विशेष प्रतिनिधी
पुणे : Rahul Gandhi in the press conference : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सातत्याने भाजपा मत चोरी करून सत्तेत आल्याचा आरोप करत आहेत. खूप दिवसापासून ते मत चोरीचा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात त्यांनी वोट अधिकार यात्रा देखील काढली होती. सात आगस्ट 2025 मध्ये राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकातील महादेवपुरा मतदार संघात कशाप्रकारे मतदार यादीत घोळ करण्यात आला. याचे दाखले दिले होते. त्यानंतर राहुल गांधी हे मतचोरी बद्दल आणखी एक हायड्रोजन बॉम्ब फोडतील असे काँग्रेस कडून सांगण्यात येत होते. आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील ‘राजुरा’ या मतदारसंघात मत चोरी झाल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात मतचोरीचे गंभीर आरोप समोर आले आहेत. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यासह दावा केला आहे की, या मतदारसंघात हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून हटवण्यात आली, तर 6,850 नवीन नावे बेकायदेशीरपणे जोडण्यात आली. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे राजुरा मतदारसंघातील निवडणूक निकाल आणि मतदारसंख्येकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजुरा विधानसभा निवडणूक निकाल 2024
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार देवराव विठोबा भोंगळे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष रामचंद्रराव धोटे यांचा 3,054 मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत देवराव भोंगळे यांना 72,882 मते मिळाली, तर सुभाष धोटे यांना 69,828 मते मिळाली. कमी मताधिक्याने लागलेला हा निकाल आणि राहुल गांधी यांनी केलेले मतचोरीचे आरोप यामुळे या मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राजुरा मतदारसंघातील मतदारसंख्या आणि मतदान केंद्रे
नोंदणीकृत मतदार : 3,15,073 पुरुष मतदार : 1,59,821 महिला मतदार : 1,55,252 मतदान केंद्रे : 344
राजुरा हा चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित मतदारसंघ आहे. राजकीयदृष्ट्या हा मतदारसंघ संवेदनशील आणि चुरशीचा मानला जातो.
राहुल गांधींचे गंभीर आरोप
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “राजुरा मतदारसंघात हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली, तर 6,850 नवीन नावे बेकायदेशीरपणे जोडण्यात आली. मतचोरीचे स्पष्ट पुरावे आमच्याकडे आहेत. असाच प्रकार महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणा येथेही घडला आहे.” त्यांनी कर्नाटकातील एका मतदारसंघाचे उदाहरण देत सांगितले की, तिथे 6,018 मते हटवण्यात आली. एका बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांना त्यांच्या काकांचे नाव यादीतून वगळल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मागील निवडणूक निकाल
2019 : सुभाष धोटे (काँग्रेस) विजयी – 60,228 मते, वामनराव चटप (स्वतंत्र भारत पक्ष) पराभूत – 57,727 मते. 2014: संजय धोटे (भाजप) विजयी – 66,223 मते, सुभाष धोटे (काँग्रेस) पराभूत – 63,945 मते.
सुभाष धोटे यांचे आरोप
राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष धोटे यांनीही यापूर्वी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले होते. त्यांनी सांगितले की, “निवडणुकीपूर्वी मी बोगस मतदार नोंदणीची तक्रार जिल्हाधिकारी आणि एसडीएम यांच्याकडे केली होती. त्यानुसार 6,853 बोगस नावे यादीतून कमी करण्यात आली. तरीही 10 ते 12 हजार बोगस मते शिल्लक होती. निवडणुकीच्या धामधुमीत आमचे त्याकडे लक्ष गेले नाही. राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर आम्ही गावागावांत चौकशी केली असता, गडचांदूर आणि राजुरा येथे बोगस मतदार आढळले.” धोटे यांनी पुढे सांगितले की, बोगस नावे नोंदवणाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केलेली नाही. याबाबत त्यांनी आयोगाशी सातत्याने पत्रव्यवहार केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
कोण आहेत देवराव भोंगळे?
देवराव भोंगळे हे भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय आहेत. भाजपने 2024 च्या निवडणुकीसाठी त्यांना राजुरा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. भोंगळे हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष धोटे यांच्याविरुद्ध विजय मिळवला. भाजपने त्यांच्या रूपाने राजुरा मतदारसंघात एक तरुण आणि नवीन चेहरा दिला होता.
राहुल गांधी आणि सुभाष धोटे यांच्या आरोपांमुळे राजुरा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कमी मताधिक्याने लागलेला निकाल आणि मतदार यादीतील कथित गैरप्रकारांमुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App