नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहार मधले स्वयंघोषित मुख्यमंत्री तेजस्वी यादव बनायला चाललेत व्ही. पी. सिंग आणि रामधन; पण फक्त मोटरसायकलवर फेरी मारून त्यांना प्राप्त होईल का सत्ताधन??, असं विचारायची वेळ राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी मारलेल्या कॉफीमुळे आली. Rahul Gandhi
Vote chori चा आरोप करून राहुल गांधींनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोग यांच्या विरोधात रान उठविण्यासाठी बिहार मधल्या 50 विधानसभा मतदारसंघांमधून मतदार अधिकार यात्रा काढली. त्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी मोठमोठी भाषणे केली. त्या भाषणांमधून आरोप जुनेच लावले, फक्त घोषणा नवीन दिल्या. पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी विश्वनाथ प्रताप सिंग आणि समाजवादी नेते रामधन यांची कॉपी मारली. विश्वनाथ प्रताप सिंग आणि रामधन यांनी ज्याप्रमाणे राजीव गांधी सरकार विरुद्ध रान उठवताना मोटरसायकल प्रचार फेऱ्यांची राळ उडवली होती, त्याप्रमाणे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी मतदार अधिकार यात्रेमध्ये मोटरसायकल फेरी मारली. यातून त्यांनी सत्ताधन प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न चालविला.
राजीव गांधी विरुद्ध विश्वनाथ प्रताप सिंग
415 खासदारांच्या पाठिंब्याने राजीव गांधींची सत्ता निरांकुश होती. त्या सरकारमध्येच विश्वनाथ प्रताप सिंग हे अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री होते. राजीव गांधींची सत्ता कुणाला हटवता येणार नाही असे वाटत असतानाच विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बोफोर्स लाचखोरीचे प्रकरण काढले आणि त्यांनी राजीव गांधी यांच्याविरुद्ध मोर्चा खोलला. त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. खासदारकीचाही राजीनामा दिला. अलाहाबाद मधून पोट निवडणूक लढविली. त्यावेळी पोटनिवडणुकीचा प्रचार करताना विश्वनाथ प्रताप सिंग यांनी “आयडियेची कल्पना” वापरली. आपण शेतकरी पुत्र आहोत, ही प्रतिमा जनमानसात ठसविण्यासाठी त्यांनी आणि समाजवादी नेते रामधन यांनी बुलेटवरून गावोगावी जाऊन प्रचार केला. सर्वसामान्य शेतकरी जसा बुलेट किंवा मोटरसायकल या दुचाकीवरून फिरतो, त्याप्रमाणे संस्थानिक असलेले विश्वनाथ प्रताप सिंग शेतकरी पुत्र म्हणून बुलेट वरून फिरले. बोफोर्स घोटाळा प्रकरण त्यांनी देशातल्या जनतेच्या गळी उतरविले. स्वतःची प्रतिमा उंचावली. राजीव गांधींच्या अजिंक्य सरकारला नुसते आव्हान दिले नाही, ते सरकार खाली खेचून दाखविले. विश्वनाथ प्रताप सिंग फक्त अलाहाबादची पोटनिवडणूक जिंकले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी राजीव गांधी सरकार विरुद्ध मोठे रान पेटविले प्रचंड बहुमताचे सरकार 1989 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करून दाखविले होते. हे सगळे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मोटरसायकल राईड करून साध्य केले होते.
– नुसती कॉपी मारून काय होणार??
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी विश्वनाथ प्रताप सिंग आणि रामधन यांची कॉपी हाणली. ते दोघेही बुलेट वरून मतदार अधिकार यात्रेत सामील झाले. पण ज्या पद्धतीने विश्वनाथ प्रताप सिंग आणि रामधन यांनी मोटरसायकलवर फिरून बोफोर्स सौदेबाजीचा मुद्दा जनतेच्या गळी उतरवून राजीव गांधींचे सरकार भ्रष्ट असल्याची प्रतिमा निर्मिती केली होती, तशी मोदी सरकारची आणि निवडणूक आयोगाची प्रतिमा निर्मिती राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे करू शकतील का??, हा खरा सवाल आहे. सवाल फक्त मोटरसायकलवर फिरून मते मागण्याचा नाही, तर मोदी सरकार भ्रष्ट आहे, मोदी सरकारने मतांची चोरी केली, हे मुद्दे जनतेला पटवून देण्याचा आहे. ते पटवून देण्यात राहुल गांधी आणि तेजस्वी यादव कितपत यशस्वी ठरतील??, याविषयी दाट शंका आहे. कारण राजीव गांधी आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांचा इतिहास आणि मोदी आणि राहुल गांधी यांचा इतिहास आणि वर्तमान यात प्रचंड तफावत आहे. विश्वनाथ प्रताप सिंग आणि राहुल गांधी यांच्या राजकीय विश्वासार्हतेत तर जमीन आस्मानाचा फरक आहे. त्यामुळे विश्वनाथ प्रताप सिंग जसे मोटरसायकलवर फिरले, तसे राहुल गांधी मोटरसायकलवर वाटेल तेवढे फिरू शकतील, पण विश्वनाथ प्रताप सिंग यांची राजकीय विश्वासार्हता राहुल गांधी प्राप्त करू शकतील का??, हा कळीचा सवाल आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App