विशेष प्रतिनिधी
मुंबई : Election Commission महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, ईव्हीएम यंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करणे शक्य नाही. निवडणूक आयोगाने यंत्रांची तपासणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निष्कर्ष दिला असून, सर्व यंत्रे योग्य स्थितीत कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे. Election Commission
2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाल्याने विरोधकांनी मतदान यंत्रांवर संशय व्यक्त केला होता. वाढलेल्या मतदानाच्या आकड्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र आयोगाने या सर्व आरोपांचे खंडन केले असून, कोणतीही गडबड किंवा छेडछाड झाल्याचे पुरावे सापडले नसल्याचे सांगितले आहे. Election Commission
ईव्हीएम तपासणी प्रक्रियेत आठ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून यंत्रांची पडताळणी केली. एकूण 48 मतदार युनिट्स, 31 नियंत्रण यंत्रे आणि 31 व्हीव्हीपॅट यांची सखोल तपासणी करण्यात आली. यातील दोन उमेदवारांनी मात्र उपस्थित राहणे टाळले.
कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला आणि माजलगाव या मतदारसंघांमध्ये मायक्रोकंट्रोलर आणि मेमरीसंदर्भात निदान चाचण्या घेण्यात आल्या. तर पनवेल, अलिबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगाव येथील यंत्रांवर निदान चाचणीबरोबरच मॉक पोलही घेण्यात आला. सर्व चाचण्यांत यंत्रे पूर्णपणे कार्यक्षम असल्याचे आढळून आले.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, ईव्हीएम यंत्रे पूर्णपणे ‘स्टँड-अलोन’ असतात, म्हणजेच ती इंटरनेट किंवा कोणत्याही बाह्य नेटवर्कशी जोडलेली नसतात. त्यामुळे हॅकिंग किंवा बाह्य हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही. यंत्रांची रचना, निर्मिती आणि वापर ही संपूर्णपणे पारदर्शक व सुरक्षायुक्त असल्याचा दावा आयोगाने केला आहे.
पारदर्शक तपासणीनंतरही ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करणे हा जनतेच्या लोकशाही प्रक्रियेवरील विश्वासाला तडे देण्याचा प्रकार असल्याचे मत आयोगाने व्यक्त केले आहे. निकाल मान्य न करणाऱ्या विरोधकांनी आधी पुरावे द्यावेत आणि नंतर आरोप करावेत, अशी अप्रत्यक्ष टीकाही यावेळी करण्यात आली.
एकूणच, निवडणूक आयोगाने ईव्हीएम संदर्भातील शंका पूर्णपणे फेटाळून लावत स्पष्ट केले आहे की, भारतातील निवडणूक प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App