सुरेश कलमाडी लक्षात राहतील, ते पुण्यातल्या काँग्रेसचे अखेरचे धुरंधर नेता म्हणून!! कर्नाटकातून पुण्यात येऊन संपूर्ण पुणे शहर काँग्रेसचे नेतृत्व मिळविणे तसे सोपे नव्हते. कारण सुरेश कलमाडी ज्यावेळी पुण्यात आले, त्यावेळी पुण्याच्या काँग्रेसमध्ये मोठ्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी होती. विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक यांचे नेतृत्व तेव्हा पुण्याच्या क्षितिजात चमकत होते. आजच्या भाषेत बोलायचे झाले, तर गाडगीळ आणि टिळक हे दोघे पुण्याचे “कारभारी” होते. त्यावेळी पुण्यात काँग्रेसचे दोन गट होते. एक गट गाडगीळांचा, तर दुसरा गट टिळकांचा.
– मोठा वारसा नसतानाही…
विठ्ठलराव गाडगीळ आणि जयंतराव टिळक यांना फार मोठा राजकीय वारसा लाभला होता. या दोन्ही कर्तृत्वान नेत्यांनी पुण्याच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणे स्वाभाविक होते. पण सुरेश कलमाडींना गाडगीळ आणि टिळकांसारखा कुठला राजकीय वारसा लाभला नव्हता. सुरेश कलमाडी या दोघांनाही फार “ज्युनियर” नेते होते. तरी देखील कलमाडी या दोन्ही नेत्यांवर विशिष्ट टप्प्याचा कालखंडात “भारी” ठरले. कारण राजीव गांधींशी त्यांची जवळीक होती. राजीव गांधींनी ज्या काँग्रेसच्या तरुण नेत्यांची पिढी पुढे आणली, तिच्यात सुरेश कलमाडींचा समावेश होता. राजीव गांधींच्या साह्याने सुरेश कलमाडी नेतृत्वाच्या पायऱ्या भराभर चढले आणि पुण्याच्या नेतृत्वपदी विराजमान झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गाडगीळ आणि टिळक या दोघांचेही नेतृत्व अस्तंगत होत गेले.
– पुण्यावर तीन दशके “राज्य”
सुरेश कलमाडींनी साधारण तीन दशके पुण्यावर “राज्य” केले. त्यावेळी “सुरेश कलमाडी बोले आणि पुणे काँग्रेस हाले” अशी अवस्था होती. पुण्याचा महापौर पुना कॉफी हाऊस किंवा कलमाडी हाऊस वर ठरायला लागला होता. सुरेश कलमाडींनी पुणे काँग्रेसला एकमुखी नेतृत्व दिले. ते राजीव गांधींप्रमाणेच शरद पवारांचे देखील निकटवर्ती नेते होते. पवारांवर त्यांची निष्ठा होती, ती एवढी की त्यांनी पवारांच्या पंतप्रधान पदासाठी दिल्लीत “लॉबिंग” केले होते. पण सुरेश कलमाडींचे दिल्लीचे “लॉबिंग” पवारांना काही मानवले नाही. कारण दिल्लीच्या “लॉबिंग” मध्ये सुरेश कलमाडी जरी फार माहीर असले, तरी पवार तेवढे कर्तृत्ववान नव्हते. त्यामुळे कलमाडींच्या “लॉबिंगचा” उपयोग करून पवार काही पंतप्रधान पद मिळवू शकले नव्हते.
– पवारांबरोबर नाही गेले म्हणून…
नंतर पवारांचे काँग्रेसमध्येच फाटले, पण त्यावेळी पवारांबरोबर जाण्याची चूक सुरेश कलमाडी यांनी केली नाही. त्यामुळे पुणे काँग्रेसवर त्यांचे वर्चस्व व्यवस्थित टिकून राहिले. त्याचबरोबर सुरेश कलमाडींची पुण्यातला काँग्रेसचा केंद्रीय पातळीवरचा नेता म्हणून सुद्धा स्वतंत्र ओळख निर्माण होऊ शकली. ती प्रफुल्ल पटेल किंवा आधीच्या आबासाहेब कुलकर्णी खेबुडकरांसारखी झाकोळली गेली नाही.
– पुणे काँग्रेसचे अखेरचे धुरंधर
सुरेश कलमाडींनी पुण्याच्या काँग्रेसला एकमुखी नेतृत्व दिले. काँग्रेसचा तो राजकीय वैभवाचा काळ पाहिला. केंद्रीय मंत्रिपद उपभोगले. पुणे फेस्टिवल सारखा महोत्सव सुरू करून पुण्याला आणि पुण्याच्या गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. पण शरद पवारांशी फाटल्यानंतर सुरेश कलमाडींच्या एकमुखी नेतृत्वाला ग्रहण लागले. परंतु, कलमाडींनी त्यावेळी सुद्धा हार मानली नव्हती. सुरेश कलमाडींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसच्या पराभव करण्यासाठी शरद पवारांनी जंग जंग पछाडले होते, पण त्यांना सुरुवातीच्या निवडणुकांमध्ये तरी यश आले नव्हते. अगदी सुरेश कलमाडींचे नेतृत्व कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये अडकले. त्यांना तुरुंगात जावे लागले, त्यानंतर 2007 मध्ये अखंड राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांचे नेतृत्व यामुळे पुण्यात काँग्रेसचा पराभव होऊ शकला. 2007 च्या पराभवानंतर सुरेश कलमाडींचे नेतृत्व अस्तंगत होत गेले. सुरेश कलमाडींनी पुण्याच्या काँग्रेसला एकमुखी नेतृत्व दिले, हे जेवढे खरे तेवढेच सुरेश कलमाडींनी पुण्यात काँग्रेसच्या नेत्यांची नवी फळी निर्माण केली नाही. किंवा ती त्यांना करता आली नाही, हेही तेवढेच खरे. हे राजकीय सत्य नाकारण्यात मतलब नाही. कारण त्यांचे नेतृत्व अस्तंगत होताना किंवा अस्तंगत झाल्यानंतर सुद्धा पुण्याच्या काँग्रेसला संजीवनी देईल, असे नेतृत्व विकसित होऊ शकले नाही. या अर्थाने सुरेश कलमाडी हे पुण्यातल्या काँग्रेसचे अखेरचे धुरंधर ठरले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App