Sushma Andhare : सरन्यायाधीश भूषण गवई तुम्ही पापी आहात; सुषमा अंधारे यांचे खुले पत्र; RSSच्या कार्यक्रमाला नकार देता म्हणजे काय?

Sushma Andhare

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sushma Andhare शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना एक खुले अनावृत्त पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत ही घटना नेमकी का घडली? याचे काही संदर्भ दिले आहेत. विशेषतः त्यांनी देशातील जातव्यवस्थेवरही या पत्राद्वारे प्रहार केला आहे. त्यांचे हे पत्र सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे.Sushma Andhare



खाली वाचा त्यांचे पत्र जशास तसे…

प्रति,
माननीय सरन्यायाधीश,
सर्वोच्च न्यायालय, भारतीय संघराज्य
प्रिय भूषण सर,
सस्नेह जय भीम.
खरंतर मी आपल्याला थेट फोन करूनही बोलू शकेल. किंवा आपल्याला व्यक्तिगत रीत्याही पत्र पाठवू शकेल. पण तरीसुद्धा हे अनावृत्त पत्र लिहीत आहे.
न्यायव्यवस्थेचा सर्वोच्च अधिकारी असताना स्वतः संदर्भातील atrocity मध्ये तुम्हालाच न्याय मिळत नाही..!
पत्र लिहिण्याचे कारण की, आपण सध्या ज्या स्थितीतून आणि संघर्षातून जात आहात तो संघर्ष आणि त्यातील वेदना ही केवळ तुमची वेदना नाही तर प्रस्थापित वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या एका संपूर्ण समूहाची सहसंवेदना आहे.
भूषण सर, तसे तर आपण माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने अनुभवाने मोठे आहात पण तरीसुद्धा हे आपल्याला लिहिण्याचं धाडस करत आहे.
सर, माझे आजोबा कबीरपंथी. आजोबांनी मनावर कबीर बिंबवले.
कबीर…
कोणी गुलाल झाला
कोणी अबिर झाला
ज्याला न जात आहे
तो एक कबीर झाला..
आजोबा शिकवायचे, कबीर सांगतात
“जाती न पूछो साधु की
पूछ लीजियो ज्ञान
मोल करो तलवार का
पडी रहने दो म्यान ”
मराठीतही एक म्हण आहे ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नये म्हणतात..!
पण हे ऋषीच्या बद्दल बोललं जातं.
भूषणसर तुम्ही ऋषी नाहीत… !
तुम्ही पापी आहात…! कारण तुम्ही ऋषीकुळात जन्माला आला नाहीत.
तुम्ही अशा कुळात जन्माला आला त्याच्याबद्दल बोलताना इथले संस्कृत मधले श्लोक सांगतात,
ढोर गवार पशु शूद्र नारी
सब ताड़न के अधिकारी
ज्या समूहाचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारले, अशा समूहात तुम्ही जन्म घेतला हे केवढं मोठे पाप केलंय तुम्ही..!
व्यवस्थेने नाकारलेल्या एका शूद्र समूहामध्ये तुम्ही जन्म घेतला. पण नुसता जन्म घेतला एवढंच तुमचं पाप नाही; तर तुम्ही वर्णव्यवस्थेने ज्ञानार्जनाचा अधिकार नाकारलेला असतानाही उच्चशिक्षण घेतलं. हा केवढा मोठा प्रमाद आहे…!
बरं शिक्षण घेऊन तरी थांबायचं.. शांत बसायचं. फार फार तर एखाद्या कचेरीमध्ये फायली इकडून तिकडे ने आण करण्याची किंवा कार्यालयातील झाडलोट करण्याची एखादी तुटपुंजी नोकरी स्वीकारायची. तर तुम्ही चक्क या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदापर्यंत मजल मारली…!
संसदीय कामकाजात केले जाणारे कायदे योग्य की अयोग्य.. त्या कायद्यांची संविधानिक चौकट ठरवण्याचा अधिकार असणाऱ्या सर्वोच्च खुर्चीमध्ये तुम्ही बसता हे नुसतं पाप नाही. हा गुन्हा आहे फार मोठा.. मग ते कसे सोडतील..!
खरंतर तुमच्या मातोश्रींनी संघाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करायला हवा होता. पण त्यांनीही साफ नकार दिला. भलेही सबंध आयुष्य नकार पचवण्याचं दुःख तुमच्या उरात दडलेलं असेल.. पण तुम्ही नकार पचवायचे असतात..नकार द्यायचे नसतात…!!!
.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला नकार देता म्हणजे काय..?
पण कदाचित आत्ता कमलताईंना सुद्धा ही गोष्ट अधिक प्रकर्षाने जाणवत असेल की; बाबासाहेबांनी इथल्या एकूण वर्णव्यवस्थेच्या विरोधातले रणशील का फुंकले होते ? ..का फुल्यांनी विद्रोह केला होता ? ..का प्रबोधनकार ठाकरेंनी देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे पुस्तक लिहिलं होतं..?
…का संत चोखा महारा ने ,
हरी मज पशु कर पक्षी कर परी करू नको महार
ही कळकळीची आर्जव त्या पांडुरंगाकडे केली होती..?
कळतेय ना ही दाहकता.. ?
