गुजरातमधील चक्रीवादळाने गुजरातमध्ये केलेल्या नुकसानीची हवाई पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली. त्यानंतर त्यांनी गुजरातला एक हजार कोटी रुपयांची मदत केली. त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रालाही का मदत जाहीर केली नाही, असा प्रश्न केला जात आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. The reason why Prime Minister Narendra Modi did not inspect Maharashtra, Explanation by Chandrakant Patil; Also clarified Modi has same feelings for Maharashtra like Gujrat over Tauktae Cyclone issue
प्रतिनिधी
पुणे : चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्दल मदत जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केलेला नाही. गुजरातचा पाहणी दौरा केल्यानंतर त्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सर्वच राज्यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली तसेच सर्व संबंधित राज्यांना मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातमधील नुकसानाची हवाई पाहणी केल्यानंतर जी मदत जाहीर केली ती संपूर्ण देशासाठी आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान तसेच दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली या दोन केंद्रशासित प्रदेशातील वादळाच्या तडाख्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये अशी मदत पंतप्रधानांनी जाहीर केली. तसेच या सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना वादळामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविल्यानंतर तातडीने आर्थिक मदत देण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिलेली आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्र किंवा कोणत्याही राज्याच्या बाबतीत भेदभाव केलेला नाही.
त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातसोबत महाराष्ट्र दौराही ठरला होता. परंतु हवामान खात्याने त्यावेळी राज्याच्या सागरी पट्ट्यात हवाई प्रवास करण्याबाबत प्रतिकूल अहवाल दिल्यामुळे तो दौरा रद्द झाला आणि पंतप्रधान गुजरातकडे रवाना झाले. ते म्हणाले की, सुरक्षा यंत्रणांचा सल्ला ध्यानात घेतल्यानंतर आणि अधिकाधिक परिसराची पाहणी करता यावी यासाठी पंतप्रधान हवाई पाहणी करतात. त्यानुसार मोदी यांनी गुजरातमधील नुकसानीची हवाई पाहणी केली. काँग्रेस पक्षाच्या नेत्या व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या सुद्धा अशाच पाहणी करत होत्या. हवाई पाहणी केली म्हणून टीका टिप्पणी करणाऱ्यांना थोडे इतिहासाचेही भान असायला हवे.
पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यास कधी नव्हे ते घराबाहेर पडले आहेत. त्यांनी इतरांना आपला हवाई प्रवास नाही तर जमिनीवरून प्रवास आहे, असे शिकवू नये. ते जमिनीवरून प्रवास करत आहेत आणि त्यांचे पायही जमिनीवर असतील तर त्यांना शुभेच्छा. त्यांनी विसरू नये की, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वादळ आल्यानंतर ताबडतोब रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांचा प्रवास सुरू केला आणि हवाई नव्हे तर जमिनीवरून तीन जिल्ह्यांचा विस्तृत प्रवास केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App