्या फाळणीच्या मागणी पुढे अजिबात झुकू नये, असा इशारा त्यांनी याच भूमिकेतून दिला होता. जी भूमिका “निरुपाय” शब्दांनी जावडेकरांनी गांधी चरित्रात नमूद केली आहे.
ऐतिहासिक तथ्य काय??
एकूण 1942 च्या चलेजाव आंदोलनाने प्रचंड जनजागृती केली हे कोणीच अमान्य करत नाही पण प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळविण्यात तसेच भारताची फाळणी टाळण्यात हे आंदोलन अयशस्वी ठरले, हे मात्र गांधीवादी, कम्युनिस्ट आणि हिंदुत्ववादी या तीनही विचार प्रणालींच्या धुरिणांना वाटत होते, हे ऐतिहासिक तथ्य आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App