विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला साधारण शंभर-सव्वाशे दिवस राहिलेले असताना प्रियांका गांधी अखिलेश यादव आणि मायावती यांनी भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारवर एका पाठोपाठ एक मुद्द्यांवर तोफा डागायला सुरुवात केली असताना भाजपने देखील या तीनही पक्षांच्या नेत्यांना काटशह देण्यासाठी शंभर दिवसांचा मास्टर प्लान आखला आहे. वर उल्लेख केलेल्या तिन्ही नेत्यांचा भाजपच्या अपयशावर प्रहार करण्याचा इरादा आहे, तर भाजपचा सकारात्मक प्रचारावर भर देण्याचा विचार आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने लखीमपूर हिंसाचाराच्या घटनांवर लक्ष केंद्रित केले आहे, तर मायावती यांनी दलित अत्याचारांच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनांवर भर देत थेट लाभार्थ्यांशी संवाद कार्यक्रम हे ग्राम पातळीपासून राज्य पातळीपर्यंत आखले आहेत. बुथ पातळीवरची योजना तर भाजपकडे तयार आहेच. ती 2017 च्या निवडणुकीत आधीच राबवली आहे. त्यामध्ये काही सुधारणा करून बुथ मजबूत करण्याच्या दृष्टीने नियुक्त्या सुरू आहेत. त्याच वेळी विशिष्ट मतदारसंघांवर भर देत तेथे स्थानिक पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत या मुद्द्यांवर प्रचाराची रणनीती ठरविण्यात येत आहे.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने संघटनात्मक दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात सोमवारी राज्याच्या निवडणूक संघासोबत दीर्घ चर्चा केली. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा देखील काही काळ बैठकीत उपस्थित होते. बैठकीत, पुढील १०० दिवसांसाठी कार्यक्रम तयार करण्याबरोबरच, ते जनतेपर्यंत सकारात्मकतेने पोहचण्यास सांगितले आहे. राज्याच्या सर्वसमावेशक राजकीय आढाव्यासह, लखीमपूर घटना आणि त्याचे परिणाम यावरही बैठकीत चर्चा झाली.
भाजपच्या जुन्या मध्यवर्ती कार्यालयात ही बैठक झाली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी संघटनात्मक तयारी पाहता ही बैठक बोलवली होती. बैठकीला प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि राज्य संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सल यांच्यासह निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, संस्थेचे प्रभारी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष राधा मोहन सिंग उपस्थित होते.
पुढील १०० दिवसांसाठी ब्लू प्रिंट तयार करणे, प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख तैनात करणे, अर्धा डझनहून अधिक सामाजिक परिषदा आयोजित करणे आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी कार्यक्रम चालवण्याचे सांगितले गेले आहे.
बैठकीत पक्षाच्या विद्यमान आणि भविष्यातील मित्रपक्षांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली आहे. यामध्ये आघाडीची स्थिती आणि पक्षाची रणनीती वेळेआधीच अंमलात आणली जाईल जेणेकरून शेवटच्या क्षणी उमेदवारीबाबत फार गोंधळ होऊ नये यासाठी निर्णय घेण्यात आला.
उत्तर प्रदेशात जानेवारी महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या दृष्टिकोनातून, पक्षाकडे आता फक्त १०० दिवस शिल्लक आहेत. ज्यामध्ये भाजपा उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा निवडणुका जिंकण्याची तयारी करत आहे. आतापासून काम सुरू झाल्यास, भाजपाला जानेवारीच्या मध्यापर्यंत १०० दिवसांचा वेळ मिळणार आहे.
भाजपाने उत्तर प्रदेशात विविध जाहीर सभा घेण्याचे आणि बूथ स्तरावर आपली उपस्थिती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील ४०३ विधानसभा मतदारसंघांसाठी पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा राज्यात ३१२ जागा जिंकून पुन्हा सत्तेवर आला होता. भाजपाने निवडणुकीत ३९.६७ टक्के मते मिळवली. गेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला ४७, बहुजन समाज पार्टीला (बसपा) १९ आणि काँग्रेसला फक्त ७ जागा मिळाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App