Savarkar and Nehru स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या सध्याच्या राजकारणात दोन परस्पर विरोधी टोके मानले जातात. नेहरू विरोधी विचार म्हणजे सावरकर आणि सावरकर विरोधी विचार म्हणजे नेहरू, असे समीकरण या दोघांचेही अनुयायी मांडतात, पण प्रत्यक्षात सावरकर आणि नेहरू यांच्यात अनेक मुद्द्यांवर गंभीर मतभेद असले, तरी त्यांच्या काही विचारांमध्ये विलक्षण साम्य होते आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक “गांधीय” नेत्यांपेक्षा नेहरू आणि सावरकर यांचे विचार अधिक आधुनिक आणि काळाशी सुसंगत होते.Savarkar and Nehru
विज्ञाननिष्ठा हा समान धागा
मुख्य म्हणजे नेहरू आणि सावरकर हे दोघेही भारताला कुठलाही जुनाट, गतानुगतिक संकल्पनेनुसार वळण देऊ इच्छित नव्हते, तर आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे भारताला एक आधुनिक विकसित राष्ट्र म्हणून संपूर्ण जगासमोर आणू इच्छित होते. विज्ञाननिष्ठा हा दोघांच्याही विचारांमधला समान धागा होता. 1940 च्या दशकात सावरकरांनी या संदर्भात स्पष्ट विचार देखील मांडले होते. काँग्रेसमधल्या बाकीच्या “गांधीय” नेत्यांशी आपले विचार कधी जुळणार नाहीत, पण त्यातल्या त्यात विचार जमले आणि जुळले, तर ते पंडित नेहरूंशीच जुळू शकतील, अशी स्पष्ट भूमिका सावरकरांनी त्यावेळी मांडली होती. कारण सावरकरांना ज्या विज्ञानाधिष्ठित भारतीय राष्ट्राची मांडणी करायची होती, त्याच्याशी सुसंगत असे फक्त त्यावेळी नेहरूंनी विचार मांडले होते. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही विचार विज्ञाननिष्ठेशी सुसंगत होते.
म्हणूनच पंडित नेहरूंनी सत्ताप्राप्तीनंतर भारताला “गांधीय” विचारांच्या मागे न नेता आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक संस्थांची निर्मिती केली. गांधींचे शांततेचे तत्त्वज्ञान त्यांनी स्वीकारले, पण म्हणून अणुऊर्जेचा निषेध केला नाही. उलट डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली अणुऊर्जा आयोगाची स्थापना करून “शांततेसाठी अणू” ही संकल्पना विकसित केली. त्यांनी अनेक विज्ञान प्रकल्पांना सुरुवात केली. यामध्ये भारताचा अवकाश क्षेत्रात प्रवेश, त्याचबरोबर मूलभूत विज्ञान संशोधनात प्रवेश सुकर केला. पंडित नेहरू यांच्याऐवजी अन्य कुठलाही “गांधीय” नेता देशाच्या नेतृत्वपदी असता, तर विज्ञाननिष्ठ राष्ट्रवादापेक्षा “गांधीय” तत्त्वज्ञानावर आधारित कुठलातरी धर्मभोळा राष्ट्रवाद भारतात अवलंबण्याचा धोका होता, तो नेहरूंच्या नेतृत्वामुळे टळला.
– संरक्षण आणि परराष्ट्र धोरणात गंभीर मतभेद
नेहरू आणि सावरकरांच्या विचारांमधले मतभेद अर्थातच देशाच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाविषयी राहिले. सावरकरांचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण अत्यंत आक्रमक आणि व्यवहार्य राहिले. शांतता ही सबळाची मान्य होते, दुर्बळाची नाही, हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. त्यामुळे देशाच्या सीमा तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात. केवळ शांतिपाठ वाचून जगात तुमचा देश जगात टिकणारा नसतो हे परखड विचार सावरकरांनी आक्रमकपणे मांडले, पण सत्ताधारी म्हणून नेहरूंना हे विचार आधी रुचले नाहीत आणि नंतर ते अंमलात आणणे शक्य झाले नाही.
आर्थिक धोरणाच्या बाबतीत पंडित नेहरूंना समाजवादाचे विलक्षण आकर्षण होते. गांधीजींची विश्वस्त संकल्पना नेहरूंना काही प्रमाणात मान्य होती, काही बाबतीत ते कम्युनिस्टांच्या जवळही होते, पण राज्यकर्ता म्हणून नेहरूंना समाजवादातून येणारी लालफितशाही रोखता आली नाही. त्यावेळच्या भांडवलदारांशी मैत्रीचे संबंध असून देखील नेहरूंच्या काळात पब्लिक – प्रायव्हेट पार्टनरशिप फार फुलू शकली नाही.
– राज्यकर्ता आणि मार्गदर्शक
त्या उलट सावरकर कुठल्या ism च्या प्रेमात कधी पडले नाहीत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातला व्यवहार्य दृष्टिकोन त्यांनी कधी सोडला नाही, पण नेहरूंइतके किंबहुना त्यांच्या पासगांलाही पुरेल इतके निवडणुकीतले यश सावरकरांना कधीच लाभले नाही. स्वतः नेहरू आणि त्यांचे पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले सहकारी निवडणूक तंत्रात त्यावेळी फारच पुढे होते. सावरकर आणि त्यांचे अनुयायी त्यांच्या जवळपासही पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे नेहरू कायम “राज्यकर्ता” या भूमिकेत राहिले, तर सावरकर फक्त “मार्गदर्शक” या भूमिकेत राहू शकले. सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्व विचाराचा नेहरूंनी प्रखर विरोध केला, तर नेहरूंच्या “कबुतरी शांतता धोरणाला” सावरकरांनी प्रखर विरोध केला. दोघांनाही काही प्रमाणात कम्युनिझम मान्य होता. सावरकरांचे हिंदुत्व मानणारा कम्युनिस्ट असला, तरी ते सावरकरांना मान्य होते. कारण सावरकरांचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वाशी संलग्न होते त्याचा धार्मिकतेशी संबंध नव्हता, पण नेहरुंना हिंदुत्व हा शब्द आणि संकल्पना हे दोन्ही मान्य नव्हते. पण त्यामुळे नेहरू टोकाचे धर्मनिरपेक्ष झाले आणि त्याचा लाभ इस्लामिस्टांनी उठवला. सावरकरांच्या राजकीय आणि राष्ट्रीय हिंदुत्वाचा अर्थ त्यांच्या अनुयायांना देखील त्यावेळी फारसा उमजला नाही. सावरकर कधी राज्यकर्ते झाले नाहीत म्हणून त्यांचे विचार त्यावेळी प्रत्यक्ष ते अंमलात आणू शकले नाहीत.
पण आज सावरकर आणि नेहरू यांच्या विचारांमधले हे भेद आता देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात ठळक झालेत. नेहरूंचा विचार मागे पडून सावरकरांचा विचार पुढे आलाय. देशाच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणावरचा नेहरूंचा शिक्का पुसून सावरकरांचा शिक्का ठळक झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App