भूषण सर, आता नक्कीच लक्षात येत असेल तुमच्या तुम्ही काय पाप केलंय ते…
प्रबोधनकारांवरून आठवलं.. आजच मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये देवळाचा धर्म आणि धर्माचे देवळे व देशाचे दुश्मन हे पुस्तक आम्हाला का दिलं म्हणून चिडलेल्या नर्सने पुस्तक देणाऱ्याच्या तोंडावर भिरकावले. एवढी हिम्मत येते कुठून हा प्रश्नच विचारू नका..
अहो सर, जेधे जवळकरांनी जी चळवळ उभी केली. दिनकरराव जवळकर हे क्रांतीबा ज्योतिबा फुले यांचे अनुयायी. फुलेंचा अवमान सहन न झाल्याने जवळकरांनी हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर जवळकर यांच्यावर खटले भरले गेले.
विशेष हा खटला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लढवला आणि तो जिंकला सुद्धा. त्याच बाबासाहेबानी महिलांच्यासाठी विशेष हिंदू कोड बिल मांडले आणि ते मंजूर होत नाही म्हटल्यावर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
नेमकं तेच पुस्तक एक महिला अत्यंत तीरस्काराने भिरकावते…!.
विचार करा सर ,
फुले शाहू आंबेडकर या राज्यात जन्माला आले त्या राज्यांमध्ये किती विखारी मनुवादी विचार भरलेला आहे.
सर,
तुमच्या संबंधाने निषेध नोंदवायला फारसे कुणीच पुढे आला नाही बरं का.
या देशाच्या पंतप्रधानांना आपल्या संबंधाने निषेध नोंदवण्यासाठी तब्बल आठ तास लागले. विशेष या पंतप्रधानांना जे शपथ देतात त्या राष्ट्रपतींना शपथ देण्याचा अधिकार आपल्या ठायी आहे. तरीही आपली ही अवस्था..!
एरवी कुणी साधे शिंकले तरी लगेचच तासभराच्या लाईव्ह चर्चा झडायला लागतात.. मात्र मुख्य प्रवाहातल्या वृत्तवाहिन्यांना सुद्धा आपल्या विषयावर चर्चा घडवाव्या असं वाटलं नाही… (काही सन्माननीय अपवाद वगळता… )
एरवी एखाद्या तलाठी किंवा ग्रामसेवकाच्या सोबत जर चुकीचा वर्तनव्यवहार घडला तर सगळे तलाठी ग्रामसेवक लेखणी बंद वगैरे आंदोलन करून आपली एकजूट प्रदर्शित करतात आणि त्या विरोधात निषेध नोंदवतात. मात्र तुम्ही इतके कमनशिबी आहात की तुमच्याबद्दल घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवायला पाच वकील जमायला सुद्धा फार परिश्रम करावे लागले…! आहे की नाही गंमत..
म्हणून म्हणते तुम्ही पापी आहात.
पण भूषण सर तुमच्या पापांची यादी एवढ्यावर कुठे थांबते हो.
प्रस्थापितांनी प्रस्थापितांच्या साठी प्रस्थापित केलेली व्यवस्था ही वर्णवर्चस्वाने भरलेली आहेच. त्यामुळे त्यांच्याकडून निषेधाची अपेक्षा तशी नगण्यच..!
…पण फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले म्हणणारे किती निषेध करण्यासाठी पुढे आले..?
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा शिरोधार्य मानून ज्या सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक आणि विशेषतः राजकीय चळवळीत कार्यरत आहेत. राजकीय चळवळीच्या नेतृत्वांनी तरी ठामपणे निषेध नोंदवण्यासाठी पुढे येणं अपेक्षित होतं. पण तेही तुमच्या बाबतीत शक्य झालं नाही कारण भूषण सर तुम्ही रा. सु गवई यांच्या पोटी जन्म घेणं हे तुमचं गुन्हा नाही का..
गटबाजीच्या राजकारणाचा जिथे शाप लागला तिथल्या एका गवई गटाच्या नेत्या पोटी तुम्ही जन्म घेतला… मग तुमच्यावर हल्ला झाला तर त्याचा निषेध इतरांनी का बर करावा..?
बाबासाहेब आयुष्यभर ज्या संविधानिक मूल्यासाठी आणि माणूस म्हणून जगण्याचे अधिकार माणसाला मिळावेत म्हणून झगडत राहिले नेमकं त्याच संविधानिक मूल्याची पायमल्ली होत असताना तुम्ही कोणत्या गटाच्या नेत्याचे चिरंजीव आहात हे जर लक्षात राहत असेल तर विचार करा… ?
असो.. पत्र जरा लांबत चाललंय.. पण हे लिहिल्याशिवाय शांत झोप लागलीच नसती.. हे पत्र तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
हे सगळं फार स्पष्टपणे लिहून मी सुद्धा मोठ्ठे पापच करत आहे..
त्या पापाचे प्रक्षालन म्हणून पुढचे चार-आठ दिवस सगळ्या बाजूने सगळ्या प्रकारचं ट्रोलिंग सोसावं लागणार आहे. आणि त्याची मानसिक तयारी मी केली आहे.
आपली मुलगी माझ्याच वयाची.. काळजी घ्या काका..
आपली
सुषमा.

Sushma Andhare’s Open Letter to CJI Bhushan Gavai: ‘You Are a Sinner’; Links Shoe Attack to Casteism and RSS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात