लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात तिथल्या काँग्रेस नेत्यांशी आणि समाजातल्या विविध घटकांशी चर्चा आणि विचार विनिमय करून अहमदाबादच्या “झेड” हॉलमध्ये भाषण करताना स्थानिक काँग्रेस नेत्यांना झापले. निम्म्याहून अधिक लोक काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेत. आजही काँग्रेस मधले काही लोक पक्षात राहून भाजपचे काम करतात. त्यांना आता चाळणी लावून हाकलून काढले पाहिजे. हेच माझे आणि मंचावर बसलेल्या नेत्यांचे काम आहे, असे परखड बोल राहुल गांधींनी Rahul Gandhi ऐकवले.
काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या भाषणाची वाह वाह केली. राहुल गांधींनी Rahul Gandhi गुजरात काँग्रेसला पुनरुज्जीवन दिले. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला, असे उद्गार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शक्ती सिंग गोहिल यांनी काढले. त्यांना विधानसभेतले काँग्रेसचे गटनेते भरत चावडा यांनी अनुमोदन दिले. राहुल गांधींच्या भाषणाची प्रसार माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा रंगली. कारण राहुल गांधींनी बऱ्याच वर्षांनी थेट काँग्रेस नेत्यांना आडव्या हाताने घेतले होते. त्यावरून भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींना चिमटे काढले. राहुल गांधींनी स्वतःच्या चुका आपल्या नेत्यांवर लादण्यापेक्षा त्याविषयीचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला त्रिवेदी यांनी राहुल गांधींना हाणला.
काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या Rahul Gandhi भाषणाची केलेली स्तुती आणि सुधांशु त्रिवेदी यांनी केलेली निंदा या पलीकडे जाऊन राहुल गांधींच्या वक्तव्याचे थोडे राजकीय वास्तवावर आधारित परीक्षण केले, तर वर उल्लेख केलेला सवाल मनात येतो. काँग्रेसचे निम्म्याहून अधिक लोक भाजपामध्ये जात असताना राहुल गांधी आणि गुजरात मधले काँग्रेस नेते झोपले होते का??, हा तो सवाल आहे.
वास्तविक राहुल गांधींनी भाषणात सांगितलेले एक वास्तव त्यांच्या समर्थकांनी आणि टीकाकारांनी दुर्लक्षित केले, ते म्हणजे काँग्रेसला आजही गुजरात मधल्या 40 % मतदारांचा पाठिंबा आहे. उरलेले फक्त 5 % टक्के मिळवायचे आहेत, पण गेल्या 30 वर्षांमध्ये हे 5 % काँग्रेसची पुरती दमणूक करत आहेत. काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचू देत नाहीयेत.
अगदी काँग्रेसच्या गेल्या 30 वर्षांमधला नाही, तर किमान 15 वर्षांमधला पॉलिटिकल परफॉर्मन्स पाहिला, तरी याची सत्यता पटेल. काँग्रेसला 2007, 2012 आणि 2017 या निवडणुकांमध्ये खरंच 40 % त्याच्याच आसपास मते मिळालीत. शिवाय 182 आमदार संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत ६० आमदारांच्या आसपास जागा मिळाल्यात. याचाच अर्थ काँग्रेस गुजरात मध्ये फार दुबळी आहे, असे बिलकुल नाही. 2007 मध्ये 59, 2012 मध्ये 61, 2017 मध्ये तर तब्बल 77 आमदार निवडून आणण्याची काँग्रेसची क्षमता राहिली. 2017 च्या निवडणुकीत तर भाजपा पहिल्यांदाच 100 खाली म्हणजे 99 वर आली होती. काँग्रेस आणि भाजप यांच्यातल्या जागांचे अंतर फक्त 20 आमदारांचे होते. आणि मतांची टक्केवारी 49.1 % आणि 41.1 % अशी होती. याचा सरळ अर्थ असा की काँग्रेस सत्तेपर्यंत पोहोचू शकली नाही, तरी गुजरात सारख्या मोदी + शाहांच्या बलाढ्य राज्यात पक्षाची अवस्था बिलकुल दुबळी नव्हती. ती दुबळी अवस्था 2022 च्या निवडणुकीत काँग्रेसला प्राप्त झाली. कारण काँग्रेसला फक्त 17 आमदार निवडून आणले.
…आणि इथेच खरी राहुल गांधींच्या Rahul Gandhi भाषणातली मेख दडली आहे. 2017 ते 2022 या कालावधीत काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर मजबूत नेतृत्व उभे करता आले नाही. राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांनी आणि गुजरात मधल्या नेत्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यात लक्षच घातले नाही. त्याउलट शंभरीच्या खाली आलेले भाजपचे नेते मात्र कमालीचे सावध झाले आणि त्यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केले. भाजपने सरकारमध्ये अमुलाग्र बदल केले. मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री बदलून टाकले. सरकारी योजना जास्तीत जास्त परिणामकारकपणे राबविल्या. एकीकडे सरकारी योजनांची परिणामकारक अंमलबजावणी, दुसरीकडे संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल आणि याच 5 वर्षांच्या कालावधीत काँग्रेसचे जिंकून येण्याची क्षमता असलेले नेते भाजपने आपल्या गळाला लावले. त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले. पण काँग्रेसचे नेते आपल्या कुठल्याच फळीतल्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये टिकवून धरू शकले नाहीत. त्यांना पक्ष बळकटीचा कुठला कार्यक्रम देऊ शकले नाहीत. इथेच सगळी “गेम” फिरली. त्याचा परिणाम 2022 च्या निवडणुकीत दिसला… म्हणूनच राहुल गांधींना काँग्रेसचे निम्म्याहून अधिक नेते भाजपमध्ये निघून गेल्याचे बोलावे लागले. यातच काँग्रेस नेते गेल्या 5 वर्षांमध्ये राजकीय दृष्ट्या झोपले होते, हे स्पष्ट झाले. फक्त राहुल गांधी काही मर्यादांमुळे ते उघडपणे बोलू शकले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App